सम्यक विचार पेरणीसाठी – “पिंपळ व्हायचंय मला”

37

अलीकडेच सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी,समीक्षक,गझलकार,
“जागलकार” अरुण हरिभाऊ विघ्ने (रोहणा जिल्हा वर्धा) यांचा “पिंपळ व्हायचंय मला” हा काव्यसंग्रह प्राप्त झाला.परिस पब्लिकेशन सासवड जिल्हा पुणे द्वारा हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला असून ज्येष्ठ साहित्यिक भावानूवादक, अनुसंधाता डॉ.युवराज सोनटक्के (बेंगलोर) यांची काव्यसंग्रहाचे अंतरंग उलगडणारी चिंतनशील प्रस्तावना लाभली आहे.आकर्षक व कलात्मक मुखपृष्ठ आणि काव्यरचनेला साजेसे असे रेखाचित्रे अनुक्रमे अरविंद शेलार आणि संजय ओरके यांनी उत्तमरित्या रेखाटली आहेत. काव्यसंग्रहामध्ये एकूण ८३ काव्यरचना समाविष्ट आहे.तत्पूर्वी “जागलकार” अरुण विघ्ने यांचे ‘पक्षी’, ‘वादळातील दीपस्तंभ’, ‘जागल’ आणि ‘मी उजेडाच्या दिशेने निघालो’ हे काव्यसंग्रह सखोल चिंतन आणि मननातून साहित्य रसिकाच्या प्रांतात दमदारपणे दाखल झालेले आहे. ‘पिंपळ व्हायचंय मला’ हे त्यांचे पाचवे काव्यरत्न आहे.सजग आणि प्रगल्भ लेखनीचे धनी असलेल्या कवींनी प्रत्येक काव्यसंग्रहामध्ये विषय वैविध्य हाताळत निकोप आणि समृद्ध समाज निर्मितीसाठी/उभारणीसाठी कवींनी काव्यरचनेत किती जीव ओतला आहे याची वाचताक्षणी प्रचिती येते.एक निवृत्त शिक्षक म्हणून भौतिक सुखांना कवटाळून न बसता समाजऋणाची उतराई आणि कवितेलाच आपलसं केलेलं दिसतंय.शब्द रचनेलाच त्यांनी सुख आणि धन मानलेत.त्या तळमळतेतूनच त्यांची काव्यरचना दिवसेंदिवस अधिकाधिक खुलत गेली खुलत आहे.संत तुकोबाराय यांच्या शब्दात……..

“आम्ही घरी धन शब्दांचीच रत्ने !
शब्दाची शस्त्रे यत्ने करू !!

कवीचा अस्सल वऱ्हाडी बाज असलेला ‘जागल’ काव्यसंग्रह मायबोली(बोलीभाषा) संवर्धनासाठी अनमोल ठेवा आहे तर अन्य काव्यसंग्रह मराठी भाषेला समृद्ध करणारे आहेत.’पिंपळ व्हायचंय मला’ हा त्यापैकीच वेगळ्या धाटणीतील काव्यसंग्रह निसर्गाशी नातं जोडणारा अण् जपणारा आहेच शिवाय समाजपरिवर्तनाची दिशाही निश्चित करणारा आहे. सम्यक विचाराची पेरणी करणे हा त्यांच्या काव्यसंग्रहाचा मूळ गाभा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.कवी व्यवसायाने शिक्षक.अध्यापनाला केंद्रस्थानी ठेवत शेती-माती आणि ग्रामीण क्षेत्राशी नातं ही तितक्याच तळमळतेने जपलेलं आहे. निसर्गालाही आपलसं मानलं आहे.त्याचचं प्रतिबिंब त्याच्या काव्यरचनेत उमटलेलं दिसतयं. आपल्या दमदार आणि कसदार लेखणीतून शेती,शेतकरी,दीन दुबळ्यांचे शोषण,दांभिकपणा, नैराश्य,मानवता,स्वातंत्र्य,समता, बंधुत्व,राजकीय उदासीनता, तसेच सामाजिक सुधारणा,जातिभेद,आर्थिक विषमता,प्रेम इत्यादी मानवी जीवन आणि व्यवहार तसेच शोषित-पीडित-वंचित घटकांचे दुःख आणि त्यांच्या जीवनाशी निगडित ज्वलंत प्रश्नावर कवींनी पोटतिडकीने भाष्य केले आहे.

ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या कवी मनावर ग्रामीण जीवनाचा प्रभाव अन निसर्गप्रेम त्यांच्यात ओतप्रोत भरलेलं दिसतंय.काव्यसंग्रहाचे शीर्षक तसेच माणसातील झाडाना व झाडातील माणुसकीला समर्पित केलेला काव्यसंग्रह आणि, ‘झाड व्हायचंय मला’ या कविते पासून प्रारंभ तर ‘पिंपळ व्हायचंय मला’ या कवितेने केलेला काव्यसंग्रहांचा समारोप कवीची निसर्गाशी असलेली जवळीक अन अपेक्षित ध्येय अधोरेखित करते.

कवींनी निसर्ग आणि मानव यांच्यातील ऋणानुबंध /सहसंबंध स्पष्ट करण्याचा कसोशीने प्रयत्न केल्याचे दृष्टीत पडते.झाड व्हायचंय मला ! पृ. क्र.२३)अशीच असतात झाडं (पृ. क्र.२४),बोधीवृक्ष जपावा लागेल (पृ.क्र.२९),पानगळ आयुष्याची (पृ.क्र.३७),सलाम उन्हातला झाडाला (पृ.क्र.३९),त्यागमयी पळस (पृ.क्र.४६),झाड आणि माणूस (पृ. क्र.७३/७४),पिंपळ व्हायचंय मला (पृ.क्र.१२८) इत्यादी प्रातिनिधिक काव्यरचनेतून निसर्ग आणि मानवी जीवनातील विविध पैलू अलगदपणे उलगडले आहेत.मानवी जीवन निसर्गाच्या गर्भातच पोसले जाते.अर्थात निसर्ग व माणवी जीवनाचा अतूट असा संबंध आहे.निसर्गातील प्रत्येक घटक मानवी जीवनाला समृद्ध करतो.सूर्य मानवी जीवनाला ऊर्जा नि चंद्र शीतल चांदणे देतो.डोंगरातून नदी उगम पावते आणि काठावरच्या गावाची तहान भागवते.ही धरती माणसासाठी अन्नाची निर्मिती करते.जमिनीवर उगवलेली वनश्री मानवी जीवनाची प्रत्येक गरज पूर्ण करते.पशुपक्षी पर्यावरणाची शुद्धता राखतात,तर गुरेढोरे माणसाच्या कष्टात सामील होतात.वातावरणातील हवा मानवी श्वास जागवते.सारा आसमंत मानवी जीवनासाठी निस्वार्थ वृत्तीने दातृत्व जोपासतो.या चरातील निसर्ग मानवी जीवनाचे संवर्धन करतो.

