जिल्ह्यात रुग्णांना मिळणार ऑनलाइन आरोग्यसल्ला

28

पुरोगामी संदेश न्यूज नेटवर्क 

चंद्रपूर, दि. 22 जून:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयामध्ये  गर्दी होऊ नये. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी रुग्णांना रुग्णालयात न जाता ऑनलाईन www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला भेट देऊन रुग्ण उपचार घेऊ शकतात. नागरिकांना आरोग्यविषयक सल्ला अथवा माहितीसाठी ई- संजीवनी ओपीडी रुग्णसेवेचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.

आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाची सेवा देणारी ऑनलाइन ई-संजीवनी बाह्यरुग्ण विभाग अर्थात ओपीडी सेवा आहे. नागरिकांना त्यांच्या घरीच ऑनलाइन आरोग्य सेवा देणे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने रुग्णांना आजार व आरोग्य संदर्भात सल्ला देणे हे या ऑनलाइन ओपीडी सेवेचा उद्देश आहे.

ही आहेत ई- संजीवनी ओपीडीची वैशिष्ट्ये:

रुग्णांची नोंदणी, टोकन निर्मिती, व्यवस्थापन, वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी डॉक्टरांशी ऑडिओ-व्हिडिओ सल्लामसलत, ई-उपचार, एसएमस ई-मेल नोटिफिकेशन, राज्याच्या डॉक्टरांनद्वारे मोफत सेवा, सर्व माहिती (दैनंदिन स्लॉट, डॉक्टर्स, रुग्णालय यांची संख्या, प्रतिक्षा कक्षाची माहिती, कन्सल्टेशन टाईम लिमिट इत्यादी) महत्वपूर्ण वैशिष्टये आहेत.

ई- संजीवनी ओपीडीद्वारे राज्य, जिल्हा, गाव इत्यादी कोणत्याही ठिकाणावरून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय सल्ला व उपचार घेऊ शकता. हा सल्ला व उपचार घेण्यासाठी मोबाईल, लॅपटॉप, संगणक याद्वारे थेट व्हिडिओ कॉल तसेच ई-मेल, एसएमएस द्वारे देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी  सल्लामसलत करू शकतात.

अशी घ्यावी ई-संजीवनी ओपीडीची सेवा:

प्रथमत: मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर मोबाईल क्रमांकावर ओटीपी येणार, ओटीपी टाकल्यानंतर नोंदणी अर्ज भरायचा आहे. नोंदणी अर्ज भरल्यानंतर टोकणसाठी विनंतीची मागणी करावी. यासाठी आवश्यक आजारा बाबतचे अहवाल तसेच इतर कागदपत्र अपलोड करण्याची सुविधा आहे.

एसएमएसद्वारे लॉग इन संदर्भात नोटिफिकेशन येईल. नंतर रुग्णाला देण्यात आलेल्या ओळख क्रमांकाच्या आधारावर लॉग इन करता येणार आहे. यानंतर वेटिंग रूम या बटणावर टॅप केल्यानंतर काही वेळातच कॉल नाऊ हे बटन सक्रिय होणार, या आधारे रुग्णांना व्हिडिओ कॉल करता येणार आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टरांशी सल्ला मसलत झाल्यानंतर लगेच ई- प्रिस्किप्शन देखील प्राप्त होणार आहे.