हर घर तिरंगा हाच ध्वजाचा अवमान

28

भारताच्या प्रधानमंत्री यांनी जाहीर केले *हर घर तिरंगा* आणि तेथुनच देशाच्या राष्ट्रध्वजाचा अवमान व्हायला सुरुवात झाली. भारतातील बहुसंख्य लोक मेंदु, तर्क, आणि आणि वास्तविकता याचा वापर करताना दिसत नाहीत. भारतातील बहुसंख्य लोक धार्मिक व भावनिक आहेत. धर्म व आस्थेबद्दल थोड जरी कोणी चुकीचे बोलले तरी देश पेटवून देखील एवढी आस्था त्यांची पराकोटीची आहे. परंतु देशप्रेम, राष्ट्रीय संपतीचे जतन, राष्ट्रीय प्रतीके व राष्ट्रध्वजाचा सन्मान कसा करायचा याची माहिती सुद्धां बहुसंख्य भारतीयांना नाही ही शोकांतिका व खंत आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हर घर तिरंगाची घोषणा केली आणि राष्ट्रध्वजाचा जाहीर अवमान केला. एवढा जाहीर अवमान करून स्वतः ला देशप्रेमी समजणारे लोक एकही शब्द न बोलता *हर घर तिरंगा* चा प्रचार करत आहेत. म्हणजे जगजाहीर प्रधानमंत्री यांनी अवमान केल्या नंतर देशातील लोकांनी सुद्धां अवमान करण्याचा सपाटा लावला. तिरंगा म्हणजे तिन रंगाचा समुह आणि भारतीय राष्ट्र ध्वजावर चार रंग आहेत. भारतीय राष्ट्रीय ध्वज संहिता वाचली तर झेंड्याचे संविधानीक नाव *भारतीय राष्ट्रीय झेंडा* असे आहे. जर भारतीय राष्ट्रीय झेंडा असे नाव असताना ध्वज संहितेचे उल्लंघन करून तिरंगा म्हणणे म्हणजे ध्वजाचा अवमान करणे होय. ध्वज हा कोणाची खाजगी संपत्ती नसुन ते राष्ट्राचे प्रतिक असते आणि राष्ट्राच्या प्रतिकाचा सन्मान करणे प्रत्येकाला बंधनकारक असते. थोडक्यात काय तर राष्ट्रध्वजाच्या उच्चारापासुन अवमान करायला सुरुवात झाली. राष्ट्रध्वज संहिता कागदावर राहुन अजूनही लोकांनी वाचली नाही. राष्ट्रध्वज संहिता वाचली नाही आणि संहितेचे पालन होत नाही म्हणून ध्वजाचा अवमान सुरुच आहे. ध्वजाचा अवमान बघुन मनाला खुप दु:ख वाटते आणि लोकांच्या बुद्धीची कीव येते.

