सुमेध जाधव-आंबेडकरी चळवळीतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व

शहिर पँथर भागवत जाधव अन् पँथर सि. रा. जाधव या दोन्ही बंधूंची ओळखचं नाही तर त्यांच्या कार्याचा वारसा दमदारपणे चालवणारे पँथर सुमेध जाधव म्हणजे आंबेडकरी चळवळीतील एक निडर, अभ्यासू, परिवर्तनशील, कृतीशील, संयमी, झुंजार, सामाजिक बांधिलकी अन् समाज भावना जोपासलेले आदर्श व्यक्तीमत्व. २८ मे २०२२ रोजी त्यांनी रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर, ॲड. संघराज रुपवते, राजानंद हुमने, प्रमोद खापर्डे, दिनकर तायडे, लक्ष्मण भगत अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित हिरक महोत्सव साजरा केला असून, ३१ मे २०२२ रोजी, दामोदर हॉल परेल येथे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले, जेष्ठ साहित्यिक ज.वि. पवार, अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, जेष्ठ पत्रकार निखील वागळे, ज्ञानेश महाराव, श्यामदादा गायकवाड, आनंद पटवर्धन, सयाजी वाघमारे, युवराज मोहिते, अश्विन मलिक मेश्राम अशा विविध क्षेत्रातील मान्यवर विचारवंतांच्या प्रमुख उपस्थित सेवानिवृत्ती सन्मान सोहळा संपन्न होत आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळमधून ते ६० व्या वर्षी सेवानिवृत्त होत असले तरी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षितीजावर ते कायमचेचं तळपत राहणार एवढ मात्र नक्की. त्यांची षष्ठ्यब्दीपुर्ती व सेवानिवृत्ती म्हणजे त्यांचा उत्तरार्ध नसून, ती त्यांची जीवन स्थिरता अन् भविष्यकालिन सक्षम चळवळीचे ते वेध आहेत.

सुमेध जाधव १९८२ पासून चळवळीमध्ये कार्यरत असून, त्यांनी विविध सामाजिक विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्यांने आयोजित करुन, शहिद भागवत जाधव स्मृती केंद्र आणि मोफत कायदेशीर सल्ला केंद्रही स्थापन केले आहे तसेच त्यांनी विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. विभागातील उपेक्षित अन् होतकरु लोकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु केले असून, शहिद भागवत जाधव मेमोरियल सेंटर (शहिद भवन) लोकसहभागातून उभारण्याचा तसेच विभागातील लोकांसाठी रुग्ण वाहिका सेवा देण्याचा संकल्प आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ कार्यालय हे त्यांचे चळवळीचे केंद्र असले तरी, ते म्हणजे एक चालती बोलती चळवळच आहेत. अन्याय अत्याचार प्रकरणी प्रत्येक लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो. म्हणूनच आंबेडकरी चळवळीतील सर्व संघटना अन् नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कामगार क्षेत्रामध्येही ॲड. बाळासाहेब आंबेडकर, भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन युनियन स्थापन करुन, भारतातील आयुर्विमा महामंडळातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच अन्याय अत्याचार, विषमतेच्या विरोधात त्यांनी यशस्वी लढे देऊन अनेकांना न्याय मिळवून दिला. १९९० साली माझगांव विभाग लव्हलेन परिसरातील गुंडांच्या विरोधात जीव धोक्यात घालून अनैतिक दारु धंदे उध्वस्त करुन, त्या जागी सुभेदार रामजी आंबेडकर वाचनालय स्थापन केले. नामांतर आंदोलनामध्ये त्यांना दोन वेळा कारावास तर, १२ मार्च १९९४ रोजी निर्भय बनो आंदोलन या अन्याय अत्याचार, दहशतवादी विरोधात लढणाऱ्या संघटनेचा संघटक म्हणून सामाजिक प्रश्नासाठी आंदोलन केले म्हणून ६ वेळा कारावासही झाला होता. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन अनेक संघटनांच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सन्मान झाला असून, अनेक संघटनांनी पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे.

सुमेध जाधव यांनी पत्रकारितेच शिक्षण घेतले असून, मुंबईतील अनेक वृत्तपत्रांतून त्यांचे विविध विषयांवर लेख प्रसिध्द झाले आहेत. तसेच, जपानमधील ‘बुराकु लिबरेशन इंस्टिट्यूट सेंटर’च्या नियतकालिकामध्येही गेली चार वर्षे त्यांचे लेख प्रसिध्द होत आहेत. किरकोळ शरीरयष्टी, आश्वासक चेहरा, पांढरीशुभ्र केस दाढी, डोळ्यावर सोनेरी फ्रेमचा चष्मा, अंगात झब्बा जिन्स पॅन्ट, त्यावर जैकेट अन् हातात बैग असे चारचौघात उठून दिसणारे रुबाबदार व्यक्तीमत्व. फोर्ट भागात काही कामानिमीत्त जाणं झाले की, त्यांना कॉल करुन भेट ठरलेली असायची.

सुमेध जाधव यांचा जन्म २८ मे १९६२ रोजी भायखळा येथे झाला असून ते पदवीधर आहेत. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, नेत्यां व्यतिरीक्त वाय. सी. पवार, गो. रा. खैरनार, निळू फुले, निखील वागळे, भाई वैद्य अशा विविध क्षेत्रातील मान्यवर विचारवंतांशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यांच्या स्वभावातील गोडीने अन् जिभेवरील माधुर्याने, प्रामाणिकपणा, सौजन्यशीलपणा, अडचणीत धावून जाण्याच्या आंतरीक वृत्तीमुळे त्यांनी अनेक माणसे जोडली. सर्वांना सोबत घेऊन जातांना आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला त्यांनी कधी लहान असल्याची जाणीव होऊ दिली नाही. त्यांनी नेहमीच सर्वांना सन्मानाची, आदराची वागणूक दिली, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा नेहमीच प्रयन्त केला. पायाखाली जमीन कोणतीही असो, डोक्यावर आकाश कोणतेही असो, प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन मोठ्या आत्मविश्वासाने संघर्षमय परिस्थितीत यश संपादन करणे हाच त्यांचा निस्वार्थी, सर्वसमावेशक, व्यापक दृष्टिकोण त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देते. अशा लोकप्रिय, प्रेरणादायी व्यक्तीमत्वास, उपेक्षितांच्या आधारस्तंभास अन् नेतृत्वास षष्ठ्यब्दीपुर्ती तसेच सेवानिवृत्तीनिमीत्त त्यांच्या पुढील यशस्वी, उज्वल, दमदार वाटचालीस अन् सुरक्षित, निरोगी दिर्घायुष्यासाठी मंगल कामना व्यक्त करतो.

✒️मिलिंद कांबळे(चिंचवलकर)मो:-९८९२४८५३४९

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED