“खामगाव महावितरणच्या बेबंदशाहीला ग्राहक मंचाचा तडाखा “

42

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

बुलढाणा(दि.18मे):-खामगाव येथील महावितरण उपविभागीय शहर कार्यालयाने वीज ग्राहकास दिलेल्या अवास्तव बिलाबाबत ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली असता आणि त्या तक्रारीसंदर्भात उत्तर सादर करण्याबाबत महावितरण कार्यालयाकडून दिरंगाई केली असता, मा. ग्राहक तक्रार निवारण मंचाने जवळपास पाऊणे दोन लाखाचे वीज देयक रद्द करून महावितरणच्या बेबंदशाहीला जबरदस्त तडाखा दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वर्धन ले आऊट, सूटाळा खु खामगाव येथील श्रीकृष्ण सांबरे नामक शिक्षक यांच्या घरगुती वीज जोडणीबाबत सदोष मिटर आधारे जवळपास एक वर्षांपासून वीज वापरापेक्षा अत्यंत कमी वीज वापर म्हणजे दरमहा केवळ पाच ते सहा युनिट वीज वापराची देयके मिळत होती. त्यासंदर्भात सांबरे यांनी सदर बाब अनेकदा महावितरण खामगाव उपविभाग (शहर ) यांचे निदर्शनास आणून दिली. मात्र संबंधित अधिकारी यांनी नेहमीप्रमाणे ग्राहक तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते. सदरचा प्रकार सातत्याने सुरु असल्यामुळे सांबरे यांनी दि 20 ऑक्टोबर 2021 रोजी महावितरण कार्यालयाकडे अर्ज सादर करून वीज वापरानुसार वीज बिल देण्याची मागणी केली होती. महावितरण कार्यालयाने मात्र ग्राहक तक्रार निवारण करण्याऐवजी सांबरे यांनाच प्रतिमाह 540 युनिट वीज वापर दर्शवून जून 2019 ते सप्टेंबर 2021पर्यंत म्हणजे 28 महिन्यांचे चक्क रु 1, 67, 555.47 (एक लक्ष सदुसष्ठ हजार पाचशे पंचावन्न रुपये सत्तेचाळीस पैसे )चे वीज बिल दिले होते.

आणि त्या बेकायदेशीर वीज बिलाबाबत वीज कायद्याच्या कलम 56(1) नुसार नोटीससुद्धा बजाउन वीज पुरवठा खंडित करण्याची धमकी दिली होती. याबाबत श्री सांबरे यांनी महावितरण कार्यालयास ऍड पंजवानी यांचे मार्फत दि. 29/1/2022 रोजी कायदेशीर नोटीस बजावून प्राप्त वीज बिल कोणत्या आधारे देण्यात आले याची विचारणा केली होती. परंतु महावितरण कार्यालयाकडून या नोटिसीचे काही एक उत्तर न मिळाल्याने श्री सांबरे यांनी मा ग्राहक तक्रार निवारण मंच, महावितरण अकोला परिमंडळ यांचे कडे तक्रार क्र 44/2022 दि. 9/3/2022 रोजी दाखल केली होती. तसेच नियमानुसार वीज बिलाच्या पन्नास टक्के अनामत रक्कम भरणा करून वीज जोडणी खंडित न करणेबाबत स्थगन आदेश मिळविला होता. सदर तक्रार प्रकरणी मा मंचाने दि 10/3/2022 रोजीच्या नोटीसद्वारे महावितरणचे बुलढाणा मंडळ स्तरीय कार्यकारी अभियंता (प्रशासन )यांना चौकशी अधिकारी म्हणून दि. 31/3/2022 पर्यंत ऊत्तर सादर करण्यास फर्मावले होते परंतु त्यांनी विहित मुदतीत तसेच तक्रारीच्या सुनावणी पर्यंतही योग्य ते उत्तर सादर केले नव्हते. मा मंचासमोरील सुनावणीच्या वेळी श्री सांबरे यांचे वतीने युक्तिवाद करून महावितरणचे उत्तरच बेजबाबदारपणे सादर झालेले नसल्याने त्यांना आता उत्तर दाखल करण्यास परवानगी मिळू नये ही विनंती करण्यात आली.

तसेच मिटर तपासणी व देखभाल ही पूर्णतः महावितरणचीच जबाबदारी आहे आणि असे अवास्तव वीज बिल देण्याचा व त्या आधारे नोटीस बजावण्याचा महावितरणला कोणताही कायदेशीर अधिकार नाही हे सिद्ध करण्यात आले. मा मंचाने उभयपक्षांचा युक्तिवाद ऐकून दि. 9/5/2022 रोजी असा आदेश पारित केला की श्री सांबरे यांना दिलेले मागील 28 महिन्यांसाठीचे रु 1, 67, 555.47 /- चे गैरकायदेशीर वीज बिल रद्द करण्यात येत आहे. तसेच ग्राहकास केवळ मागील सहा महिन्यांचेच देयक देण्यात यावे. त्यामुळे ग्राहकांना अवास्तव वीज बिल देण्याबाबत महावितरण खामगाव (शहर ) उपविभागीय कार्यालयाच्या बेबंदशाहीस मा ग्राहक तक्रार निवारण मंचाने जबरदस्त तडाखा दिला आहे.मा मंचासमोरील कार्यवाहीत वीज ग्राहक श्री सांबरे यांचे वतीने श्री प्रमोद खंडागळे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना यांनी बाजू मांडली.