अर्थात निसर्गाचे संपूर्ण मानव जातीवर अनंत असे उपकार आहेत.परंतु स्वार्थाने बरबटलेल्या मनुष्य प्राण्याला यांची जाणीव असूनही कृतघ्नपणे वागतो. व्यक्तिगत स्वार्थ अन हव्यासापोटी मनुष्य आवश्यकता अन सोयीनुसार वृक्षाची राजरोसपणे कत्तल करण्यास कधीच कचरत नाही.परिणामतः निसर्गाचा समतोल बिघडतो आणि मानवी जीवन प्रभावित होते यांचे भानही मनुष्य प्राणी ठेवत नाही.याची सल कवीला आहे.कवी म्हणतात झाडाचे मात्र तसे नाही.झाड परोपकारी वृत्ती कायम ठेवत माणूस बनण्याच्या कसोटीत शतप्रतिशत उतरतो.स्वतः ऊन वारा पावसाच्या झळा सोसत इतरांच्या सेवेसाठी सर्वस्व अर्पण करतो.कवींच्याच शब्दात,झाडं खूप काही देतं.कधीच कुणाचं नुकसान करित नाही.त्याचे जीवावर आपण कुऱ्हाड जरी चालविली तरी ते कधी कुरबुर करीत नाही की तक्रार करीत नाही.म्हणून कवी निसर्ग अन झाडाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.मनुष्य प्राण्याला झाडाप्रमाणे होता येणार नाही का असा प्रश्नही त्यांच्या मनात येतो. मनुष्यप्राण्याला झाडाप्रमाणे नाही,किमान माणसातील माणूस तरी होता आलं पाहिजे असं मनोमन वाटतंय.म्हणून कवी स्वतःबरोबरच समस्त मानवजातीला झाडा सारखे बनण्यासाठी आत्मीयतेने आव्हान करतात.

कवीला का बरं झाड व्हावंसं वाटतंय ते यासाठीच की,त्यांना रगतपित्या व्यवस्थेच्या छाताडावर स्वयंदीप होऊन वर्तमानात प्रकाशन्यासाठी उजेडाचं झाड,अमानुषतेच्या बुडखावर माणुसकीची पालवी जपत,बंधुता मैत्रीन डवरलेलं मानवतेचं झाड ज्यांच्या छायेत असंख्य जाती-धर्म वर्ग,पंथाची पाखरं एकात्मतेची गाणी गातील, मुक्तकंठाने निर्भयपणे भेदभाव विसरून नव्या युगाची प्रभात होईस्तोवर एकतेचं झाड, निराश्रिताना आश्रय देणारं, दुःखाच्या झळा सोसून सुखाची सावली देणारं,भुकेल्यांना नि तहानलेल्यांना चोची ओलं करणारं त्यागाचं झाड व्हायचंय आहे.याच भूमीतील सम्यक विचाराचं रोपटं जपण्यासाठी सत्विचारचं झाड,विषमतेची जमीन नांगरून समविचारी झाडाची बाग फुलविण्यासाठी समतेचं झाड,एकंदरीत सम्यक विचार पेरणीसाठी कवीला झाड व्हावंस वाटतंय.म्हणून त्यांची ही कविता जी सर्वांना ऊर्जा देईल,सर्जनशीलतेचा आनंद देतील, सामाजिक जाणिवेतून काळजी वाहील,उपेक्षित समाजाची व्यथा, वेदना, प्रश्न मांडेल,व्यवस्थेशी भांडून जाब विचारेल यासाठी कवीची कविता त्या दिशेने प्रवासाला निघालेली दिसतंय.प्रत्येक माणसांनी झाड व्हावं असं कवीला वाटतंयं.परंतू माणुसकी हरविलेल्या जगात कवी स्वतःच माणुसकीसाठी चाचपडत असल्याचे दृष्टीत पडते.माणूसकीसाठी असलेली ही सल कवींनी “झाड आणि माणूस” (पृ.क्र.७३/७४) या कवितेमध्ये यथार्थपणे मांडली आहे.

” पण प्रत्येक माणूस झाड नसतो
प्रत्येक झाडात मात्र माणुसकी दिसते
अगदी त्यांच्या जीवावर कुठाराघात
करणाऱ्या माणसावर सुद्धा त्यांची कणव असते
झाडाचं समर्पण त्याग बघता असं वाटतं
प्रत्येक माणसाला झाड होता आलं तर
किती बरं होईल?

