यूपीएससीच्या यशाने घातलं श्रद्धाच्या कष्टापुढे लोटांगण, पहिल्याच प्रयत्नाच्या साध्याने अख्खा देश करतं अभिनंदन..!

33

सध्याच्या या स्पर्धेच्या युगात समाजापुढे आपलं एक वेगळं व्यक्तिमत्त्व उभं करायचं असतील, तर स्वत:ला सिध्द करणे खूप गरजेचं आहे. यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द व चिकाटी या त्रिसूत्रीची अत्यंत आवश्यकता असते. ठरवलेल्या ध्येयाकडे वाटचाल करतांना येणा-या संकटाला न घाबरता त्याच्याशी दोन हात कराल, तरच आपण अंतिम साध्य गाठू शकाल व आपल्या स्वप्नाला कवटाळू शकाल. असंच काहिसा प्रयत्न बीड जिल्ह्यातील श्रद्धा नवनाथ शिंदे या कन्यारत्नेनं आपल्या आयुष्याचं सार्थक करण्यासाठी कसोटीच्या सागरातून संकटाच्या वादळाला तोंड देत प्रयत्नांची नाव वल्हवित यशाचा किनारा गाठला आहे.

बीड जिल्ह्यातील एका शेतक-याच्या मुलीने जिद्दीच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी च्या परिक्षेत मोठे यश संपादन केले आहे. घरीच अभ्यास करत तिने हे यश मिळवले आहे. यूपीएससीच्या भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत ती राज्यात पहिली तर देशात 36 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. श्रद्धाचे वडील हे बीड तालुक्यातील लोणी शहाजानपूर येथील असून ते अल्पभूधारक शेतकरी आहेत. तर आई गृहिणी असून त्या अशिक्षित आहेत. श्रद्धाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीडलाच झाले.
आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीडला केल्यानंतर तिने औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रीकल इंजिनीअरींगचे शिक्षण पूर्ण केले. 2018 ला श्रद्धाने अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने थेट दिल्ली गाठली व सहा महिने शिकवणी केली. त्यानंतर 2019 च्या अखेरीला केंद्रीय लोकसेवा आयोगाने (युपीएससी) भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी जाहीरात प्रसिद्ध केली. श्रद्धा शिंदेने परीक्षेचा फॉर्म भरला आणि जानेवारी 2020 ला पूर्व परीक्षाही दिली. पहिल्याच प्रयत्नात आणि पहिल्याच परीक्षेत तिला यशही मिळाले. त्यानंतर तिने घरी राहूनच मुख्य परीक्षेचीही तयारी केली. ऑक्टोबर 2020 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल डिसेंबर महिन्यात लागला. यातही तिला यश मिळाले. त्यानंतर मार्च 2021 मध्ये तिची मुलाखत झाली. या सर्व परीक्षेचा एकत्रित निकाल रविवारी जाहीर झाला.

यामध्ये श्रद्धाने देशात 36 वा क्रमांक मिळविला आहे. यूपीएससीतून आयएएस, आयआरएस, आयपीएस सेवेत जाणा-यांची जिल्ह्यातील उमेदवारांची संख्या मोठी आहे. मात्र, मुलींमधून भारतीय अभियांत्रिकी सेवेत जाणारी श्रद्धा जिल्ह्यातील पहिली मुलगी ठरली आहे.
2018 ला इलेक्ट्रीकल इंजिनीअर ही पदवी हातात घेताच तिने शिक्षण घेतलेल्या औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने तिला सॉफ्टवेअर इंजिनीअर पदावर नोकरीची ऑफर केली. मात्र, तिला भारतीय अभियांत्रिकी सेवेत जायचे होते. त्यामुळे तिने नकार देत यूपीएससीची तयारी केली. श्रद्धाच्या यशाविषयी वडील नवनाथ शिंदे म्हणाले, की मी सर्वसामान्य शेतकरी आहे. लहानपणापासून श्रद्धाची शिकायची मोठी जिद्द होती. तिच्या शिक्षणासाठी मी खूप काही केलं असून तिने या परिक्षेमध्ये मोठे यश मिळवले आहे. श्रद्धाला मी एका मुलाप्रमाणेच सांभाळले असल्याचे नवनाथ शिंदे यांनी सांगितले. मुलापेक्षा जास्त मी तिला जपले व समजले आहे. त्यामुळे खरंच असा भेदभाव करायची गरज नाही. लोक म्हणतात मुलगी आहे, त्यामुळे 18- 20 वर्ष झाले की लग्न करायचं, मुलीला पुढे शिकवायला नको? मात्र, मी तसं केलं नाही. त्यामुळं आज माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंद आहे. अशी प्रतिक्रिया श्रद्धाचे वडील नवनाथ शिंदे यांनी दिली.

श्रद्धाच्या आईने म्हटलं आहे की, आज मला खूप आनंद होत आहे. मी पहिलीपर्यंत देखील शिकलेली नाही, परंतु माझी मुलगी आज शिकलीय. तिचा मला खूप अभिमान वाटतोय. ती सुरुवातीपासूनच खूप अभ्यास करत होती. एखादं काम सांगितलं तर मला अभ्यास करू दे, असं ती म्हणायची. आज तिने आमचं नाव खूप मोठं केलं असून मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतोय. यापेक्षा आम्हा आई-वडिलांना आणखी काय हवंय? तिच्या या कर्तृत्वाच्या आनंदाने ऊर भरून येतोय.दरम्यान, मागासलेला आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात शेतकऱ्याच्या मुलींने यूपीएससी परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे. घरीच अभ्यास करत राज्यात पहिली तर देशात 36 व्या रँकवर येण्याचा बहुमान या मुलीने मिळवलाय. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि घरी राहूनच अभ्यास करून, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशाला गसवणी घालण्याची किमया या बीडच्या कन्येने केली आहे. श्रद्धा हिने यूपीएससीच्या भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत राज्यात पहिला तर देशात 36 वा रँक मिळवला आहे. या शेतकरी कन्येने, यूपीएससी परीक्षेत मोठे यश संपादन करून अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये आपलं आणि आपल्या वडिलांसह जिल्ह्याचं नाव कोरलंय. त्यामुळं तिचं सर्व स्तरातून म्हणजेच अख्या देशातून कौतुक होत आहे.

✒️शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे(कमळवेल्ली, यवतमाळ)भ्रमणध्वनी-7057185479