देशाला भाजपमुक्त करण्याचे डॉ राऊत यांचे आवाहन

29

✒️जगदीश का. काशिकर(विशेष प्रतिनिधी)मो:-९७६८४२५७५७

मुंबई(दि.11मे):- सध्या धर्मांध शक्तीमुळे देशाच्या स्वातंत्र्याला व एकात्मतेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा एखादा आपण सगळ्यांनी देशाला भाजपमुक्त करण्यासाठी संघर्ष केला पाहिजे, असे
आवाहन ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी केले.

आधुनिक भारताचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय अनुसूचित जाती आणि जमाती कर्मचारी कल्याण संघटना ओएनजीसी, मुंबईच्या वतीने ओएनजीसी ऑडीटोरियम येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्ती स्वातंत्र्य व मानव मुक्तीचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांनी देशातील जनता गरिबी व दारिद्र्यातून बाहेर आली पाहिजे, यासाठी सार्वजनिक उपक्रमांच्या स्थापनेला महत्व दिले. मात्र भारतीय जनता पार्टीचे सरकार जनतेच्या पैशावर उभ्या झालेल्या या सार्वजनिक उपक्रमांना कवडीमोल भावाने मूठभर भांडवलदाराच्या घशात घालून बेरोजगारी व आर्थिक विषमतेला खतपाणी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सार्वजनिक क्षेत्राच्या खाजगीकरणामुळे रोजगार नष्ट होत असून बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढली आहे. एकीकडे सर्वसामान्य जनतेला गरिबीच्या खाईत लोटले जात असून काही मूठभर लोक हे अब्जाधीश होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असल्याचे डॉ राऊत म्हणाले.

सार्वजनिक उपक्रमातील आरक्षणाच्या माध्यमातून बहुजन व विशेषतः मागासवर्गीयांना रोजगाराच्या संधी काँग्रेसने उपलब्ध करून दिल्यात. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमुळे सर्वसामान्य जनतेलाही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. यामुळे काही प्रमाणात का होईना, मागासवर्गीय समाजाला पुढे जाता आले. मात्र याउलट आता मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करण्याचा घाट घातला जात आहेत. तसेच खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी लढा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

सर्व प्रकारच्या आर्थिक, मानसिक, सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून त्यांना मुक्ती मिळाली पाहिजे, ही बाबासाहेबांची स्वातंत्र्याविषयीची भूमिका होती. मात्र धर्म व जातीच्या नावाने जनतेमध्ये तेढ निर्माण करून देशाला गुलामगिरीत ढकलण्याचा डाव भाजपा व आरएसएस यांच्याकडून आखला जात असल्याचा आरोप डॉ राऊत यांनी केला.

काँग्रेस पक्षाने गेल्या 70 वर्षात देशात लोकशाही रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हिंदुत्वाच्या नावावर देशातील लोकशाही व्यवस्था उलथून टाकण्याचा डाव रचला आहे,असा आरोप त्यांनी केला.

या कार्यक्रमा दरम्यान अखिल भारतीय अनुसूचित जाती आणि जमाती कर्मचारी कल्याण संघटना ओएनजीसी, मुंबईच्या भीमसंदेश पत्रिकेचे व सोशल मीडियाच्या सर्व डिजिटल फ्लॅटफॉर्म तसेच seva.ongc या संकेतस्थळाचे अनावरण माझ्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ओएनजीसीचे संचालक(अन्वेषण राजेश कुमार श्रीवास्तव, भंत्ते डॉ आनंदा, प्रा.डॉ विजय खरे, विजय राज(ईडी एचआर, ओएनजीसी), ओएनजीसीचे महाव्यवस्थापक (उत्पादन) व संघटनेच अध्यक्ष जागेश कुमार ह. सोमकुवर, सचिव रघुनाथ कारगावकर उपस्थित होते.