महानायक वसंतराव नाईक यांचा जीवनपट..

36

🔸माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख

✒️लेखक:-अजय रमेश चव्हाण

(तरणोळी ,मो:-8805836207)

महानायक,हरितक्रांतीचे प्रणेते,आदर्श पंचायतराज योजनेचे प्रणेते,नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, एक आदर्श मुख्यमंत्री अशा अनेक नावांची गुंफण आपल्या लाडक्या नेत्यांना म्हणजेच मा. माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांना लाभलेली आहे.त्यांचा जन्म यवतमाळ येथील पुसद तालुक्यातील गहुली या गावी १ जुलै १९१३ साली झाला.त्यांच्या वडिलांचे नाव फुलसिंग चत्रुसिंग राठोड तर आईचे नाव हुणकीबाई होते.चत्रुसिंग राठोड म्हणजेच त्यांचे आजोबा हे तांड्याचे प्रमुख असल्याने त्यांना “नायक” म्हणून संबोधल्या जाऊ लागले.वसंतराव नाईक यांचे प्राथमिक शिक्षण उमरी,पोहरादेवी अशा निकटच्या गावी झाले.प्रतिकूल परिस्थिती आणि शिक्षणाची जिद्द यामुळे त्यांनी प्राथमिक शिक्षणापासूनच खडतर प्रवासाला आणि संकटाशी झुंज द्यायला सुरुवात केली.
प्राथमिक शिक्षण पूर्ण होताच त्यांनी नागपूरच्या मेरिस महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि १९३३ मध्ये नेलसीटी हायस्कुलमधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.त्यानंतर १९३७ मध्ये नागपूर विद्यापीठातून बी.ए व १९४० साली एल.एल.बी परीक्षा उत्तीर्ण होऊन १९४१ मध्ये मा.पंजाबराव देशमुख यांच्या सोबत यवतमाळ,पुसद येथे वकिलीच्या व्यवसायाला सुरुवात केली.त्यांनी गोरगरिबांच्या वेदना, जगण्यासाठी करावी लागलेली धडपड,शेतकऱ्यांच्या व्यथा,मजूर वर्गांचे शोषण,पाणीटंचाई,दुष्काळ ह्या सगळ्या समस्या अतिशय जवळून बघितले असल्याने ह्या सगळ्यांवर काहीतरी उपाय निघायला हवा,हे त्यांना मनोमन वाटायचे.समाजात असलेली विषमता मिटवण्यासाठी त्यांनी १६ जुलै १९४१ रोजी वत्सला घाटे नामक ब्राम्हण कन्येशी विवाह करून समाजहितासाठी झटण्याचे ठरवले आणि यातूनच त्यांचा संबंध राजकारणात जोडला जाऊ लागला.
सर्वात आधी त्यांनी शेतकऱ्यांना समृद्ध बनवण्यासाठी व त्यांच्या दुःख निवारणासाठी ७४ कलम पास व्हावे यासाठी धडपड करण्यास सुरुवात केली व त्यांचे हे कार्य बघून ते लोकांच्या पसंतीस उतरू लागले.त्यामुळे ते १९४३ साली निवडणूक जिंकून पुसद कृषी मंडळाचे अध्यक्ष झाले व आपल्याला मिळालेल्या या सुवर्ण संधीचा लाभ उचलून त्यांनी लोकोत्तरांची कामे करण्यास सुरुवात केली.त्यांच्या ह्या कार्याला पाहून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष फार चकित झाले आणि त्यांनी नाईक साहेबांना काँग्रेस पक्षात येण्याची विनंती केली.त्यांच्या या विनंतीला मान देऊन त्यांनी १९४६ साली काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्याच वर्षी ते पुसद नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले.त्यांनी त्यानंतर तालुकाध्यक्ष, मध्यप्रदेश सहकारी बँकेचे संचालक अशा विविध पदे भूषवून १९५६ साली उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.