जग झपाट्याने बदलत असताना पोशिंद्याची स्थिती का बरं बदलत नसावीत याबाबतचे वास्तव चित्र रेखाटण्यासाठी कवीनी आपली लेखणी झिजविली.शेतकऱ्या प्रती आस्था अन शेती मातीशी नाळ जुळलेल्या कवींनी गावाकडच्या विविध समस्या/अडचणीला आपल्या काव्यरचनेत महत्वपूर्ण स्थान दिले.शेतकरी-शेतमजूर अपार कष्ट करूनही आहे त्या परिस्थितीत बदल होईल या बाबतीत त्यांना अजिबात शाश्वती नसते.याची प्रचिती त्यांच्या काव्यरचनेतून प्रकर्षाने दृष्टीपथात येते.निसर्गाचा लहरीपणा, विस्तारित दलालांची साखळी, इथली रगतपिती व्यवस्था कायम त्याच्या मानगुटीवर ठाण मांडून बसलेली आहे.परिणामतः शेतकऱ्याच्या वाट्याला आलेली आर्थिक दुर्बलता, दुःख दारिद्र्य आणि शोषणाची मालिका अधिकच रुंदावत असल्याचा निर्वाळा त्यांची कविता देते.जो इमानेइतबारे राब-राब राबतो. जमीन कसतो.पिकवितो अन साऱ्या जगाची भूक भागवितो.त्याच्याच वाट्याला दारिद्र्य झोपडी आणि आयत्या मालाचा व्यापार करणाऱ्यांचे टोलेजंग बंगलेच्या बंगले अशी विषम अवस्था झाली आहे.स्वतः पिकविणा ऱ्याला अंग झाकण्यासाठी पुरेशे वस्त्र नाही. खायला पोटभर अन्न नाही.न पिकविणाऱ्याकडे मात्र ठेवायला जागा नाही.इतकेच नव्हे तर अहोरात्र घाम गाळून पिकविलेल्या अन्नधान्याचे शिजलेले उरलेले अन्न जेव्हा रस्त्याच्या कडेला फेकून दिल्या जाते तेव्हा असले दृश्य बघून कवीची तळपायाची आग मस्तकात जाते.निसर्गापुढे हतबल आणि व्यवस्थेपुढे निष्प्रभ ठरलेल्या बळीराजाच्या जोपर्यंत सोयाबीनच्या शेंगात जीव येत नाही तोपर्यंत त्याचाही जीवात जीव येत नाही.

शेतकरी हिताचा खोटा आव आणणाऱ्या तकलादू संधीसाधू शेतकऱ्याच्या संघटना, मुजोर शासन व्यवस्था, आणि कायम निसर्गाच्या फेऱ्यात अडकलेल्या बळीराजाचे वास्तव चित्रण कवी अरूण विघ्ने यांच्या कवितेने उत्तमरीत्या रेखाटले आहे.व्यवस्थेचा बैल, पेरला होतं एक स्वप्न मी, भाड्याच्या जिंदगी, सारं वावरच निसार झालं, भकास गावाची सकस आत्मकथा, अंदाज पावसाचा इत्यादी काव्यरचना ह्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहेत.कवींनी त्यांच्या काव्यातून शेतकऱ्यांच्या वास्तव समस्याना खऱ्या अर्थाने वाट मोकळी करून दिली आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीत आडकाठी ठरणाऱ्याचा खरपूस समाचार घेण्यास कवी विसरले नाहीत. “खिळे” (पृ.क्र.५४) मध्ये कवी म्हणतात की,

“जो आमच्या पोटाची खळगी भरतो
त्याच्याच हक्काची पावलं रोखण्यासाठी
घातला जातोय घाट या रगतपित्या व्यवस्थेकडून

शेतकऱ्याच्या पाठी घट्ट चिकटून असलेले दारिद्र्य आणि सर्वस्तरातून होणारी पिळवणूक कवीनी जवळून बघितली, अनुभवली अन काव्यात रेखाटली.खऱ्या अर्थाने पिचत असलेल्या बळीराजाच्या शोषणास पूर्णविराम मिळावा,त्यांना न्याय मिळावा यासाठी कवीची तळमळ आहे. “सारं वरवरचं निसार झालं !” (पृ. क्र.१०४) मध्ये कवी आपल्या खास वऱ्हाडी शैलीत भूमिका विषद करतात.

