मराठी दिन विशेष

26

मराठी भाषा जपली पाहिजे ….

✒️दीपक पाटील(पोलीस उपनिरीक्षक,गोबरवाही पोलीस स्टेशन, भंडारा)

▪️संकलन- पी.डी.पाटील सर

सायंकाळची वेळ होती..बाहेर छान वारा सुरू होता.
काल पाऊस झाल्याने वातावरणात हलका गारवा होता जो या उन्हाळ्यातल्या दिवसात मन आल्हाददायक करत होता..

गस्त करून कार्यालयात बसलो होतो.
फारसे काही काम नसल्याने प्रसन्न मनाने गाणी गुणगुणत होतो.
तेवढ्यात बाजूला असलेला भ्रमणध्वनी खणाणला.
भ्रमणध्वनीवर जवळच्याच मित्राचे नाव पाहिले.
मन आणखीनच प्रसन्न झाले..

बोलायला सुरुवात केली..
लहरी मन झाल्याने अगदीच शुद्ध मराठी मी बोलत होतो.त्यात एक ही इंग्रजी शब्द नव्हता..त्याला ही माझे प्रसन्न मन पाहून आनंद झाला..
गप्पा रंगत केल्या..अवघे पाच मिनिटं झाले असतील..
माझी गाडी आहे त्या शुद्ध मराठीच्या रुळावर सुरू होती..

तो मध्येच त्रागा केल्यासारखा म्हटला… पुरे आता…आपल्या भाषेत बोल..

मी अवाक झालो..

मी म्हटले ‘ मी तर मराठीतच बोलतोय,अजून वेगळी आपली भाषा कोणती?

‘ अरे एकही इंग्रजी शब्द नाही..सगळेच कसे शुद्ध मराठी शब्द…ऐकायला जड जातेय रे’ त्याने स्पष्टीकरण दिले..

त्याच म्हणणं अगदी बरोबर होते..
अगदीच शुद्ध मराठी बोलल्यावर ऐकणाऱ्यालाही वेगळेच वाटते..

भ्रमणध्वनीवरील आमचे संभाषण संपले..

मी मात्र अंतर्मुख झालो..

कार्यालयातील वस्तूंवर नजर गेली…
त्यातील पुष्कळच्या वस्तूंची नावे आपण इंग्रजीत घेतो..
अरेच्चा, काहींची मूळ मराठी नावे काय हे ही माहिती नव्हते..

मित्र,माझ्या काही वेळाच्या शुद्ध मराठीला वैतागला..
जन्म देणारी आई नकोशी होण्यासारखा हा प्रकार..

मी ही जास्त वेळ शुद्ध मराठी बोललो असतो तर कदाचित थकलो असतो..

आपण वैश्विकरानाच्या नादात इंग्रजी भाषेला जवळ करून हळू हळू मराठी भाषेचा गळा घोटतोय..

मानवाची त्याच्या परंपरा आणि त्याच मूळ जपुन ठेवण्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे..
पृथ्वीवरच्या सगळ्याच उपखंडातील मानव त्यात आले..

आपण मात्र विकासाच्या नावाची जळती मशाल घेऊन पळत सुटतोय आणि त्यात आपली मराठी भाषा जाळतोय..

आज इंग्रजी भाषा बोलणे उचभ्रू चे लक्षण मानले जाते यातच मराठी भाषेचे वांझोटेपन दिसतेय..

इंग्रजी भाषेचे शब्द आज मराठीत इतके मिसळले आहेत की त्यांना वेगळे करणे आज शक्य नाही..

हळू हळू शब्दांनंतर वाक्य बोलली जाताय..

‘यू नो,आज मी गाडी चालवली’ हे लहानसे उदाहरण!

भ्रमणध्वनी,समाज माध्यम हे साधने इंग्रजी भाषा फोफवायला आणि मराठी भाषा अशक्त व्हायला आणखीनच कारणीभूत ठरली..

काळाबरोबर चला…जग वैश्विकरनाच्या बिंदूभोवती एकवटतय…तुम्ही कुठे मातृभाषा आणि अस्मिता लावून धरताय..
वेग पकडा…विकास होईल..
असे ज्ञानाचे डोस पाजले जातात..
मग त्यांच्या मागे पळणारे पळत सुटतात…मराठी भाषा पायदळी तुडवत..

पण मला वाटते काहींनी थांबले पाहिजे…मराठी भाषेला जवळ घेऊन गोंजारले पाहिजे..

आपली मातृभाषा जपून विकास साधता येतो..
जपान,चीन ही त्याची उदाहरणे..

दूर कशाला जायचे..दाक्षिणात्य राज्य आज ही भाषेचा स्वाभिमान बाळगून आहेत..आणि त्यांचा विकास आणि आधुनिकीकरणं आपल्या तोडीचे आहे किंबहुना एक पाऊल पुढेच…

मराठी वाचवा यासाठी असे लेख लिहून काहीच होत नाही..जाणीव आहे मला..

प्रत्यक्ष कृती आणि आचरण हवे…

मराठीतून इंग्रजी गाळायची असेल तर त्यासाठी कट्टर मराठी अस्मितेची चाळणी हवी..

घरी गेलो..
मुलगा इंग्रजीतील कविता गात होता..बायको कौतुकाने त्याच्याकडे पाहत होती..

थोड्या वेळापूर्वीचे आल्हाददायक वातावरण आता जड भासू लागले..
मराठी भाषा पुरली जात आहे आणि पुरण्यासाठी मूठभर माती माझ्याही हाताची आहे.

मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