उडाली गानकोकिळा: भारतावर शोककळा!

28

[लतादीदी मंगेशकर चरणी श्रद्धासुमने विशेष]

लता मंगेशकर भारतातील एक पार्श्वगायिका गायिका होत्या. त्या सर्वोत्कृष्ट भारतीय गायिकांपैकी एक होत्या. तसेच त्यांना ‘भारतीय गानकोकिळा’ म्हणतात. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक होत्या. हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखले जाते. लतादीदींच्या कारकीर्दीची सुरूवात इ.स.१९४२मध्ये झाली. ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९८०पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली. तर २०हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये प्रामुख्याने मराठी गायन केले आहे. त्यांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे होत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्यसंगीताचे प्रसिद्ध गायक होते.

लतादीदी मंगेशकरांचा जन्म मध्यप्रदेश- ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सीच्या इंदूर शहरात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया होते. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लतादीदी आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य होते. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहेत. लतादीदींना संगीताचे धडे प्रथमतः आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार भूमिकेने कामाची सुरूवात केली. इ.स.१९४२मध्ये त्या अवघ्या १३ वर्षांच्या होत्या, तेव्हा वडील हृदयविकाराने मृत्यू पावले. तेव्हा त्यांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक- मास्टर विनायक यांनी लतादीदींच्या परिवाराची काळजी वाहिली. त्यांनी लतादीदींना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.

लतादीदींनी ‘नाचू या गडे, खेळू सारे मनी हौस भारी’ हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या ‘किती हंसाल?’ या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी त्यांना नवयुगच्या पहिली मंगळागौर या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. या चित्रपटात त्यांनी ‘नटली चैत्राची नवलाई’ हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. इ.स.१९४५मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लतादीदी मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ- भेंडीबाजारवाले यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या ‘आपकी सेवा में’ या हिंदी चित्रपटासाठी ‘पा लागूं कर जोरी’ हे गाणे गायले. दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते. लतादीदी आणि आशादीदी यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात- ‘बडी माँ’मध्ये नूरजहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात त्यांनी ‘माता तेरे चरणों में’ हे भजन गायले. मास्टर विनायकांच्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लतादीदींची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.

इ.स.१९४७मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी अमानत खाँ- देवासवाले यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. उस्ताद बडे गुलामअली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही त्यांना तालीम मिळाली. इ.स.१९४८मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लतादीदींना मार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई-अंबालेवाली, यांच्यासारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या. सुरूवातीला लतादीदी आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत असत. परंतु नंतर त्यांनी स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम कवी असत. त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर उर्दू शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीपकुमार यांनी लताजींच्या भारतीय हिंदी गाण्यातील मराठी उच्चारांसाठी तुच्छतादर्शक शेरा मारला, तेव्हा त्यांनी शफी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांची अक्षरे गिरवून घेतली होती.

लोकप्रिय चित्रपट ‘महल’चे ‘आयेगा आनेवाला’ हे गाणे त्यांच्या कारकीर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. या गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबालाने म्हटले होते. ग़ुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा ‘शहीद’ या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी करून दिली. मात्र मुखर्जींनी लताजींचा आवाज अतिशय बारीक असल्याच्या बहाण्याने नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते, “येणाऱ्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताजींचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील.” त्यांनी लताजींना ‘मजबूर’ या चित्रपटात ‘दिल मेरा तोडा’ हे गाणे म्हणण्याची अमूल्य संधी दिली.लतादीदी मंगेशकर यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ग्रंथाली प्रकाशनाने सन १९९५च्या आसपासच्या वर्षी प्रसिद्ध केला होता. त्याचे संपादन मधुवंती सप्रे यांनी केले होते. पुढे हे पुस्तक मिळणे कठीण झाले. तेव्हा जयश्री देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे मैत्रेय प्रकाशनने ’फुले वेचिता’ या नावाने ते पुस्तक पुनर्मुद्रित केले आहे. लतादीदींनी पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले होते.

आवाजाला ईश्वरी देणगी लाभलेल्या लतादीदी मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास, न्युमोनिया व कोरोनाची लागण झाल्याने त्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल होत्या. अशातच लतादीदींनी दि.६ फेब्रुवारी २०२२ रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात चिरनिद्रा घेतली. त्यांचे कुटुंबीय,मित्रमंडळी व चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली. संपूर्ण भारत देशावर शोककळा पसरली. त्यांच्या जाण्याने जनता हुंदके देऊन रडत आहे.
!! लतादीदींना व त्यांच्या अविस्मरणीय स्मृतींना श्रद्धांजली अर्पूण विनम्र अभिवादन !!

✒️संकलन व सुलेखन:-‘अलककार’- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी(म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी.)मु. पो. ता. जि. गडचिरोली,व्हा. नं. ९४२३७१४८८३.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com