गंगाखेड शुगरने गाठले १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

101

🔸आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या पाठपुराव्यामुळेच गंगाखेड शुगर ने आमचा ऊस गाळपास नेला, त्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे व गंगाखेड शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र डोंगरे यांचे आभार मानल

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.1एप्रिल):-शुगर अन्ड एनर्जी लि. विजय नगर मखणी कारखान्याने २०२१-२२ चा १२ वा गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगीच १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले होते. ऊसाची वाहतूक करणारे लहान-मोठे ५८० वाहने, एवढ्याच ऊस तोड कामगारांच्या टोळ्या, गंगाखेड शुगरचे जवळपास ९४० अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने १५४ दिवस १३ तासात १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट गंगाखेड शुगरने दि. ३१ मार्च रोजी पूर्ण केले. संकटसमयी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या माझ्या शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहता कामा नये यासाठी गंगाखेड शुगरकडे सतत पाठपुरावा करणारे गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यामुळेच आपला ऊस गाळपास गेला असल्याचे समाधान शेतकऱ्यांनी बोलून दाखवले.

गंगाखेड तालुक्यातील बालाघाट डोंगररांगेत आपलं अस्तित्व कायम टिकवत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा कारखाना म्हणून गंगाखेड शुगरकडे पाहिले जाते. २००९ मध्ये ऊस गाळपाची पहिली चाचणी घेतल्यानंतर गंगाखेड शुगरने आपल्या बारा वर्षाच्या प्रवासामध्ये अनेक चढ-उतार पाहिले आहेत. ऑक्टोबर २०१९ पासून गंगाखेड शुगरवर प्रशासक म्हणून श्री अंकुर कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती झाली. गंगाखेड शुगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र डोंगरे यांच्या कुशल व सक्षम नियोजनामुळे गंगाखेड शुगरने आपले कार्य सतत सुरूच ठेवले. यावर्षी गंगाखेड मतदार संघासह इतर भागातही अतिरिक्त पर्जन्यमान झाल्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे आपला ऊस गाळपास जाईल का नाही ? असा प्रश्‍न शेतकऱ्यांना सतावत होता.

गंगाखेड शुगर अन्ड एनर्जी लिमिटेडचा सन २०२१-२२ चा १२ वा गळीत हंगाम सुरु झाल्या नंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये आशा पल्लवीत झाल्या. गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस घेऊन जाण्यासाठी गंगाखेड शुगरकडे सतत पाठपुरावा ठेवला. त्यामुळे गंगाखेड शुगरने सन २०२१-२२ गळीत हंगाम मध्ये आत्ता पर्यंत मतदार संघातील गंगाखेड तालुक्यातून २ लाख ४० हजार मे. टन, पालम तालुक्यातुन ९५,३१६ मे. टन व पूर्णा तालुक्यातून १ लाख ८७ हजार मे. टन ऊस गाळपास आणला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस आणत गंगाखेड शुगरने यावर्षी १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. गंगाखेड मतदार संघामध्ये आज रोजी जवळपास ९६ हजार मे. टन ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत आहे. गंगाखेड मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात उसाचं एक टिपरु शिल्लक राहता कामा नये असे सक्त निर्देश गंगाखेड शुगरला आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी एक लोकप्रतिनिधी या नात्याने दिले असल्याने गंगाखेड शुगरला एकूण ऊस पुरवठा करणाऱ्या वाहना पैकी ३८२ चालू यंत्रणेतील ऊस पुरवठा करणारे वाहने गंगाखेड मतदार संघात दिवस-रात्र धावत आहेत. शेतात ऊस उभा आहे आता काय होईल ? याची शेतकऱ्यांनी तिळमात्र चिंता करू नये. तुमचा संपूर्ण ऊस गाळप झाल्याशिवाय कारखान्याचा यावर्षीचा गळीत हंगाम बंद होऊ देणार नाही असे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे म्हणाले आहे.

गंगाखेड शुगरने यावर्षी १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्टे पूर्ण केल्या बद्दल आ. गुट्टे यांनी गंगाखेड शुगरचे प्रशासक श्री अंकुर कुमार श्रीवास्तव, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र डोंगरे, गंगाखेड शुगरचे सर्व खातेप्रमुख, उपप्रमुख, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार, ऊस तोड कामगार व सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे.आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या संकटसमयी शेतकरी त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहिला, आज शेतकऱ्यांच्या मदतीला जनसेवक धावून गेला असेच म्हणावे लागेल.