औरंगाबाद येथील सिद्धार्थ गार्डन वर तर ध्वज संहिता जाहीर पणे पायदळी तुडवुन राष्ट्रध्वजाचा जाहीर अवमान सुरू आहे. तेथे महानगरपालिका द्वारा राष्ट्रध्वजाचा फुगा बनवून तो हवेत सोडण्यात आला आहे. हे बघुन मी अशा देशात राहतो याची लाज वाटली. अरे राष्ट्रध्वजाचा वापर कसा करावा याची माहिती जर प्रशासकीय अधिकारी यांना नसेल तर राजीमाने देऊन घरी बसायला पाहिजे. पण सर्व दोष त्यांचा नाही हे कृत्य बघणारे लोक त्या अवमानीत ध्वजासोबत फोटो घेत आहेत म्हणजे आमच्या मेंदुचा वापर पुर्णपणे बंदच केला आहे. राष्ट्रध्वज कसा असावा याची माहिती ध्वजसंहीतेमध्ये दिलेली असताना शासनच त्याचे पालन करत नाही. ध्वज हा विशिष्ट प्रमाणातच असावा लागतो ३:२ म्हणजे ३ प्रमाण लांबी असेल तर २ प्रमाण रुंदी पाहिजे सर्व रंग सम प्रमाणात पाहिजे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दोन्ही बाजूने स्पष्ट दिसेल असे पांढऱ्या रंगावर मधोमध अशोक चक्र पाहिजे. राष्ट्रध्वज कोणत्याही कार्यक्रमामध्ये हा टेबल कव्हर म्हणून नसावा, राष्ट्र ध्वजावर कोणत्याही व्यक्तीचे, संस्थेचे नाव नसावे वा कोणत्याही प्रकारचे चिन्ह त्यावर नसावे. राष्ट्र ध्वज जमीनीवर कधीच पडू देऊ नये, कोणत्याही प्रकारच्या वस्तु वा ईतर ठिकाणी झेंडा लाऊ नये वा फोटो चिटकवू नये. अशी ध्वज संहीता असताना राष्ट्रध्वजावर औरंगाबाद महानगरपालिका यांनी महानगरपालिका पालिकेचे नाव लिहून नवीन अवमान करण्याचा पराक्रमच केला. झेंडे मलीन वा चुरगळेले नसावे. झेंडे उंचीवर असावे, राष्ट्रध्वजाच्या उंचीपेक्षा जास्त ईतर कोणतेही झेंडे आजुबाजुला नसावे. असे संहिता मध्ये लिहलेले असताना आणि स्वतः ला सुशिक्षित समजणारे महाभागानी स्वतः उंचीपेक्षा कमी उंचीवर झेंडे लाऊन अवमान केला. फोटो मध्ये झेंडा लावणारा उंच व त्याच्या पेक्षा लहान उंचीवर राष्ट्रध्वज दिसुन येत आहेत. गुजरात मधून राष्ट्र ध्वज निर्यात केले जात आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त ध्वज चुकिच्या पद्धतीने बनवले गेले आहेत हा ध्वजाचा अवमान नाही का? काही लोकांनी पक्षाचे ध्वज लावतात तसे ध्वज लाऊन आपल्या मेंदुचा व बुद्धीचा परिचय करून दिला. औरंगाबाद येथेच विना अशोक चक्राचा तिन रंगाचे कापड वापरून कार्यक्रम करण्यात आला.

शासन प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनाच जर ध्वज संहिता माहिती नसेल, ध्वजाचा सन्मान कसा करायचा याची माहिती नसेल तर सर्व सामान्य लोकांची काय अवस्था असेल. सर्वसामान्य नागरिक बहुतांश वेळा शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कृत्याची नकल करत असतात. जर आपण राष्ट्रध्वजाचे फुगे बनवून उडवत असु तर सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा ठेवावी. आता तर काही खाद्यपदार्थाच्या पाकिटावर राष्ट्रध्वज दिसुन येत आहे, जर अशा प्रकारे राष्ट्रध्वजाचा अवमान करायला सुरुवात झाली तर त्याचा सन्मान होईल तरी कधी? आणि देशाच्या सर्वोच्च सन्मानिय प्रतिकाचा अवमान हा राष्ट्रद्रोह असतो. मग आज एवढ्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रद्रोह वाढला आहे आणि काही दिवस असेच सुरू राहीले तर यालाच लोक राष्ट्रप्रेम समजून बसतील. सोशल मिडीयावर अनेक फोटो असे शेअर करत आहेत की ज्यामधुन राष्ट्रध्वजाचा अवमान स्पष्ट दिसतो, आणि आमचे बेगडी देशप्रेम असलेले लोक ते लाईक आणि शेअर करतात. सोशल मिडिया वर जे राष्ट्रध्वज शेअर केले जात आहेत त्यावर फोटो,. काही मजकूर, प्रमाण बरोबर नसणे, काही लोगो त्यावर अंकीत करून शेअर करत आहेत. आणि यामध्ये आणखी एक विशेष म्हणजे यामध्ये सरकारी अधिकारी, कर्मचारी वर्ग जास्त प्रमाणात आहे. शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या कडून ध्वज संहितेचे उल्लंघन झाल्यास कठोर कार्यवाही करायला पाहिजे पण दुसरा प्रश्न निर्माण होतो देश चालवणारेच राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करून स्वतःला राष्ट्रप्रेमी समजत असतील तर याचा अर्थ येथे राष्ट्र प्रेम फक्त बेगडी आहे. ज्यांचे देशावर खरे प्रेम आहेत त्यांचे राष्ट्रीय प्रतीचे आणि सन्मानिय राष्ट्रध्वज याबद्दल थोडही चुकीचे बघु ऐकु शकत नाहीत. परंतु आज पुन्हा जाणीव झाली राष्ट्रप्रेम फक्त फोटो पुरते मर्यादित झाले असून राष्ट्राबद्दलची आपुलकी खुपच कमी झालेली आहे. लोक राष्ट्रप्रेमी पाहिजे पण भारतीय लोक धार्मिक झाले हे देशासाठी खुपच धोकादायक आहे. म्हणून ध्वजाचा अवमान जाहीर पणे होत असताना कोणाला काहीच वाटत नाही, उलट त्यामध्ये ते सहभागी होत आहेत.