” आता सारं वावरस नांगरून टाकतो
भूईतल्या मुयावरस घाव घालतो
उलथापालथ करतो साऱ्या मातीची
तवाच नव्या ईचारच बियाणं पेरतो.

“माय”ला उपमा नाही.तिचं वर्णनही शब्दात करता येत नाही. समुद्रापेक्षाही खोली तिच्या मनाची/हृदयाची असते.चिल्यापिल्यांचं भरण-पोषण आणि त्यांचं उज्वल भविष्य शोधण्यातंच तिची सारी जिंदगी जाते.चिल्यापिल्याच्या स्थैर्यासाठी कोणत्याही प्रसंगाला/ संघर्षाला सामोरे जाण्याची तिची तयारी असते.इतरांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत असणारी “माय” खऱ्या अर्थाने आकाशाची छाया,हिटरची ऊब असते.परिस्थितीशी दोन हात करीत चिल्यापिल्यांना सिहाचं बळ देण्यास ती कसलीही कसर सोडत नाही.तिचा हा संघर्ष भल्याभल्यांना अंतर्मुख करण्यास भाग पाडते.परंतु ती हयात असे पर्यंत तिच्या कर्तुत्वाची/संघर्षाची कुणालाच जाणीव नसते.विघ्ने सरांची कविता कृतघ्न चिल्यापिल्यांना कर्तव्याची जाणीव करून देण्याची महत्वपूर्ण भूमिका वठविते.माय ही सदा सर्व काळ चुलीवर तवा कसा मांडावा यापेक्षा लेकराच्या भूकेचा दाह कसा शांत होईल यासाठी जिवाचे रान करते.पण मुलांच्या पंखाना बळ मिळताच तिचे चिलेपिले कसे कृतघ्न होतात अन तिची हेळसांड करतात याचं वास्तवदर्शी चित्र त्यांची कविता दृष्टीपटलावर आणते.’ माय ” (पृ. क्र.४९) मध्ये व्यक्त होतात की,

” माय !
खरंच तू महान होतीस
महानाचीही माय होतीस
काळोखात प्रकाश देणारी होतीस
मात्र अखेरच्या क्षणी क्षुधेपायी
तुझी पिलंचं तुझा कर्दनकाळ ठरलीत
शेवटी बुद्धाच्या चरणी चिरशांती घेतलीस
मात्र आजही अनेकांच्या भविष्याची प्रेरणा बनलीस !”

कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला.या महामारीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले,प्रभावित केले.आपले,परके,जिव्हाळ्याचे अन रक्ताच्या नात्याचीही ओळख करून दिली.या काळातील एक एक बरे वाईट परिणाम कवींनी अलगदपणे टिपलेत.या काळात जे अनुभवले,भोगले अन दृष्टीत पडले तेच त्यांनी काव्यात मांडले.या महामारीने माणसाची पावलं थांबलीत.स्थिरावलीत.अनेकांच्या हाताची कामे गेलीत.हाताला काम नाही म्हणून लोकांच्या खिशात दाम नाही.डब्यात पीठ नाही. चुलीत विस्तव नाही.तव्यावर भाकर भाजत नाही म्हणून ताटात जेवण नाही.कोरोनाच्या दहशतीने लोक कडीबंद झालेत. एकमेकाशी संवादही थांबलेत. गळाभेटीलाही लोक पारखे झालेत.माणूसकी तर पुर्णतः हरविल्यागत झाली.मुलांचं खेळणं-बागडणं थांबलं.शाळा कॉलेजेस ओस पडलेत. लिहिणार्‍याचे हातही थांबलेत. शब्दही गोठलेत.अशी भयावह व बंदिस्त करणारी अवस्था कोरोनाने आणली.अशाही विपरीत स्थितीत माणसातील काही झाडे कामी आलीत.म्हणून कोरोना काळ माणुसकीचा मंत्र देऊन गेल्याचा निर्वाळा विघ्ने सरांची कविता देते.अभ्यासू व्यासंगी अन ध्येयवेड्या कवींनी आपलं संपूर्ण आयुष्य अध्यापन आणि साहित्य रसिकांसाठी वाहून घेतलं.ज्या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन अध्यापनासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलंय त्याच अध्यापन क्षेत्राची होणारी वाताहत (ऑनलाइन शिक्षणप्रणालीमुळे ) बघून कवी व्यथित होतात.म्हणून कवी आजच्या गुरुजींना सूचित करतात की,

