आ. गुट्टे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत घेतली भेट

119

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.18एप्रिल):-विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री मा.ना.श्री नितीनजी गडकरी यांची भेट घेतली.याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री मा.सुधीर मुनगंटीवार, सुनील हायटेक कंपनीचे सर्वेसर्वा मा. सुनील गुट्टे, जयसिल मिजगर, विकास तोंडे उपस्थित होते.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील प्रमुख रस्ते व नमामि गंगे अंतर्गत गंगाखेड येथील गोदाघाटावर करावयाच्या विविध विकास कामांबाबतीत सविस्तर चर्चा करून, गंगाखेड-कोद्री-धर्मापुरी रा.मा.क्र. २३४ या रस्त्याचा विकास कामाकरिता १८० कोटी रुपये, गंगाखेड-पालम-लोहा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ एफ. या प्रमुख महामार्गाच्या विकास कामाकरिता ३२० कोटी रुपये, गंगाखेड रेल्वे उड्डाण पुल क्र. २ च्या बांधकामासाठी मंजुरीसह निधी देण्यात यावा व तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग गंगाखेड अंतर्गत गंगाखेड व पालम तालुक्यातील विविध रस्त्यावरील पुलांच्या विकास कामाकरिता ७६ कोटी ४० लक्ष व सार्वजनिक बांधकाम उपविभाग पूर्णा अंतर्गत पूर्णा तालुक्यातील विविध रस्त्यावरील पुलांच्या विकास कामाकरिता ८० कोटी ९८ लक्ष रुपयांच्या विकासकामांना मंजुरीसह निधी देण्याची मागणी केली.

“मी सदैव आपल्या पाठीशी आहे, काळजी करू नका” नमामि गंगे अंतर्गत करावयाच्या विकास कामे, गंगाखेड रेल्वे उड्डाणपूल क्रमांक २, विविध महामार्ग व त्यावरील पूल यांच्या विकास कामाचा प्रस्ताव, राज्य शासना मार्फत मागून घ्या यासाठी मी लागेल तेवढा निधी देतो असा शब्द मा. गडकरी साहेबांनी आमदार गुट्टे साहेबांना दिला.आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांचे प्रयत्नाने व केंद्रीय मंत्री मा.ना. नितीन गडकरी यांच्या सहकार्याने गंगाखेड मतदार संघातील रस्ते व पुल विषयीचे प्रश्न निश्चितच मार्गी लागतील.