निळा रंग आंबेडकरी अनुयायी यांच्या साठी जिव की प्राण आहे – मा.दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना)

36

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि.13जानेवारी):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अस्पृश्यांचा एखादा राजकीय पक्ष असावा असे वाटत होते.
कारण काँग्रेस फक्त अस्पृश्यांचा उद्धाराच्या घोषणा करत होते,पण अंमलबजावणी नाही.आणि 1932 साली गोलमेज परिषदेमध्ये गांधीजींनी अस्पृश्यांना केलेला विरोध बघता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वाटले अस्पृश्यांचा एखादा पक्ष असावा म्हणून 15 ऑगस्ट 1936 झाली त्यांनी “स्वतंत्र मजूर पक्ष” यांची स्थापना केली होती.तेव्हा स्वतंत्र मजूर पक्ष हा कामगार व अस्पृश्यांचे नेतृत्व करत होता.1936 ते 1942 स्वतंत्र मजूर पक्षाने मजुरांचे नेतृत्व केले होते.

1942 मध्ये ब्रिटिश कॅबिनेट मंत्री सर स्टेटफोर्ट क्रिप्स यांच्यापुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांची राजकीय कैफियत मांडली होती.तेव्हा मंत्री सर स्टेटफोर्ट क्रिश म्हणाले तुमचा पक्ष मजुरांचे नेतृत्व करतो अस्पृश्यांचा नाही. त्यामुळे तुम्हाला अस्पृश्यांची कैफियत मांडणे योग्य वाटतो का ? अस्पृश्यांची कैफियत मांडायची असेल अस्पृश्यांचा नेतृत्व करणाऱ्या पक्ष किंवा संघटनेमार्फत अस्पृश्यांची कैफियत मांडावी त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी स्वतंत्र मजूर पक्ष विसर्जित करून अस्पृश्यांचे प्रश्न मांडण्यासाठी 17,18,19,20 जुलै 1942 रोजी नागपूर येथे शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना केली होती.व त्या वेळी हिंदुत्वाद्याकडे भगवा रंग होता कम्युनिस्ट वाल्याकडे लाल रंग होता तर मुस्लिम लीग कडे हिरवा रंग तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्युल कास्ट साठी निळ्या रंगाची निवड केली पक्षाचा झेंडा निळा व त्यावर अशोक चक्र वापरण्यात आले होते.

झेंड्याच्या निळ्या रंगाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आकाशाचा रंग निळा आहे. आकाशाची विशालता आमच्या ध्येय, धोरणात आणि पक्षात असणार आहे. त्यानंतर निळा झेंडा वर अशोक चक्र घेतले त्या अशोक चक्रा बाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे अशोक चक्र गतिमान आहे ते कधीही थांबत नाही. त्याप्रमाणे आपल्याला ही गतिमान व्हायचे आहे अशा प्रकारे निळ्या झेंड्याचा रंग तयार झाला.आपल्या राज्य कारभारात सम्राट अशोकाने या चक्राची निर्मिती केली चक्र हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ स्वतः भोवती फिरणे असा आहे गोल फिरण्याची क्रिया समयचक्र दर्शवते म्हणजेच काळाबरोबर कसे बदलत राहावे ही क्रिया दाखवण्यासाठी चक्र आहे.30 जानेवारी 1944 रोजी कानपूर येथे समता सैनिक दलाच्या परिषदेमध्ये समता सैनिक दलाचा ध्वज गडद निळ्या रंगाचा व त्यावर 11 तारे पांढर्या रंगात असतील असे ठरले होते.

व समता सैनिक दलाचे कार्यकर्ते निळ्या रंगाच्या टोप्या वापरायचे 25 नोव्हेंबर 1951 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिवाजी पार्क मुंबई येथे सभा झाली तेव्हा लाखो लोक उपस्थित होते. त्यात हजारो लोक हातात निळा झेंडा घेऊन आलेले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा नंतर 3 आक्टोंबर 1957 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना होऊन त्यात पक्षाचा ध्वज निळाच ठेवण्यात येऊन त्यावर अशोक चक्र ही ठेवण्यात आले आहे.तेव्हापासून आंबेडकरी अनुयायासाठी निळा रंग हे जीव की प्राण असून ते समतेचे, प्रेमळपणचे, शांतीचे, करुणेचे स्वातंत्र्य समता बंधुत्वाचे प्रतीक म्हणून निळा झेंडा हातात निळी माळ, कपाळी निळा टीका, अंगावर निळी शाल स्वाभिमानाने वापरतात म्हणजे आंबेडकरी अनुयायी यांच्या साठी निळा रंग म्हणजे जीव की प्राण आहे.
अशी महत्व पूर्ण माहिती मा.दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना) मो.8766744644 यांनी आमच्या जिल्हाप्रतिनिधीशी बोलतांना व्यक्ती केली.