अस्सल ग्रामिण जीवनाला न्याय देणारा “आसक्या” कथा संग्रह

51

आसक्या या कथासंग्रहाचे लेखक प्रा. राजेंद्र सोनवणे एक बहुआयामी व्यक्तिमत्व शैक्षणिक,सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात त्यांचा सहजसुलभ वावर असतो. कार्यकुशल आदर्श शिक्षक वादळकार कवी, कुशल संघटक, समाज सेवक असा हा त्यांचा जीवन प्रवास वाखाणण्याजोगा आहे.आसक्या कथा संग्रहातील शीर्षक कथा वाचनीय असून या एकविसाव्या शतकामध्ये विचार करायला लावणारी आहे.ग्रामीण भागातील जनतेचे जीवन, जगण्याची धडपड त्याचे हुबेहूब टिपलेले चित्र शब्दबद्ध केले आहे.ग्रामीण भागातील व्यसनाधीनता, आडमुठेपणा परंतु तरीसुद्धा प्रामाणिकपणे राहणारा आसक्या यावर घरातील आई वडिलांचे वागणे. त्यांची कृती त्याच्यावर परिणाम कशी करते. याचं हुबेहूब चित्रण आपल्या या शीर्षक कथेमध्ये आढळते.लेखक प्रा राजेंद्र सोनवणे ग्रामीण भागातील निरीक्षण करून अनुभव कथन कथेमध्ये चित्रित केलं आहे. *जसं पेराल तसं उगवतं याच प्रात्यक्षिक या कथेमध्ये आढळतं व जसं कराल तसंच भराल हे सत्य या आसक्या कथेमध्ये आढळतं*. यात त्यांचा अडाणीपणा दिसत असला तरी तितकाच तो वाचकाला मर्म शिकवून जाणारा वाटतो. आणि त्यातील दाहकता,जगण्याची धडपड,आशा,काहीतरी करण्याची जिद्द या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. एकमेकां विषयी जिव्हाळा,आपुलकीपण सोबत दिसत आहे. आजची परिस्थिती पाहता ती आपल्या कथेशी तंतोतंत जुळतात कथांची कथा बीजे आकर्षक जुन्या रूढी-परंपरांना छेद देण्याचे काम करत आहेत.अशाप्रकारचे जीनं आजही ग्रामीण भागात दिसून येते.

याचाच अर्थ असा की,ग्रामीण भागात आजही चांगल्या शिक्षणाची गरज असून विज्ञान त्यांच्यापर्यंत पोहचले नाही. जरी पोहचले असले तरी,त्याला त्यांनी अजूनही समजून घेतलेले नाही.
आपल्या लेखणीने कथेमध्ये सामाजिक बांधिलकी ला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असून तो साध्य झाला आहे . असे मला वाटते. प्रसंगाची आणि तर्क शुद्धतेची सांगड घालून कथा वाचताना वाचकांची उत्सुकता ताणली जात असून वाचक अंतर्मुख होत आहे. रंग्या कथा वाचली की आपली लेखनशैली प्रशंसनीय असून कुमार्गाला लागलेल्या अनेक तरुणांना सन्मार्गाने सर्वसामान्य शांततेचं जीवन जगण्यासाठी महत्वाची वाटते. लेखकाने निर्माण केलेली कथेतील पात्रे, विचारांचा संघर्ष विविध कथा बीजांची पेरणी करणारा ठरतो. प्रत्येक कथेतील पात्र हुबेहूब डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहतात. आगीचा मोहोळ या कथेमध्ये कथा रचनेतील उत्तम बिंदू म्हणजे तिचा शेवट तो या कथेने उत्तम साधला आहे. आगी मोहोळ वर बसणाऱ्या मधमाशा आणि त्यांची केलेली छेडछाड यामुळे निर्माण होणारा जीवघेणा प्रसंग याचं चित्रण या कथेमध्ये मनाची उत्कंठता वाढवणारा आहे. तातू या कथेमध्ये नदीला पूर आल्यानंतर ही काळजीपूर्वक होडी हाकणारा तातू! नदीला आलेल्या पुराचा प्रसंग शब्दबद्ध करताना पावसाळ्यातील भयानक परिस्थिती निर्माण होऊन खेड्यातील जनजीवन विस्कळीत होते. पुलाच्या बांधकामामुळे त्याच्या रोजीरोटीला कसे मुकावे लागते? याचे वास्तव दर्शन या कथेतून घडते.

आणि समोर काय होईल?याच विचारात वाचक पडल्याशिवाय राहणार नाही, आणि हो..! सोबतच विनोद,दुःख ,भीती, आनंद इत्यादी भावनाने वाचक भावूक झाल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी हा त्या कथासंग्रहात वाचन महत्त्वाचं आहे.कथाकार राजेंद्र सोनवणे आपले लेखन विविधांगी आहे. अनुभवातून ग्रामीण भागातीलच नव्हे; तर शहरी भागातील ही माणसाची बदलत जाणारी मानसिकता अगदी सूक्ष्म निरीक्षणातून आपण शब्दबद्ध केली आहे. उगाच फापटपसारा नसून योग्य व सुडौल बांधणीचा हा आपला लेखन व्याप आहेत. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन ! मनापासून धन्यवाद देते.पुढील वाटचालीस शुभेच्छा देते.

✒️प्रा. सुरेखा कटारिया(मा.उपप्राचार्या,भारतीय जैन संघटनेचे विद्यालय संतु नगर . चिंचवड,पुणे)मो:-9822745030