पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रीय अवकाश निरीक्षण केंद्र

29

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.26फेब्रुवारी):- भारतातील सर्वात मोठ्या शालेय स्तरावरील खगोलशास्त्रीय अवकाश निरीक्षण केंद्र व प्रयोगशाळेचे अनावरण शनिवारी ( दि.२६ ) करण्यात आले.पुणे शहरातील विद्यार्थ्यांसाठी हेन्केल इंडिया कंपनी व ग्लोबल मिशन अ‍ॅस्ट्रोनॉमी आणि लायन्स क्लब यांच्या सहकार्याने ही प्रयोगशाळा पुण्यातील महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेमध्ये सुरु करण्यात आली.या अवकाश निरीक्षण केंद्राचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर,जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.काशिनाथ देवधर,प्रांतपाल हेमंत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी हेंकेल इंडियाचे भुपेश सिंग,संध्या केडिया,डॉ.प्रसाद खंडागळे,शेखर डुंबरे,प्रसाद वैद्य,खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे,मुख्याध्यापिका प्राजक्ता वैद्य,जयंत इनामदार,प्रदिप वाजे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर व नासाचे शास्त्रज्ञ डॉ.रूपेश ओझा यांनी सुमारे चार हजार विद्यार्थांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.

यावेळी कुलगुरु डॉ.नितीन करमळकर यांनी विद्यार्थांमध्ये लहान वयातच अवकाश निरीक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी अशा केंद्रांची गरज आहे.भारत सरकारकडून नांदेड जवळ आंतराष्ट्रीय लायगो प्रकल्प उभारण्यात येत आहे.भविष्यात त्यासाठी लागणारे वैज्ञानिक या केंद्रातून तयार होतील असेत्यांनी सांगितले.मुलांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण करण्यासाठी हेंकेलने यापूर्वी पुणे जिल्ह्यातील जेजुरी,भोर,तळेगाव-ढमढेरे आणि शिरगाव येथे अवकाश निरीक्षण केंद्र सुरु केली असल्याचे डॉ.प्रसाद खंडागळे यांनी सांगितले.

या अवकाश निरीक्षण केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी दुर्बिण,टेलिस्कोप,व्दीनेत्री यासारखी अद्यावत उपकरणे व खगोलशास्त्रीय पुस्तके कंपनीतर्फे देण्यात आली आहेत.सूर्यग्रहण,चंद्रग्रहण,सुपरमून,उल्कावर्षाव,ग्रह-तार्‍यांचे निरीक्षण,लघुग्रहांचे निरीक्षण,ग्रहांची युती अशी निरिक्षणे येथे करता येणार आहेत.भारतामध्ये शालेय स्तरावर अवकाश निरीक्षण केंद्र उभारण्यासाठी ग्लोबल मिशन अ‍ॅस्ट्रोनॉमी आणि रिसर्च सेंटर या संस्थेने अमेरिका आणि स्पेनमधील संशोधन संस्थांसोबत सामंजस्य करार केला आहे.या माध्यमातून विद्यार्थी नासाच्या लघुग्रह शोध मोहिमेत सामील होतील.याव्दारे सध्या दहा हजार विद्यार्थी अवकाश संशोधनाचा अभ्यास करत आहेत.तसेच ‘ट्रेन द ट्रेनर’ कार्यक्रमाद्वारे पुण्याच्या आसपास २५० हून अधिक शिक्षकांना कंपनीने प्रशिक्षण दिले आहे.