संकल्प महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा!

79

८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. आपल्या देशातही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आजच्या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा गौरव केला जातो. सर्वच क्षेत्रात महिला आज पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. असे कोणतेही क्षेत्र नाही की ज्यात महिला पुरुषांच्या मागे आहेत. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, साहित्य,विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवताना दिसत आहे. पूर्वी चूल आणि मूल ही जी महिलांची ओळख होती ती आता पुसली गेली आहे. मागील शतकात किंवा अगदी काही दशकांपूर्वी म्हटले तरी चालेल महिला सक्षम नव्हत्या. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे महिला कायम दुर्लक्षित होत्या. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांनी पहिल्यांदा घराचा उंबरठा ओलांडला. शिक्षणामुळे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू लागल्या.

शिक्षणामुळेच महिला सक्षम झाल्या असे असले तरी आजही देशातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत का ? असा प्रश्न खेदाने विचारावा वाटतो. आज सर्वच क्षेत्रात महिला पुढे असल्या तरी त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत असे म्हणावे लागेल. आज खाजगी तसेच शासकीय नोकऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण खूप आहे. अनेक महिला उच्चपदावर कार्यरत आहेत. असे असले तरी नोकरी करणाऱ्या महिलांचा त्यांच्या पगारावर कितपत अधिकार आहे हा संशोधनाचा विषय आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना स्वतःचा पैसा स्वतः खर्च करण्याचा अधिकार नाही. आपल्या देशातील सर्वाधिक महिला या घरकामात गुंतलेल्या असतात. त्यांना आर्थिकदृष्ट्या पतीवर अवलंबून राहावे लागते. या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. समाजात माणूस म्हणून जगायचे असेल तर आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. मध्ययुगात स्त्री ही एक असहाय्य व्यक्तिमत्त्व की जिला स्वतःचे अस्तित्वच नाही, अशी प्रतिमा समोर आली त्याला छेद देण्याचा प्रयत्न अजूनही चालू आहे. पुरुषप्रधान संस्कृती आल्यापासून पुषांच्या लेखी महिलांचा दर्जा दुय्यम होत गेला. वेतनासंबंधी भेदभाव, स्वयंरोजगार, अर्थसाहाय्याचा अभाव, विनावेतन काम व बेरोजगारी, कुटीर उद्योगात मालकी हक्क नसणे अशा अनेक कारणांमुळे महिलांचे आर्थिक स्थान पुरुषांपेक्षा दुय्यम राहिले आहे.

आज २१ व्या शतकातही तो दुय्यमच आहे. हा दुय्यम दर्जा जाऊन महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मानाचे स्थान मिळवून द्यायचे असेल तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेच लागेल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल तर महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात. महिला मंडळे, स्वयंसहाय्यता बचत गट, विविध संस्था यांच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी समाजानेही व्यासपीठ उपलब्ध करुन द्यायला हवे. पुरुषांनीही आपली पुरुषी मानसिकता सोडून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करायला हवेत. महिलांच्या पगारावर महिलांचाच अधिकार असायला हवा. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करुनच आपण देश सक्षम करु शकतो. देशाचा विकास करायचा असेल तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करायलाच हवे.

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५