गोरगरिबांच्या समस्येला जाणून त्यांनी भूदान चळवळीला पाठींबा देऊन ७०००एकर हुन अधिक जमिनी भूदान म्हणून घोषित केले.त्यांनी त्यानंतर १९५७ साली कृषिमंत्री पदाची शपथ घेतली व कृषिपयोगी कार्य करण्यास अनेक योजना राबवण्यास सुरुवात केली.कृषिक्षेत्रात कोणकोणते बदल अपेक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी विविध देशांना त्यांना भेटी सुद्धा दिल्या.त्यांचे लोकोपयोगी कार्य दिवसेंदिवस वाढत जाऊ लागले आणि याचमुळे नाईक साहेब १९६२ साली पुन्हा महसूलमंत्री झाले.१९६३ साली मा.माजी मुख्यमंत्री मारोतराव कंडमवार यांचे निधन झाले व मुख्यमंत्री पद रिक्त झाले त्याचवर्षी मा.नाईक साहेब मुख्यमंत्री पदावर निवडून आले आणि सुमारे ११ वर्ष त्यांनी मुख्यमंत्री पद भूषवून समाजोपयोगी कार्य करण्यासाठी विविध योजना आखू लागले.
त्या योजनेत पंचायतराज योजना,जायकवाडी,भुजनी,एम्स,अंबरवर्धा येथील धरणाला कालवे जोडून गोरगरिबांच्या शेतापर्यंत पाणी पोहचवणे,कोराडी, पारस,खापरखेर्डा येथे विद्युत प्रकल्पाची सुरुवात करून अनेक शेतकऱ्यांच्या समस्येचे निवारण करणे असे विविध उपक्रम त्यांनी राबविले. कोयना धरणाच्या क्षेत्राखालील गावात ज्यावेळी भूकंप होऊन अनेक घरे ओसाड पडली त्यावेळी त्यांनीच त्या गावाचे पुनर्वसन केले. त्यांच्या कारकिर्दीतच कृषिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आणि गोरगरिबांच्या घरी आनंदाचे वातावरण निर्माण झाले.त्यांनी मजूर वर्गाला रोजगार उपलब्ध करून १९७० साली सिडकोची सुद्धा स्थापना केली व मजूर वर्गांच्या समस्येचे सुद्धा निवारण केले.एवढेच नव्हे तर त्यांनी कृषिविद्यापीठाची सुद्धा स्थापना केली जेणेकरून कृषी उत्पादनात नेहमी वाढ होऊन महाराष्ट्रात हरितक्रांती घडून यावी.याचबरोबर धवलक्रांती,उद्योजकांना आर्थिक साहाय्य देऊन उद्योग क्षेत्रात क्रांती घडवून आणने हे सगळे महान कार्य आपले एकमेव नेते मा.श्री.वसंतरावजी नाईक साहेबच करू शकले.एवढे सगळे महान कार्य करून शेवटी २० फेब्रुवारी १९७५ साली मुख्यमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला.
जिथपर्यंत ते राजकारणात होते तिथपर्यंत त्यांचे विरोधकही त्यांना खूप मान द्यायचे आणि त्यांना नाईक साहेब ह्याच नावाने संबोधायचे.आजपर्यंत असा एकही नेता झालेला नाही जो ११ वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवू शकेल.आपला एकमेव नेता मा.नाईक साहेब यांनीच ही कामगिरी करून दाखवली.त्यांनी हे सिद्ध करून दाखवले की,मनात इच्छा असेल तर समाजातील तळागाळातील साधा माणूस सुद्धा उंच भरारी घेऊ शकतो.चांगल्या कार्याची इच्छा जर आपल्या मनात असेल आणि आपल्या जिद्दीला जर मेहनतीची जोड असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही.त्यामुळे आपल्यात नाईक साहेबांसारखे लोकोपयोगी कार्य करण्याची इच्छा जागृत व्हायला हवी.चला तर मग आपण नाईक साहेबांच्या प्रतिमेला नाही तर त्यांच्या कार्याला पुजू.फक्त पूजन करून काही होणार नाही तर त्यांच्या कार्याला पुनर्स्थापित करू आणि आपला महाराष्ट्र आणि त्याचबरोबर संपूर्ण भारत देशाला सुजलाम्,सुफलाम् बनवू….