” महिला शिक्षण दिन “

534

 

      • शि
      • क्षण हा मानवी जीवन विकासाचा मुख्य स्रोत आहे
      • .शिक्षणामुळे जीवनाला उत्तम दिशा मिळते.एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंब शिक्षित करते असे म्हणतात.मुलीला शिक्षण दिले असता ती यशाची नवीन शिखरे सहज गाठू शकते.परंतु अजूनही काही भागात स्त्री शिक्षणाला महत्त्व दिले जात नाही.त्यामुळे त्यांच्या
      • प्रगतीला खीळ बसते.मुलींना उत्तम शिक्षण घेता यावे म्हणून सरकारने नवनवीन योजना सुरू केल्या आहेत.त्याचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यायला हवा.स्त्री शिक्षणाचे महत्त्व
      लोकांना पटवून दिले पाहिजे.कारण मुलींचे शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे लक्षण आहे.मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये,शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने ” लेक वाचवा,लेक शिकवा ” अभियानही राबविण्यात येत असते.मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे म्हणून सरकारकडून ” बेटी बचाव ” चा नारा ही देण्यात येत असतो.

मात्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,प्रथम शिक्षिका,स्रियांच्या मुक्तीदात्या असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी दिलेले शैक्षणिक योगदान,त्यांनी आचरणात आणलेली स्त्री उद्धारासाठीची मुल्ये भावी पिढीसाठी अत्यंत महत्चाची आहेत.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे स्री शिक्षणातील योगदान,त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविणे व त्यांनी रुजविलेले शैक्षणिक मूल्ये पुढील पिढीत संक्रमित होणे गरजेचे आहे.ही गरज ओळखून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ” महिला शिक्षण दिन ” म्हणून साजरी केली जाते.बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्रत्येक बालकाला समान गुणवत्तेचे मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्याची कायदेशीर तरतूद आहे.त्यानुसार राज्यातील मुलींना शिक्षण घेण्यासाठी,मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी तसेच एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी हे अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे.सावित्रीबाई फुले यांच्या महान शैक्षणिक कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी राज्यातील सर्व शाळांमधून ” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन ” म्हणून साजरा केला जातो.

राज्यात मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणे,मुलींच्या शिक्षणाला गती मिळावी,एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू

नये,मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जाचे अधिष्ठान लाभावे,परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये,शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे,स्थलांतरित पालकांच्या मुलींना अखंडित शिक्षणाची हमी देणे,मुलींना शिक्षणाची प्रेरणा देणे,त्यांच्यात आत्मविश्वास रुजवणे,वैचारिक व तार्किक क्षमता निर्माण करणे,शारीरिक क्षमता वाढीस लावणे,तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींची गळती रोखणे हे या अभियानाचे उद्देश आहेत.या अभियानाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवले जात आहेत.
लेक वाचवा,लेक शिकवा अभियान प्रत्येक गावामध्ये शाळेच्या माध्यमातून राबविले जात आहे.प्रभात फेरी,वक्तृत्व व निबंध स्पर्धा,व्याख्यानाच्या माध्यमातून जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.आपल्या देशात महिलांची भरारी डोळ्यात भरणारी असली तरी हे चित्र फार समाधानकारक नाही.कारण आजही महिलांना म्हणावी तशी संधी मिळत नाही हे वास्तव नाकारून चालणार नाही.विशेषतः ग्रामीण भागात मुलींचे शिक्षण असो की महिलांचे सक्षमीकरण आपल्याकडे परिस्थिती तेवढी चांगली नाही.त्यामुळे याबाबत सरकार आणि समाज या दोन्ही पातळ्यांवर कार्य होण्याची गरज आहे.मुलींचे शिक्षण हे प्रगतीचे लक्षण आहे हे समाजाने ओळखायला हवे.

ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण,महिलांची कुचंबणा,घरात व दारात महिलांची होत असलेली मुस्कटदाबी याविषयी फार कमी बोलले जाते.त्यांच्यावरील अन्याय कमी होत नाही.यात महिलांनीच पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे.महिलांवर होणारे अन्याय महिलांनीच सक्षमरीत्या सामना करून सोडविले पाहिजेत.त्याशिवाय महिलांची प्रगती अशक्य आहे आणि ही शक्ती महिलांमध्ये फक्त शिक्षणामुळेच येऊ शकते.शिक्षण हा मानवी जीवन विकासाचा मुख्य स्रोत आहे.शिक्षण घेतल्यामुळे आपल्या जीवनाला एक दिशा मिळते,संजीवनी मिळते.याचे उत्तम उदाहरण म्हणून आपण महात्मा जोतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्राकडे पाहू शकतो.महात्मा फुले यांना शिक्षणाचे महत्त्व कळाले होते.त्यामुळे त्यांनी १८४८ मध्ये पुणे येथील भिडेंच्या वाडय़ात मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली.एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते अशी त्यांची धारणा होती.त्यातूनच मग त्यांनी सावित्रीबाईंना शिकवले.असे महत्त्व सर्व पुरुष मंडळींना कळणे गरजेचे आहे.समाजात आजही मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत पालक जागरुक नाहीत,असे म्हणण्यापेक्षा मुलांच्या व मुलींच्या शिक्षणाबाबत दुजाभाव करीत असतात.मुलगी शिकून काय करणार? ही पालकांची भावना अजूनही दूर झालेली नाही.इंग्रजांच्या गुलामीगिरीच्या काळात महिलांनी घराबाहेर जाणे तुच्छ समजले जायचे.

