बीडच्या सुपुत्रानं अमेरिकेत रचला इतिहास; ३० वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

26

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.7मे):- जिल्ह्यातील सुपुत्र आणि भारतीय लष्करात सेवा बजावत असलेल्या अविनाश साबळे यानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अमेरिकेच्या सॅन जुआन कॅपिस्ट्रानो येथे साउंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये ५००० मीटर शर्यत १३:२५.६५ या वेळेत पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर नोंदवला. भारतीय लष्करात सेवेत असलेल्या अविनाश साबळे यानं बहादुर प्रसाद यांचा ३० वर्षे जुना विक्रम मोडला. अविनाश साबळे यानं ५००० मीटर शर्यतीत बहादुर प्रसाद यांचा ३० वर्षे जुना विक्रम मोडून इतिहास रचला. २७ वर्षीय अविनाश याने अमेरिकेतील या स्पर्धेत हा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. साबळे या शर्यतीत १२व्या स्थानी राहिला.

टोकिओ ऑलिम्पिकमध्ये १५०० मीटरमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नॉर्वेचा जेकब इंगेब्रिग्त्सेन यानं विजेतेपद पटकावलं. त्यानं १३: ०२.०३ सेकंदात शर्यत पूर्ण केली. बहादूर प्रसाद यांनी १९९२ मध्ये बर्मिंगहॅममध्ये १३: २९.७० सेकंदात राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली होती. ३० वर्षे हा विक्रम अबाधित होता. अविनाश हा सध्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी अमेरिकेत आहे. अविनाश भारतीय लष्करात कार्यरत असून, तो महाराष्ट्रातील बीड येथील रहिवासी आहे.

टोकिओ ऑलिम्पिकमध्येही मोठी कामगिरी

३००० मीटर स्टीपलचेजमध्ये अविनाश यानं राष्ट्रीय विक्रम रचला आहे. त्याने अनेकदा ३००० मीटर स्टीपलचेजमध्ये स्वतःचेच विक्रम मोडीत काढले आहेत. त्याने मार्चमध्ये तिरुवअनंतपुरममध्ये भारतीय ग्रां प्री-२ मध्ये ८:१६.२१ सेकंदात शर्यत पार केली आहे. त्याने ही कामगिरी सातव्यांदा केली आहे. त्याने गेल्या वर्षी टोकिओ ऑलिम्पिकमध्ये ८: १८.१२ सेकंदात हे अंतर कापून राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला होता. अमेरिकेत यूजीनमध्ये १५ ते २४ जुलै दरम्यान होणाऱ्या जागतिक चॅम्पियनशिपसाठी तो आधीच पात्र ठरला आहे.