महापुरुषांची जयंती नाचून नाहीतर वाचून साजरी करा – प्रा. संतोष पिलारे

33

🔹चौगान येथील महात्मा फुले स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रात क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती साजरी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.12एप्रिल):- सत्यशोधक समाजाचे संस्थापक व महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे विचारवंत व समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि जातिभेद पाहून सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला होता. महात्मा फुले यांचे समाजाप्रती विशेष योगदान आहे. महापुरुषांचे विचार समजून घ्यायचं असेल, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपले ध्येय पूर्ण करायचे असतील तर महापुरुषांची जयंती नाचून नाहीतर वाचून साजरी करा. असे प्रतिपादन प्रा. संतोष पिलारे यांनी व्यक्त केले. ते चौगान येथील महात्मा फुले स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रात स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमोद मैंद, उमेश धोटे सरपंच ग्रा. पं. चौगान, प्रा. अंकुश मातेरे उपसरपंच ग्रा. पं. चौगान, प्रा. संतोष पिलारे पत्रकार लोकमत समाचार, विनोद बुराडे यांनी दीपप्रज्वलन व प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच उमेश धोटे हे होते.प्रा. संतोष पिलारे समोर म्हणाले की, विद्यार्थ्यांनो आपल्या समोर एक उदिष्ट ठेवून त्या दिशेने वाटचाल सुरु करा. मेहनत घेण्याची तयारी ठेवा. तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.

कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमोद मैंद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आपल्या जीवनातील उदाहरादाखल देत विद्यार्थ्यांनी आपल्या धेयपूर्ती साठी स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत घेत यशस्वी व्हाव सोबतच आईवडील यांचा आदर करा. असे त्यांनी सांगितले. प्रा. अंकुश मातेरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना महापुरुषांच्या जीवन चरित्रातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. महापुरुषांनी समाजपरिवर्तन करतांना नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन समाजजागृती केली आहे. यावेळी त्यांनी बुकबँक सारखी नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. इंजी. कुंदन कळसकर व इंजी. मंगेश ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तर चौगानचे सरपंच उमेश धोटे यांनी अध्यक्षीय भाषण करताना महापुरुषांच्या जयंतीचे महत्त्व उपस्थितांना पटवून सांगितले, महापुरुषांच्या जीवन समजुन घेण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन झाले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश मलोडे यांनी केले तर आभार रुपेश बांगरे यांनी मानले. यावेळी राहुल बांगरे, मुन्ना दोनाडकर, विनोद बुराडे, इंजी. प्रशांत शेंडे, विजय प्रधान व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.