उध्दवराव, अजितराव तोंडाची गां… का करताय ?

41

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

पंढरपुर तालुक्यातील मगरवाडी येथील एका तरूण शेतक-याने परवा विष पिऊन आत्महत्या केली. विष पितानाचा व्हिडीओ करत, मनातला उद्वेग व्यक्त करत हा तरूण शेतकरी विष पिलाय. ” परत शेतक-याच्या जन्माला येणार नाही, शेतकरी नामर्द आहे. सरकार शेतक-यांचे नाही !” असे म्हणत त्याने विष पिले आहे. आपलं आयुष्य इतकेच आता आपण जीवंत राहणार नाही असे म्हणत विष पिवून जीव दिलेल्या सुरज जाधवचा तो व्हीडीओ काळीज पिळवटून टाकणारा आहे, मन अस्वस्थ करणारा आहे. शेतक-याची पोरं म्हणवून घेणारी पिलावळ राज्याच्या सत्तेत आहे. ज्याला वामन म्हणून हिनवले तो सत्तेबाहेर आहे आणि स्वत:ला शेतक-यांची पोरं म्हणवणा-या औलादीच शेतक-याशी वामनापेक्षा वाईट वागत आहेत. सरकारातल्या शेतकरी नेत्यांना पंढरपुरच्या घटणेबाबत काही वाटते की नाही ? स्वत:ला शेतक-याची पोरं म्हणवून घेणा-या नेत्यांना आणि त्यांच्या सरकारला थोडी तरी लाज-शरम आहे काय ?

त्यांना लाज असेल, शरम असेल तर सुरज जाधव या शेतक-याला जिथे अग्नी दिला तिथे जावून त्याची माफी मागावी. तिथे जावून नाक घासावे. सुरजने आत्महत्या केली असली तरी ती आत्महत्या नव्हे. आघाडी सरकारच्या धोरणाने त्याची हत्या केली आहे. सुरजचा बळी राज्य सरकारनेच घेतला आहे. शेतक-यांचा खुप कळवळा असलेली, शेंगा कुठे लागतात ? याची अक्कल असलेली लोकं सत्तेत आहेत. त्यांच्याकडूनच आज शेती आणि शेतकरी उध्वस्त केला जात असेल, तेच जर शेतक-यांच्या हत्या करणार असतील तर हे वाईट आहे. हा शेतक-यांचा विश्वासघात आहे. या प्रकाराला आईशी बदफैली वर्तन करून बापाला राम राम करणे म्हणतात.

गेल्या काही दिवसातले आघाडी सरकारचे धोरण शेतक-याची पिळवणूक करणारे आहे. दुधाला भाव नाहीत. दुधाचे दर पार पडलेत. शेतकरी मेचाकुटीला आलाय. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न नव्याने उभा राहतोय. द्राक्षाच्या दराचा प्रश्न नव्याने निर्माण होतोय. ऊसाप्रमाणे द्राक्षालाही किमान हमीभावाची गरज वाटू लागली आहे. शेतातली वीजेची कनेक्शन धडाधड तोडली जात आहेत. वीज बिल भरा म्हणून डिपी बंद केले जात आहेत. शेतक-यांचे पिक जळाले तरी वीज कनेक्शन सुरू केले जात नाही. सत्तेत येण्यापुर्वी याच सरकारमधल्या नेत्यांनी वीजबील माफीच्या घोषणा केल्या होत्या. या राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वीज बील माफी संदर्भात आश्वासन दिले होते तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तेलंगणाचे उदाहरण देत गत सरकारवर टिकेची झोड उठवली होती. आम्हाला सत्ता द्या, आम्ही वीज बील माफ करतो ! अशी भूमिका मांडली होती. तसेच लोकांनी वीज बील भरू नये ! असेही आवाहन केले होते. आज तेच उध्दव ठाकरे, तेच अजितराव सत्तेत आहेत. लोकांना दिलेल्या आश्वासनाची त्यांना जाणीव तरी आहे का ? ग्रामिण मराठीत एक म्हण आहे. “तोंडाची… करू नये !” टिंब टिंबच्या जागी काय आहे ?

ते मराठी माणूस चांगलेच ओळखतो. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि अजित पवार यांनी आपल्या तोंडाची ….. केली आहे. त्यांनी ती करू नये. त्यांनी लोकांना दिलेला शब्द पाळावा. नसेल तर वीज कनेक्शन तोडण्याची मोघलाई तरी आवरावी. सरकारच्या मोघलाई धोरणांना आळा घालावा. अन्यथा शेतकरी माफ करणार नाही. आज ज्या सत्तेच्या जोरावर निर्लज्जपणे वीज कनेक्शन धडाधड तोडताय, शेतक-यांना नाडताय ती सत्ता शेतकरी काढून घेतील. निवडणूकीच्या काळात जर मतं मागायला शेतक-यांच्या दारात आलात तर शेतकरी पायताण काढेल. आज तो सहन करेल पण त्याची वेळ आल्यावर तो शांत राहणार नाही. सत्तेसाठी खेळला जाणारा “ब्राम्हण ब्राम्हण” खेळही त्यावेळी नाही चालणार. वामनाचे नाव घेवून वामन लाजेल असे वागणार असाल तर लोक वामनासोबत जातील. मग पावसात भिजा नाहीतर मंदाकीनीसारखे ओल्या कपडयांनी नाचलात तरी लोक थारा देणार नाहीत, दारात उभे करणार नाहीत. जर वामनाच्या धोरणाला विरोध करत सत्तेत आला असाल तर बळीराजालाच तुमच्या पायाखाली का घेताय ? त्याला पुन्हा पुन्हा का गाडताय ? त्याला मातीत गाडणारी धोरण का राबवताय ? बळीराजा लबाड नव्हता, बळीराजा सत्तालंपट नव्हता. तो तमाम रयतेच्या सुखासाठी सत्ता राबवत होता. त्याने मुठभर कारखानदार, वाईनवाले, बारवाले हाताशी नव्हते धरले. तो सामान्य रयतेच्या हिताचे धोरण राबवत होता. म्हणूनच आजही, “इडा पिडा जावू दे, बळीचं राज्य येऊ दे !” असे आया-बाया दिपावलीत आपल्या लेकरांना ओवळाताना म्हणतात. तुम्ही जर असेच मस्तवाल वागणार असाल, सत्तेत गेल्यावर तोंडाची… करणार असाल तर लोक ओवाळताना तुमचे नाव घ्यायचे दुरच पण जोड्याने नक्की मारतील.

वीज बीलाबाबत जी अवस्था तीच एसटीची अवस्था. एसटी कामगारांच्या बाबतही सरकार लबाडी करते आहे. स्वत: शरद पवारांनी उध्दव ठाकरे व अजित पवार यांच्या समोर एका जाहिर समारंभात एस टी कर्मचा-यांच्या मागण्याबाबत दिलेला शब्द पवार विसरले की काय ? सत्तेच्या स्पर्शाने सरकारची आणि सरकार चालवणा-या नेत्यांची मती भ्रष्ट झाली आहे की काय ? सरकारातल्या प्रमुख नेत्यांना त्यांनी दिलेले शब्द का आठवत नाहीत ? लोकांच्या भावनांशी असे खेळू नका. अन्यथा वेळ आल्यावर लोक तुमचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाहीत याचे भान ठेवा.