‘चूल आणि मूल’ एवढय़ाच कामासाठी त्या समाजात राबत.घराबाहेर जाणे दूरची गोष्ट.भारत स्वतंत्र झाला त्या वेळी देशासमोर निरक्षरता ही फार मोठी समस्या होती.त्यातल्या त्यात महिलांची निरक्षरता तर देशाच्या प्रगतीत फार मोठा अडसर ठरत आली आहे.त्यामुळे शासन प्रथमपासूनच महिलांच्या शिक्षणावर भर देत आले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणाच्या बाबतीत भारताची प्रगती उल्लेखनीय झाली म्हणणे चुकीचे ठरणार नाही.प्राथमिक शिक्षणात सर्व शिक्षा अभियान मोहिमेमुळे मुलींच्या शिक्षणाला प्रेरणा मिळाली.शासनाने मुलींच्या शिक्षणाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी मुलींचा उपस्थिती भत्ता,सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना,मोफत गणवेश,मोफत पुस्तके,सावित्रीबाई फुले मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना,विद्यावेतन,शाळेला ये-जा करण्यासाठी राजमाता जिजाऊ मोफत सायकल योजना,एसटीने मोफत प्रवास करण्यासाठी अहिल्याबाई होळकर योजना,कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालय,मानव विकास योजना तसेच लेक वाचवा लेक शिकवा यासारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी शासन प्रयत्न करीत होते आणि करीत आहे.त्यांना त्यात काही अंशी यश मिळाले.पण पूर्ण यश मिळालेले नाही.त्याची अनेक कारणे आहेत.त्या कारणाचा विचार करून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

मुलींच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातील पालकांमध्ये तेवढी उत्सुकता व जागरूकता दिसत नाही जेवढे शहरी भागातील पालक जागरूक असतात.ग्रामीण भागातील पालक स्वतः शिक्षणाच्या बाबतीत अनभिज्ञ असतात.त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटत नाही.बरे शिक्षणाचे महत्त्व पटत नाही असे जर म्हणावे तर हेच निरक्षर पालक आपल्या मुलाचे शिक्षण कुठेच थांबू देत नाहीत.पोटाला चिमटा देऊन आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण करतात आणि मुलीचे शिक्षण मात्र या ना त्या कारणांवरून थांबवितात.गावात ज्या वर्गापर्यंत शाळा त्याच वर्गापर्यंत मुलींना शाळा शिकण्याची मुभा दिली जाते.पुढील शिक्षणासाठी जवळच्या गावात किंवा शहरात जावे लागते आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी मुलींना परवानगी दिली जात नाही,ही वस्तुस्थिती आहे.त्यामुळे आज प्राथमिक वर्गातील मुलींची संख्या माध्यमिक वर्गात गेल्यावर ५ टक्क्यांपेक्षा कमी होते तर उच्च शिक्षणात त्याहूनही कमी होते.ही गळती मुलींच्या विकासास नक्कीच बाधक ठरत आहे.

भारतात आज सर्वच क्षेत्रात महिलांची प्रगती नेत्रदीपक अशी आहे.भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर प्रतिभाताई पाटील यांनी पाच वर्षे आपली धुरा सांभाळली आणि पहिली महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळविला.घरातून राजकीय वारसा लाभलेल्या इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.देशातल्या विविध राज्यांत महिला या मुख्यमंत्री वा इतर महत्त्वाच्या पदांवर काम करीत आहेत.देशाची पहिली महिला पोलीस महासंचालक पदावर किरण बेदींचे नाव ठळक अक्षराने लिहिले गेले.लता मंगेशकर यांना भारताची गानकोकिळा म्हणून संबोधले जाते.क्रीडा क्षेत्रात पी.टी.उषा,कविता राऊत,मल्लेश्वरी,सायना नेहवाल,सानिया मिर्झा,मिताली राज इत्यादी सर्व महिलांनी आपल्या अपूर्व योगदानाने देशाला यशोशिखरावर नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.विविध क्षेत्रांत असंख्य महिला आहेत ज्यांची कामगिरी खरोखरच नेत्रदीपक आहे.महिलांची भरारी डोळ्यात भरणारी असली तरी हे चित्र फार समाधानकारक नाही.कारण आजही महिलांना म्हणावी तशी संधी मिळत नाही,हे वास्तव नाकारून चालणार नाही.त्यामुळेच सांगतो आहे “लेक वाचवा,लेक शिकवा.” तरच खऱ्याअर्थाने “महिला शिक्षण दिन ” साजरा केल्याचे समाधान लाभेल.आजच्या जयंती दिनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान स्मृतीस विनम्र अभिवादन..!!!

✒️राजेंद्र लाड(शिक्षक)जि.प.कन्या प्रशाला आष्टी(मो.९४२३१७०८८५)