गोड साखरेची कडू कहाणी..!

44

🔹बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचा जीवनसंघर्ष….

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.29एप्रिल):-जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या ऊसाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने, गेल्या ४ महिन्यापासून तारखावर तारखा पुढे ढकलाव्या लागत असल्याने आणि दुसऱ्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने, चक्क केज येथील विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पतीवरचं, आत्महत्या करण्याची वेळ आली आहे?

शेतात ऊस उभा आहे. अंबाजोगाई येथील अजित पवार यांच्या व धनंजय मुंडे हे चालवत असणाऱ्या, अंबा साखर कारखान्याचा सभासद आहे. याबरोबरच येडेश्वरी सहकारी साखर कारखाना माझ्या शेतापासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर आहे. या दोन्ही कारखान्याकडे गेल्या २ महिन्यांपासून चकरा मारत आहेत, तरीदेखील ते ऊस नेत नाहीत. यामुळे आता आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येणाऱ्या ३ दिवसात जर ऊस नेला नाही, तर ऊसाचा फड पेटवून देत आत्मदहन करणार आहे, असा संतप्त इशारा ऊस उत्पादक शेतकरी तथा विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपतीने दिला आहे.

बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या चंदन सावरगाव येथील शेतकरी शत्रुघ्न तपसे यांना जवळपास ५ एकर शेती आहे. त्यापैकी ३ एकरावर त्यांनी ऊस लागवड केले आहे. या ऊसावर तपसे यांना आपल्या मुलीचे लग्न आणि दुसऱ्या मुलीचे शिक्षण करायचे होते. मात्र त्यांचे हे स्वप्न साखर कारखान्याच्या मनमानी कारभारामुळे विस्कळीत झाला आहे. शेतकरी हे अंबाजोगाई येथील आंबा सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. तो कारखाना शेतापासून अवघ्या २५ किलोमीटरवर आहे. तर गतवर्षी ज्या कारखान्याला त्यांनी ऊस घातला, तो येडेश्वरी सहकारी साखर कारखाना अवघ्या १० किलोमीटरवर आहे. तर त्यांच्या पत्नी ज्या कारखान्याच्या सभासद आहेत. ज्या खासदार रंजनी पाटील या चालवत आहेत, असा विखे पाटील सहकारी साखर कारखाना बंद पडलेला आहे.

मात्र कारखाने उशाला असताना त्यांचा तळहाताच्या फोडासारखे सांभाळलं, पण ऊस शेतातच वाळत आहे. या ऊसावर तपसे यांना एका मुलीचे लग्न आणि दुसऱ्या मुलीचे शिक्षण करायचे होते. मात्र, त्याचं ठरवलेल्या स्वप्नमय निश्चयावर विरजण टाकण्याचा पाप, साखर कारखान्यांकडून होत आहे. यामुळे शेतकरी तपसे यांनी थेट साखर आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तर साखर आयुक्तांनी देखील ऊस घेऊन जाण्याचे आदेश संबंधित कारखान्याला दिले आहेत.

मात्र, या आदेशाला देखील केराची टोपली साखर कारखान्यांकडून दाखवली गेली आहे. यामुळे आता येणाऱ्या ३ दिवसात जर माझा उस या कारखान्यांनी नेला नाही, तर मी ऊसाचा फड पेटवून देत त्यामध्ये उडी घेऊन आत्मदहन करणार आहे, असा संतप्त आणि टोकाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. हजारो मेट्रिक टन ऊस शेतात जशास तसा उभा आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी होत आहे. यामुळे परजिल्ह्यातील ऊस आयात करण्यापेक्षा साखर कारखानदारांनी आपल्या परिसरातलाच ऊस घेऊन जावा. अन्यथा शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येईल. अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते भाई मोहन गुंड यांनी दिली आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यात गत २ वर्षापासून चांगला पाऊस होतोय. त्यामुळे जिल्ह्यात उसाच्या लागवडीच्या प्रमाणात वाढ झाली आणि यामुळेच आता अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर साखर कारखानदारांकडून मनमानीपणा केला जात आहे. परजिल्ह्यातून ऊस आयात केला जात आहे. आपला परिसर सोडून इतर ठिकाणच्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांच्या, राजकीय नेत्यांचा ऊस अगोदर नेला जात आहे. यामुळे सर्वसामान्यांचा ऊस शेतातच पडून आहे. यामुळे आता हा ऊस घेऊन जाणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे जर एका कारखान्याचा सभासद आणि दुसऱ्या कारखान्याचा संचालकपती असणाऱ्या शत्रुघ्न तपसे यांच्यावर आत्मदहनाची वेळ येऊन ठेपली असेल तर इतर शेतकऱ्यांवर काय वेळ असणार आहे. याचा विचार होणे गरजेचे असून, ऊस घेऊन जाणे महत्वाचे आहे. अन्यथा बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.