रानडुकरांपासून बचावासाठी लावलेल्या संरक्षण जाळीला चिकटून आष्टीत तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.30जुलै):-रानडुक्करांपासून डाळींब बागेचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या कुंपणातील विद्युत प्रवाहाचा धक्का बसून शेतकऱ्याच्या मुलाचाच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास बीडसावंगी येथे घडली. अमोल माणिक नरवडे ( ३०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील माणिक नरवडे यांनी शेतात डाळींब बाग लावलेली आहे. या ठिकाणी रानडुकरांचा मोठा उपद्रव असतो. बागेचे नुकसान होत असल्याने नरवडे यांनी बागेला संरक्षण जाळी लावून त्यात विद्युत प्रवाह सोडला होता. आज पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान माणिक नरवडे यांचा मुलगा अमोल हा बागेची पाहणी करण्यासाठी शेतात गेला. मात्र, विद्युत प्रवाह बंद न करताच तो बागेत गेला.

दरम्यान, बागेच्या कुंपणाला स्पर्श झाल्याने विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून अमोल खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. बागेचे संरक्षण झाले पण तरुण मुलगा गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Breaking News, बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED