लाल मातीचा बादशहा राफेल नदाल

29

लाल मातीचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा महान टेनिसपटू राफेल नदालने नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळवून आपणच लाल मातीचा बादशहा ( क्ले कोर्ट ) असल्याचे सिद्ध केले. ज्या वयात क्रीडापटू निवृत्ती पत्करून समालोचन करतात त्या वयात म्हणजे वयाच्या ३६ व्या वर्षी नदालने हे विजेतेपद पटकवले आहे ते ही त्याच्यापेक्षा वयाने १४ वर्षाने लहान असलेल्या कॅस्पर रुढ या खेळाडूचा पराभव करून. फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात नदालने रूढचा ६- ३, ६-३, ६-० असा धुव्वा उडवला तोही अवघ्या २ तास १८ मिनिटात. विशेष म्हणजे हे त्याचे विक्रमी १४ वे फ्रेंच ओपन विजेतेपद आहे इतकेच नाही तर त्याने त्याच्या कारकिर्दीत सर्वाधिक २२ ग्रँडस्लॅम जिंकून विश्वविक्रम केला आहे. त्याचे प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोंकोव्हीच यांनी अनुक्रमे २० ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.

राफेल नदाल फ्रेंच ओपन जिंकणारा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत तो पूर्ण फिट नव्हता काही सामने तर त्याने दुखऱ्या पायात इंजेक्शन घेऊन खेळले. पूर्ण फिट नसतानाही त्याने ही ग्रँडस्लॅम जिंकली ती केवळ जिद्दीच्या जोरावर. फ्रेंच ओपन टेनिस कोर्टवरील लाल माती ज्याप्रमाणे चिकट, चिवट आणि सकस असते तसाच नदाल आहे तो एकदा कोर्टवर उतरला की मागे वळून पाहत नाही. कोर्टवर उतरायचे ते केवळ जिंकण्यासाठी ही जिद्द ठेवून तो कोर्टवर उतरतो आणि आपली जिद्द पूर्ण करतो. ३ जून १९८६ रोजी राफेल नदालचा जन्म झाला. स्पेनच्या एका बेटावर एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील एक छोटेशे रेस्टॉरंट चालवतात त्याचे काका फुटबॉलपटू होते त्यांनी राफेलची गुणवत्ता हेरुन त्याच्या हाती रॅकेट दिली. त्यानेही लहानवयातच टेनिसमधील कौशल्य प्राप्त केले. वयाच्या आठव्याच वर्षी त्याने १२ स्पर्धा जिंकल्या. वयाच्या आठव्या वर्षी सुरू झालेला राफेलचा हा विजयी रथ आज वयाच्या ३६ व्या वर्षीही अविरत चालू आहे. नदालने त्याच्या कारकिर्दीत आजवर ९२ स्पर्धा जिंकल्या आहेत.

त्याने चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणजे फ्रेंच, विम्बल्डन, अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत त्यातही फ्रेंच ओपन स्पर्धा त्याने १४ वेळा जिंकून इतिहास घडवला आहे. फ्रेंच ओपन स्पर्धा ही या चारही ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सर्वाधिक अवघड स्पर्धा समजली जाते कारण ही स्पर्धा मातीच्या मैदानावर खेळवली जाते. विम्बल्डन स्पर्धा ग्रासकोर्टवर म्हणजे हिरवळीवर खेळवली जाते तर ऑस्ट्रेलियन आणि अमेरीकन स्पर्धा सिंथेटिक कोर्टवर म्हणजे काँक्रीटवर खेळवली जाते. विम्बल्डनच्या हिरवळीवर चेंडू वेगाने उसळतो तर हार्डकोर्टवर मध्यम उसळतो त्यामुळे चेंडू रॅकेटवर व्यवस्थित येतो मात्र मातीच्या कोर्टवर चेंडू हळूवार येतो त्यामुळे प्रतिस्पर्धी पळत जाऊन चेंडू पर्यंत पोहचण्याची शक्यता अधिक असते. खेळाडूंनाही फटके मारण्यासाठी अधिक जोर लावावा लागतो. अशावेळी शारीरिक क्षमतेचा कस लागतो कदाचित त्यामुळेच रॉजर फेडरर सारख्या महान खेळाडूला देखील ही स्पर्धा केवळ दोन वेळाच जिंकता आली. आर्थर एश, बोरिस बेकर, पिट सॅम्परस, स्टीफन एडबर्ग, जॉन मॅकनरो या सारख्या दिग्गज आणि महान खेळाडूंना तर फ्रेंच ओपन चषकावर एकदाही नाव कोरता आले नाही म्हणूनच जगातील सर्वाधिक अवघड समजली जाणारी आणि भल्या भल्या खेळाडूंच्या आवाक्यात न आलेली फ्रेंच ओपन स्पर्धा विक्रमी १४ वेळा जिंकून इतिहास घडवणारा राफेल नदाल हा लाल मातीचा बादशहा ठरतो.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)