राष्ट्रीय महामार्गाचे ५१ तास; 17845 रानिंग मीटर रस्त्यांचे काम पूर्ण

30

✒️अमरावती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमरावती(दि.5जून):-राष्ट्रीय महामार्ग-6 वर लोणी ते मुर्तीजापूर पर्यंत एकूण 5 दिवसात 75 किलोमीटरचा महामार्ग पुर्ण करुन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मिळविण्याचे ध्येय घेऊन राजपथ इंफ्राकॉनची 750 लोकांची टीम हळूहळू आपल्या लक्षपुर्तीकडे जात आहे. माना गावाच्या 1 किलोमीटर अगोदर असलेल्या तीन पुलांमुळे निर्माण झालेली गुंतागुतीची प्रक्रीया शनिवार (4जून) रोजी पुर्ण करण्यात आली. यावेळी तब्बल दिड तासाहून अधिक काळ या मार्गावर वाहतुक खोळंबली होती. परंतू हा टप्पा पुर्ण करुन लगेच वाहतुक नियमीत करण्यात आली. 5 जून रोजी 2 days, 3 तासाचा (एकूण ५१ तास) कालावधी उलटून गेला तेव्हा 17845 रानिंग मीटर म्हणजेच दोन लेन मिळून 35 किमीचे काम निर्विघ्नपणे पार पडले होते.

व्यवस्थापकीय संचालक जगदीश
कदम म्हणाले की, कोरोना काळात कंपनीचे 1200 व इतर असे 1700 कर्मचा: यांच्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न माझ्यासमोर उद्भवला होता. मोठ्याप्रमाणात नकारात्मकता निर्माण झालेली होती. परंतू खचून न जाता, सर्वांना 100 टक्के वेतन दिले. कोरोना काळातच कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी येथे 30 किलोमीटरच्या मार्गाचे अत्यंत कमी वेळात काम संपवुन आम्ही लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदविला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याहून मोठा विक्रम महामार्गाच्याबाबतीत करावा अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर आम्ही लोणी ते मुर्तीजापूर या मार्गावर विश्वविक्रम करण्याचे ठरविले आणि कामाला लागलो. हा विक्रम केला जात असताना मार्गाच्या गुणवत्तेसोबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. येथून 15 वर्ष या मार्गाला काही होणार नाही, याची हमीसुध्दा जगदीश कदम यांनी यावेळी घेतली. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून अनेक गोष्टी शिकून आज मी या ठिकाणी पोहचलो असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या ‘वॉर रुमला’ जावळी हे नाव दिल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.

लोणी ते मुर्तीजापूर 75 किमी कसे?

अनेकांना एकच प्रश्न पडला आहे, की अकोला महामार्गावरील लोणी ते मुर्तीजापूर अवघ्या 34 किमीचे अंतर असताना 75 किमीचा वर्ल्ड रेकॉर्ड कसा बनत आहे ? , नियमानुसार चौपदीकरणाचा मार्ग हा एकुण 18 मीटर रुंदीचा असतो. या मार्गाची एक बाजु ही साधारणत: 9 मीटरची रुंदीची असते, या 9 मीटरचे दोन भाग म्हणजे दुपदरी, अशा प्रमाणे 4.5 मी. अधिक 4.5 मी.याप्रमाणे या मार्गाच्या निर्माण कार्याची लेंन मोजल्या जाते. या दोन लेनचे काम हे डबलने मोजल्या जाते. जे एकुण 75 किमीचे होत आहे. या कामावर कायमस्वरुपी ड्रोन व व्हिडीओ कॅमेरे लक्ष ठेवून आहेत. इतकेच नाहीतर गिनीज बुकची 12 लोकांची अत्यंत प्रशिक्षीत व जानकार टीमही याचे मोजमाप करित आहे. अमेरिकेच्या अॅक्युवेदर या संस्थेकडून हवामानाची माहिती काढल्यानंतरच 3 ते 7 जून कामाचे दिवस निवडले गेले आहे.