बीड : विहिरीत सापडलेल्या अर्धवट मृतदेहाचा उलगडा; तीन प्रियकरांनी केले प्रेयसीच्या पतीचे दोन तुकडे

31

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.20मे):-शेलगावथडी शिवारातील विहिरीत ११ मे, २०२२ रोजी कमरेच्या वरचा भाग नसलेला मृतदेह सापडला होता. या अज्ञात मृतदेहाचा अखेर उलगडा झाला आहे. बाभळगाव येथून बेपत्ता असलेले निराधार समितीचे माजी सदस्य दिगंबर हरिभाऊ गाडेकर यांच्या पत्नीच्या तीन प्रियकरांनीच दिगंबर याच्या शरीराचे दोन तुकडे करत, त्यांचा खून केला. या घटनेतील आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

घडलेली घटना अशी की, निराधार समितीचे माजी सदस्य दिगंबर हरिभाऊ गाडेकर हे नऊ महिन्यांपासून बाभळगाव येथून बेपत्ता होते. अचानक त्याचा मृतदेह शेलगावथडी शिवारातील विहिरीत अर्धवट मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. त्यांच्या खुनास अखेर वाचा फुटली आहे. दिगंबर हरिभाऊ गाडेकर यांच्या पत्नीच्या तीन प्रियकरांनी कट रचून पळवून त्यांना पळवून नेले. जालना जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेल्या रिधोरीच्या बंधाऱ्यावर त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी (दि.२०) या तिघांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक रश्मीता राव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला.

याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सप्टेंबर २०२१ मध्ये दिंद्रुड पोलिस ठाण्यात कुटुंबीयांनी गाडेकर हे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, बुधवारी (दि.११) शेलगावथडी शिवारात असलेल्या बापूराव डोके यांच्या शेतातल्या विहिरीत अज्ञात व्यक्तीचा कंबरेवरील भाग नसलेला मृतदेह दिसून आला. पोलिसांनी आजूबाजूच्या गावात याबाबत विचारणा केली असता, जवळपासचे कोणीही हरवल्याची घटना घडलेली नव्हती. यामुळे पोलिसांना तपास करण्यात अडथळे निर्माण होऊ लागले. अखेर मृतदेहावर असलेल्या पॅन्टच्या खिशात काही महिलांचे फोटो आढळून आले. त्या महिलांचा शोध घेऊन त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी हा मृतदेह दिगंबर गाडेकर यांचा असल्याचे त्यांनी सांगितले.

मृत दिगंबर गाडेकर हे निराधार महिलांना योजनेचे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचे, यासाठीच या महिलांनी त्यांना छायाचित्र व आधारकार्ड दिले होते. त्यावरून मृतदेहाची ओळख पटली. यानंतर पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह जोनवाल यांनी बाभळगाव येथील घरी पोलिस पथक पाठवले असता, गाडेकर याची पत्नीदेखील तेथे आढळून आली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला व पत्नीस केंद्रित करून तपास सुरू केला. यानंतर मयत दिगंबर यांचा पुतण्या गणेश नारायण गाडेकर, भाचा सोपान सोमनाथ मोरे (रा. उक्कडगाव, जि. जालना), बाळासाहेब जनार्धन घोंगाने (रा.मोगरा) या तिघांनी मयताच्या पत्नी सोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर येत असल्याने दिगंबर यांचा खून केल्याची कबुली दिली. जिल्ह्याच्या बॉर्डरवर नेऊन रिधोरी बंधाऱ्याच्या ठिकाणी मृत दिगंबर याचे कुऱ्हाडीने शरीराचे दोन तुकडे करून, ते दोन पोत्यात बांधून शेलगावथडी शिवारातील विहिरीत टाकले होते.

बुधवारी (दि.११) विहिरीतील मृतदेह तरंगत वर आल्याने, हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर गुरुवारी (दि.१९) पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, रश्मीता राव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, उपनिरीक्षक बोडखे, रवी राठोड, खराडे यांनी छडा लावला.