अनेक शैक्षणिक संस्था, शिक्षक प्राध्यापक ध्वज जनजागृतीच्या नावाखाली ध्वजाचा जाहीर अवमान करायला सुरुवात केली आहे. लांब लांब ध्वज तयार करून गावभर फिरवून त्यांना खुप चांगले वाटत आहे. परंतु ज्यांना मनामध्ये राष्ट्रध्वजा विषयी खरे प्रेम आहे त्यांना या गोष्टींचे खुपच वाईट वाटत आहे. याचे कारण राष्ट्र ध्वज हा लंबा नसतो त्याचे प्रमाण आहे त्याच प्रमाणात तो पाहिजे फक्त गावभर लंबा आणि दहा फुट रुंद झेंडा नसतो हाच राष्ट्रध्वजाचा अवमान आहे. आपल्याला ध्वज केवढा बनवायचा यावर मुळीच मर्यादा नाही पण त्याचे प्रमाण कसे आहे यासाठी मात्र मर्यादा आहेच आणि त्याचे पालन होणे गरचेचे आहे परंतु असे होताना दिसत नाही. ७५० फुट लांबीचा झेंडा आवश्य बनवा पण त्याची रुंदी ५०० फुट असलीच पाहिजे. जर हे प्रमाण चुकत असेल तरी ध्वजाचा अवमान आहे. राष्ट्रध्वजाचा जाहीर अवमान बाहेर सुरू आहे कुठे ध्वज वैयक्तिक कामासाठी वापरला जात आहे,. कुठे कोणी झेंड्यावर बसुन जात आहे झेंडे जमीनीवर ठेवले जात आहेत, सदोष झेंडे बनवून बाजारात आणले जात आहेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सर्व सुरू असताना शासन ध्वज संहितेचे उल्लंघन करणाऱ्यावर कोणतीही कारवाई करत नाही, ध्वज संहितेचे उल्लंघन करून ध्वजाचा अवमान झाला तर लोक तक्रार करत नाहीत. म्हणजेच काय तर अमृतमहोत्सव आला पण राष्ट्रध्वजाचा सन्मान कसा कसा करावा याची अक्कल आली नाही. अमृतमहोत्सव नक्कीच जल्लोषात साजरा व्हायला पाहिजे. पण *हर घर तिरंगा* नावाखाली शासनापासुन तर सर्व सामान्य माणसा पर्यंत राष्ट्रध्वजाचा अवमान सुरू आणि हे असेच सुरू राहीले तर राष्ट्रध्वजाचे महत्त्व कमी होऊन कुठेही अवमान केला जाईल. म्हणून राष्ट्रध्वज सर्वांनी घरोघरी जरुर लावावा. पण तो लावण्याआधी आपण ध्वज संहिता वाचुन तिचे पालन करावे कारण राष्ट्रध्वज हा देशाचा सन्मान आहे आणि तो आपल्या कृतीतून कुठे ही कमी होता कामा नये ही माफक अपेक्षा. *ध्वजसंहितेचे पालन करा, राष्ट्रध्वजाचा सन्मान करा*.
*************************************
✒️विनोद पंजाबराव सदावर्ते(मो:-९१३०९७९३००)
************************************