ठाणे,पालघर,नाशिक जिल्ह्यात आरोग्य सेवा मरण पंथाला-श्रमजीवी संघटना चा आरोप

31

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.8जून):- महाराष्ट्र राज्यासह ठाणे,पालघर, नाशिक जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडून गेली आहे, आरोग्य संस्था मरणपंथाला आल्या आहेत, यावर आज श्रमजीवी संघटनेने एक अभिनव आंदोलन केले. उपचारासाठी डॉक्टर देण्यात शासन कुचकामी ठरल्याने आज श्रमजीवी संघटनेने संतप्त होऊन चक्क ग्रामीण भागातील पारंपरिक भगत (देव अंगात घेऊन उपचार करणारा पारंपरिक तांत्रिक) यांचा पारंपरिक नवीन भगत तयार करण्याचा रवाळ हा कार्यक्रम केला, यात सुमारे 20 भगतांचा पदवीदान कार्यक्रम करत यांना आरोग्य सेवेत शासनाने नियुक्त करावे अशी मागणी करत शासनाचे लक्ष वेधले.

ठाणे, पालघर, नाशिकच नव्हे तर राज्याची आरोग्य व्यवस्था अक्षरशः मरणपंथाला आली आहे, गरिबांना उपचराचाराचा आधार असलेल्या, मोफत उपचार देण्याचे बंधन असलेल्या शासकीय रुग्णालय संस्थाच व्हेंटिलेटरवर गेल्याची स्थिती आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोवीस मे रोजी एकाच वेळी एकाच दिवशी ठाणे पालघर नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालये उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालय अचानक भेट देत तेथील परिस्थितीचा पंचनामा केला. तेथील  विदारक वास्तवाचा संघटनेने पार पोस्टमार्टेमच केले आहे. या पाहणी दौऱ्यातील माहितीचे विश्लेषण करून एक अहवाल श्रमजीवी संघटनेने प्रकाशित केला असून ‘मरण पावलेल्या आरोग्य व्यवस्थेचे पोस्टमार्टेम’ असे शीर्षक या अहवालाला देऊन श्रमजीवी संघटनेने आरोग्य संस्थांच्या कोलमडलेल्या अवस्थेला सर्वांसमोर आणले आहे.

गरीब सामान्य माणूस उपचारावाचून तडफडत आहे, खाजगी संस्था उपचार तर देतात मात्र महागडी बिलं अनेकांना कर्जबाजारी बनवत आहेत. हजारो कुपोषण ग्रस्त बालकं, गर्भवती माता, नवजात अर्भक मृत्यु शय्येवर जात आहेत. मात्र यावर कोणीही बोलायला तयार नाही. या उलट देशात-राज्यात मंदिर,मस्जिद ,भोंगा, दौरे, जात, धर्म ,पंथाचे वाद यावरच राजकारण सुरू आहे.  सत्ताधारी किंवा  विरोधक कोणीही गरीब सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत.  याबाबत श्रमजीवी संघटनेने व्यक्त केला आहे आणि आणि आरोग्य ही जीवनावश्यक सेवा प्रत्येक गरीब सामान्य रुग्णाला हक्काने मिळायलाच हवी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वांना दर्जेदार मोफत उपचार मिळायलाच हवा यासाठी आता श्रमजीवी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. श्रमजीवी संघटना संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली  24 मे रोजी दिवसा तर 31 मे रोजी मध्यरात्री संघटनेने वेगवेगळ्या टीम बनवून केलेल्या पंचनामा यातून समोर आलेल्या माहितीत धक्कादायक प्रकार समोर आले आहेत, तब्बल 1000 पेक्षा जास्त कार्यकते या कामासाठी फिरत होते. माहितीचे एकत्रीकरण करून प्रकाशित केलेला हा ‘पोस्टमार्टेम’ अहवाल म्हणजे आरोग्य संस्थेच्या मरणासन्न अवस्थेचा पोस्टमार्टेम रिपोर्टच म्हणावा लागेल.
याच प्रश्नावर आज 6 जून रोजी श्रमजीवी संघटनेने मोठे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले. यात मरण पावलेल्या या आरोग्य व्यवस्थेवर उपचार म्हणून गावागावात भगत, मांत्रिक यांना आरोग्य केंद्राचे प्रमुख घोषित करावे अशी उपरोधिक मागणी करत “भगतांचा पदवीदान सोहळा” म्हणजेच पारंपरिक ‘रवाळ’ (अंगात देव घेऊन जागर करण्याचा कार्यक्रम) ठाण्यात लक्षवेधी ठरले. 

