उद्योग जगतात प्रिंटींग इंडस्ट्री अव्वल स्थानी: विनय छाजेड

87

✒️अहमदनगर प्रतिनिधी(प्रा.रावसाहेब राशिनकर)

अहमदनगर(दि.25फेब्रुवारी):-जागतिक मुद्रण दिनानिमीत्त न्यू आर्टस् काॅलेजच्या प्रिंटींग टेक्नाॅलाॅजी विभागामार्फत आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना निट प्रिंटचे संचालक श्री. विनय छाजेड यांनी सांगीतले की, आज आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रिंटींग इंडस्ट्री अव्वल स्थानी आहे. रोजगार निर्मीतीमध्ये प्रिंटींग उद्योगााचा हिस्सा फार मोठा आहे. प्रिंटींग टेक्नाॅलाॅजीच्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये खुप मोठ्या प्रमाणात रोजगार आणि स्वंय रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी ‘हार्डवर्क’ बरोबरच ‘स्मार्ट वर्क’ करुन जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करावे.

प्रिंटींग दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाने अहमदनगर प्रिंटींग प्रेस ओनर असोसिशन चे नवनिर्वाचीत अध्यक्ष, सन्मान ग्राफिक्स चे संचालक श्री. संदीप ठुबे आणि असोसिएशनचे उपाध्यक्ष, एस.पी. स्क्रिन चे संचालक समीर कुलकर्णी यांचा यथोचीत गौरव केला. याप्रसंगी बोलताना श्री. संदीप ठुबे यांनी सांगितले की, असोसिएशन च्या वतीने प्रिंटींग टेक्नाॅलाॅजीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी सर्वातोपरी सहकार्य करण्यात येईल.

ग्राफिक्स डिझायनिंग आणि इतर तांत्रीक बाबींसाठी संघटनात्मक पातळीवर मार्गदर्शन करण्याची जबाबदारी श्री. समीर कुलकर्णी यांनी घेतली.याप्रसंगी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. भास्कर झावरे यांनी प्रिंटींग टेक्नाॅलाॅजी विभागाला सर्व आवश्यक सुविधा आणि प्रयोगशाळा उभारणीसाठी महाविद्यालयाच्या पातळीवर भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. अरुण गांगर्डे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. अंकुश गाढवे यांनी केले.