गुड शेपर्ड स्कुलमध्ये शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा

39

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.16जून) — येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आज शाळेच्या दिवशी आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रत्येक विद्यार्थाला चॉकलेट देऊन त्यांचे तोंड गोड करण्यात आले.कोरोनाच्या प्रदीर्घ संघर्षमय कालावधी नंतर आज शाळेत विद्यार्थ्यांच्या येण्याने एक वेगळाच उत्साह आणि आनंद अनुभवायला मिळाला. नवीन प्रवेशित विद्यार्थी तसेच जुन्या विद्यार्थांपैकी काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला.

आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून माध्यमिक च्या मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांनी शाळा बंद असतांना झालेल्या शैक्षणिक नुकसान बाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे या नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षणप्रवाह सुरळीत चालावा असा आशावाद व्यक्त केला. शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे शब्दसुमनांनी स्वागत केले तसेच नवीन शैक्षणिक वर्षासाठी सदिच्छा दिल्या. आजच्या या पहिल्या दिवसाच्या उत्साहवर्धक वातावरणात सर्व विद्यार्थांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद बरंच काही सांगून जात होता. कार्यक्रमाला विद्यार्थी – विद्यार्थांनी, सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.