”आरोग्य विभागाची दयनीय अवस्था”

 

२ लाख ३४ हजार लोकांमागे फक्त १ रुग्णालय राज्याची अंदाजित लोकसंख्या १२ कोटी ४ ९ लाख इतकी आहे . राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची संख्या ५०३ आहे . यामध्ये खाटांची संख्या २६,८२३ आहे . राज्याची सरासरी लक्षात घेता २ लाख ३४ हजार ६०१ लोकसंख्येमागे एक रुग्णालय किंवा तब्बल ४ हजार २६४ लोकांमागे १ खाट उपलब्ध आहेत . याचा अर्थ आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यावर काय दारुण अवस्था होईल याचा शासनाने विचार होणे गरजेचे आहे . तशी परिस्थिती आपण कोरोना काळात बघितली आहे .जागतिक आरोग्य सेवेच्या निकषानुसार ४० लोकसंख्येमागे एक रुग्ण खाट असणे आवश्यक आहे . राज्यात प्रत्यक्षात मात्र ४ हजार २६४ लोकांमध्ये एक रुग्ण खाट उपलब्ध आहे.

राज्याच्या आरोग्य विभागात २० हजार ५४४ पदे रिक्त आहेत
 महाराष्ट्र राज्याला सक्षम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी आवश्यक आहे . राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागात जिल्हा परिषदेतील कर्मचारी वर्ग वगळता उपलब्ध असणारा वर्गनिहाय कर्मचाऱ्यांची ६२ हजार ६३४ पदे मंजूर असताना फक्त ४२ हजार ९ ० पदे भरलेली आहेत . तर २० हजार ५४४ पदे रिक्त आहेत . म्हणजेच आजही मंजूर असलेली ३३ % पदे रिक्त आहेत . राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांची ११ हजार ३५० पदे मंजूर असताना फक्त ९ हजार ३८६ पदे भरली असून १ हजार ९ ५५ पदे रिक्त आहेत .

ठाणे-पालघर-नाशकात ६१ % मनुष्यबळावर प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार ठाणे पालघर , नाशिक जिल्ह्यातील प्रत्यक्ष पंचनामा केलेल्या ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रिक्त पदांमध्ये आरोग्य सहाय्यक ५३ मंजूर पदांपैकी केवळ ३२ पदं भरलेली असून २१ पदं रिक्त आहेत आरोग्य सहाय्यिका ६५ मंजूर पदांपैकी ५२ पदं भरलेली असून १३ रिक्त आहेत . आरोग्य सेवकाची २४१ पदं मंजूर असून १५४ पदं भरलेली तर तब्बल ८७ पदं रिक्त आहेत तर आरोग्य सेविकेची मंजूर २९५ पदांपैकी २१० पदं भरलेली असून ८३ पदं रिक्त आहेत . जीएनएम च्या ४२ मंजूर पदांपैकी ३९ पदं भरलेली असून ३ पदं रिक्त आहेत . औषध निर्माता ४९ मंजूर पदांपैकी ३८ कार्यरत असून ११ पदं रिक्त आहेत . प्रयोग शाळा तंत्रज्ञ मंजूर ५९ पदांपैकी ४६ पदं भरलेली असून १३ पदं रिक्त आहेत वाहन चालक मंजूर ५९ पदांपैकी २२ पर्द भरलेली असून ३७ पदं रिक्त आहेत . शिपाई २३० पदं मंजूर असून ८४ पद भरलेली असुन १४७ पदं रिक्त आहेत आणि सफाई कामगारांच्या मंजूर ७५ पदांपैकी ३६ कार्यरत असून ३९ पदं रिक्त आहेत . म्हणजेच सर्वेक्षणातीलब एकूण ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहयाक आणि कर्मचार्याच्या ११६८ मंजूर पदांपैकी ७१३ पदं भरलेली असून ४५५ पदं रिक्त आहेत. अर्थात ३९ % पदं हि रिक्त असून ६१ % मनुष्यबळावर प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार सुरु आहे .

रोज मृत्यूच्या दाढेत जाणाऱ्या निष्पाप रुग्णांना,बालकांना, गर्भवती मातांना झालेल्या मरणयातना आता थांबायला हव्यात यासाठी श्रमजीवी आक्रमक भूमिकेत दिसली.संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा, कार्याध्यक्षा स्नेहा दुबे पंडित, उपाध्यक्ष दत्तात्रेय कोळेकर, लक्षण सवर, सरचिटणीस बाळाराम भोईर, विजय जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, उपाध्यक्ष प्रमोद पवार, संगीता भोमटे, जया पारधी, सीता घाटाळ इत्यादी पदाधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिले.याबाबत तातडीची बैठक लावण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यावेळी संगीतले. आंदोलनात नाशिक जिल्हाध्यक्ष रामराव लोंढे, रायगड जिल्हाध्यक्ष हिरामण नाईक, ठाणे,पालघर जिल्हा सचिव राजेश चन्ने,दशरथ भालके, गणेश उंबरसडा, किशोर मढवी इत्यादी पदाधिकारी सहभागी होते. जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, उपाध्यक्ष नरेश वरठा यांनी केलेली भगताची वेशभूषा लक्षवेधी ठरली