“ऑनलाईन शाळा तुम्ही शिका म्हणता गुरुजी
गरिबांच्या मुलांनी कोठून आणावं जिओजी “

“शाळेत रोज शिक्षणाची खिचडी मिळे सर्जी
कोरोनान शिक्षण अंधारात दिसते गुर्जी “

“शोषितांच्या शिक्षणाचं होऊ नये लॉकडाऊन
एवढी विनंती आहे गुर्जी तुम्हाला काळजातून “

कवींना राजकीय क्षेत्र वर्ज्य नाही.खास आपल्या अनोख्या शैलीत राजकीय क्षेत्रावरही त्यांची कविता अभ्यासपूर्ण असे भाष्य करते.कोरोना महामारीचा आडोसा घेऊन राज्यकर्त्यांनी चालविलेल्या मुस्कटदाबीचाही त्यांच्या कवितेने खरपूस समाचार घेऊन लोकांना सजग/सतर्क राहण्याचा कानमंत्र दिला आहे.शासनकर्त्यांनी कोरोनाच्या सबबीखाली बोलणार्‍यांना आवर घालण्यासाठी लावलेलं मुस्क आणि विषाणूशी लढणाऱ्यासाठी आपणही मुस्क लावून घेण्याची करुन घेतलेली सवय भविष्याच्या दृष्टीने धोक्याची नांदी ठरू शकते असा सूचक इशारा विघ्ने सरांची कविता देते.आपण कुणाच्या दृष्टीत पडू नये म्हणून स्वतःहून मुस्क बांधणाऱ्यांना गुलामीची जाणीव करुन देण्यासही कवी विसरत नाही.घटनाकारांनी स्वकर्तुत्वाने आपल्या तोंडचे मुस्क केव्हाच फेकून दिले असल्याची आठवण ते करून देतात.आता मुखवट्यात तोंड लपून चालणार नाही.”शिका, संघटित व्हा,आणि संघर्ष करा” हा बाबांचा मंत्र शिरोधार्य माना,आपल्यात वाढलेला मी पणा सोडा, समता, बंधुत्वाने एकमेकांस जोडा अन विरोधकांचे मनसुबे आणि भविष्याची पावलं ओळखून लढण्यासाठी सज्ज राहा असे प्रांजळपणे सूचना करतात.”मुस्कटदाबी” (पृ क्र ७९) मध्ये कवी म्हणतात की,

” लोकशाही शासन व्यवस्थेत
किती दिवस मुस्कटदाबी
सहन करणार आहोत आम्ही ?
आम्हाला मुसक्याची सवय
करून घेता येणार नाही,
हे मुसके आम्ही झुगारलेच पाहिजे
नाहीतर गतगुलामीचे दिवस
जास्त दूर नाही लोकहो ! “

