मोर्शी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी !

99

🔸संत्रा, तूर, कपाशी, गहू, चना, पिकाच्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल !

🔹मोर्शी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तहसीलदारांना निवेदन !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.9जानेवारी):-तालुक्यात झालेल्या गारपीट वादळी अवकाळी पावसामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे संत्रा, तूर, कापूस, गहू, चना, भाजीपाला यासह विविध पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने मोर्शी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानग्रस्त भागांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी तहसिलदार श्रीकृष्ण ठाकरे यांच्याकडे केली आहे.
एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दुसरीकडे निसर्गाचेही कालचक्र बिघडलेले आहे.

यात शेतकरी अडचणीच्या कात्रीत सापडला असतांना आता पुन्हा गारपीट व अवकाळी पावसामुळे मोर्शी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या झालेल्या नुकसानीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे .मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी अवकाळी पाऊस गारपिटीमुळे नुकसानाचा सामना करावा लागतो आणि आधीच शेतकरी आर्थिक संकटात असून या वर्षी पुन्हा अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे अतोनात हानी झाली . त्यामध्ये हजारो हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून फळबागांना मोठा फटका बसला आहे.

शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेल्या संकटांमुळे मोर्शी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.मोर्शी तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घेऊन शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात यावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंकुश घारड, माजी महिला बाल कल्याण सभापती सौ वृषालीताई विघे, विलास ठाकरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत संरक्षण देण्याची व्यवस्था अंमलात आणणे आवश्यक आहे. झालेलं नुकसान कधीही भरून काढणे शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे राज्यसरकारने व केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानाची प्राधान्याने दखल घेणे आवश्यक असून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई तात्काळ देणे गरजेचे आहे.
—- रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.