खर्डीतील गणेश मूर्तींना परजिल्ह्यातही मागणी

27

🔸वाढत्या महागाईचा व्यवसायाला फटका

✒️प्रतिनिधी खर्डी(अमोल कुलकर्णी)

पंढरपूर(दि.17ऑगस्ट):- तालुक्यातील जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी येथे गणपती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.गेल्या चार पिढ्यांपासून या गावातील तब्बल बारा ते तेरा कुटुंब गणपती मूर्ती,संक्रांत सुगड,उन्हाळी डेरे,लहान मुलांचे गल्ले(भिशी), फुलांच्या कुंड्या तसेच दिवाळीच्या वेळेस पणत्या बनवण्याचे काम करतात.बाजारातील प्लास्टर ऑफ पॅरिस,रंग, नदीची माती,वाहतूक,वीजबिल तसेच नारळी काथ्या यांचे वाढते भाव या सर्वांचा फटका कुंभार काम या पारंपरिक व्यवसायाला बसत आहे.यातूनच व्यवसाय नोंदणी नसल्याने सरकारी पातळीवरून कोणत्याही स्वरूपाची आर्थिक मदत, कर्ज,मिळत नाही. तसेच काही अत्याधुनिक साहित्यसामग्रीसाठी कोणतेही योजना अथवा अनुदान नसल्याने कुंभार काम व्यवसाय लोप पावण्याच्या स्थितीत आहे.

अशातच परप्रांतीयांनी येऊन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानातून ओबडधोबड गणेश मूर्तींची निर्मिती ही चिंतेची बाब आहे,अशी माहिती खर्डी येथील रामदास कुंभार यांनी बोलताना दिली. घरातील चार इंची गणपती पासून सार्वजनिक मंडळाच्या सात फुटी आठ फुटी गणपती पर्यंत गणपती येथे बनवले जातात.सांगली जिल्ह्यातील जत,आटपाडी,अथणी,विटा, सातारा,कराड या भागापर्यंत खर्डीतील सुबक व अलंकारिक गणेश मूर्तींना मागणी असते.तथापि कोरोना काळातील दोन वर्षाच्या नुकसानीमुळे यावेळेस गणेश मूर्तींची संख्या वाढवूनही दर मिळेल का नाही या चिंतेत कुंभार काम करणारे व्यावसायिक असल्याचे लक्षात आले.

घरातील सर्व लहान-थोर मंडळी काबाडकष्ट करूनही तीन ते चार महिन्यात पुरेसा नफा मिळत नाही,अशी खंत सीताराम कुंभार यांनी बोलून दाखवली.”आपल्या घरी येणाऱ्या बाप्पांच्या मूर्तीचे सर्वांनाच कौतुक असते परंतु बाप्पाची निर्मिती करणाऱ्या हाताला मात्र कष्टाशिवाय पर्याय नाही” हेच या व्यवसायातून दिसून येते.तरी देखील संस्कृती परंपरा टिकवण्यासाठी हा व्यवसाय केला जात आहे.यावेळी भाऊ कुंभार,गणेश कुंभार, संजय कुंभार,खंडू कुंभार,उपस्थित होते.