बुद्ध, कबीर,फुले, शाहू आंबेडकर यांचे कर्तृत्व आणि विचारांना प्रेरणास्थानी ठेवून कवीची काव्यरचना पुढे सरकत जाते.कवींनी पुरोगामी सम्यक विचाराची पेरणी करण्याचं व्रत स्वीकारल.त्याच विचारांचे प्रतिबिंब हे ” एका सूर्याने अंधार दूर केला,निळ्या पाखरानी, आम्ही चळवळे,धूळ जरा साफ करून घे, लढण्यासाठी सज्ज व्हा, क्रांतीपुरुष, हे क्रांतीसूर्या, युगा-युगाचा मूकनायक तू,त्या तमाच्या आठवणींना,प्रज्ञेची पाखरं, परिवर्तन, परिवर्तनाचा ध्वज लावू, अशोक विजयादशमी, बोधिवृक्ष जपावे लागेल, चला चळवळ गतिमान करू, स्वयंप्रकाशित व्हा, इत्यादी काव्यरचनेत उमटलेले दिसते.डॉ. आंबेडकरांनी माणसाला माणूसपण बहाल केले.बुद्धांनी जगाला मानवतावाद शिकविला. व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारून,व्यवस्थेच्या मुसक्या आवळून शोषितांचा आवाज बुलंद केला.म्हणून कवी या महापुरुषाच्या विचारचरणी नतमस्तक होतात.कृतज्ञता व्यक्त करतात.कायम ऋणात राहण्यात धन्यता मानतात.भूतकाळ आणि वर्तमान स्थितीचे ” हे क्रांतीसूर्या ” (पृ.क्र.४०) मध्ये अचूकपणे विश्लेषण करतात.

” हे क्रांतीसूर्या !
तू उगवला नसतास तर
हे उजेडाचे जग आम्हास
कदापिही दिसले नसते
रातकीडयांनीही आम्हाला केव्हाच बंदिस्त केले असते “

अर्थात बाबासाहेबांची प्रेरणा अन कर्तुत्वाने पायवाटाचे आज हमरस्ते झालेत.गावकुसाबाहेरचे रस्ते आता गावातील चौकात अन मुख्य वस्तीत आलेत.व्यवस्थेच्या चिखलात दबलेली माणसं खऱ्या अर्थाने माणसात आलीत.एवढी मोठी क्रांती या महानायकानी केली.क्रांतीची ही पताका कायम तेवत ठेवण्यासाठी “जागल्या” होऊन पहारा देण्याचे कवी पोटतिडकीने आव्हान करतात.
विघ्ने सरांची काव्यरचना मातृत्वा बरोबरच बापाचा खंबीरपणा तसेच भकास व ओस पडलेली गावे,वाढत्या शहरीकरणाचे विश्लेषण करतानाच गावाचे महत्त्वही तितक्‍याच दमदारपणे रेखाटते. प्रेमासारख्या विषयावरील त्यांची कविता भाष्य करते.लोकशाहीचा मागोवा तसेच जगण्याच्या संघर्षावरही मत व्यक्त करते.विशेष म्हणजे सर्वसामान्यांना समजेल, उमजेल अशा साध्या सोप्या भाषेतील त्यांची ही काव्यरचना समाजाला नवंदृष्टी देणारी आहे.त्यांची काव्यरचना वंचित,शोषित पिडीत आणि उपेक्षित समाजाचे वास्तव चित्र रेखाटतानाच माणसातील माणुसकीचा शोध घेण्याचा प्रयत्न करते.त्यांचा हा प्रयत्न साहित्य रसिकांच्या पसंतीत नक्कीच उतरेल याची मला पूर्ण खात्री आहे.शेवटी त्यांचा सम्यक विचार पेरणीचा ध्यास तसेच माणुसकीसाठी झाड आणि पिंपळ व्हायच्या संकल्प पूर्तीसाठी सोबतच सकस साहित्यनिर्मितीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा——————–!

● काव्य संग्रहाचे नाव ●
“पिंपळ व्हायचंय मला”
●कवी●
अरूण हरिभाऊ विघ्ने
मोबाईल 9850320316
●प्रकाशन●
परिस पब्लिकेशन सासवड
●पृष्ठ संख्या● १२८
●स्वागतमूल्य● १५० रुपये
—————————————-
✒️समीक्षक/लेखक:-प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे(अर्थशास्त्र विभाग प्रमुख श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा ता. धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावततती)मोबाईल:- ९९७०९९१४६४
—————————————-