महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग देशात अव्वल व्हावा : सुधीर मुनगंटीवार

68

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

मुंबई(दि.18ऑगस्ट):-महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग देशातील सर्व राज्यांच्या सांस्कृतिक विभागात अव्वल व्हावा, त्यासाठी सांस्कृतिक विभागाने जोमाने कामाला लागावे असे निर्देश आज सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृहात सांस्कृतिक कार्य खात्याची आढावा बैठक त्यांनी घेतली तेव्हा ते बोलत होते. सांस्कृतिक खात्यांतर्गत येणाऱ्या प्रत्येक संस्थेच्या व विभागांच्या कार्यालयांना आपण भेटी देणार आहोत आणि समस्या समजून घेणार आहोत असेही ते यावेळी म्हणाले.

ज्या जिल्ह्यात नाट्यगृहे नाहीत त्या जिल्ह्यात नाट्यगृहे उभारण्याची योजना तयार करण्याच्या सूचनाही श्री मुनगंटीवार यांनी या बैठकीत खात्याच्या सचीवांना दिल्या.याप्रसंगी सांस्कृतिक विभागाचे काम अधिक उत्तम होण्यासाठी त्यांनी अनेक सूचना केल्या. सांस्कृतिक विभागाने सत्कार करताना पुष्पगुच्छांऐवजी पुस्तके द्यावीत, प्रत्येक कार्यालयात जनतेसाठी एक सूचनापेटी असावी, आवश्यक पदभरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, खात्यांतर्गत नस्ती निपटारा कायद्याची अंमलबजावणी तातडीने करावी, छोट्या छोट्या खर्चांचे अधिकार विकेंद्रित करावेत, वृद्ध कलाकारांचे थकित अनुदानांचे तातडीने वितरण करावे, राज्यभरातील विविध कला क्षेत्रातील कलाकार व कलातंत्रज्ञांची सूची तातडीने अद्यावत करावी असे अनेक निर्देश त्यांनी यावेळी वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिले. प्रत्येक कामाला कालमर्यादा आखून घेतली पाहिजे असे आदेशही त्यांनी दिले.

सांस्कृतिक खात्यांच्या विविध अडचणीही त्यांनी यावेळी समजून घेतल्या. त्या अडचणी सोडविण्यासाठीही त्यांनी बैठकीतच सूचना केल्या. खात्यांतर्गत विविध महामंडळे, समित्या व विभाग यांच्या बैठका नियमित व्हाव्यात, दर तीन महिन्यांनी अधिकारी बैठक घेऊन मंत्र्यांना विभागाचा कार्य अहवाल सादर करावा, पुढील आर्थिक वर्षभराच्या कामांचे नियोजन जानेवारीतच तयार ठेवावे असे त्यांनी सांगितले. ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यातील राज्यातील सर्व हुतात्म्यांची माहिती विविध माध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.राज्यातील सांस्कृतिक खात्याच्या ताब्यातील मंदिरे व गड किल्ले यांच्या देखभालीचा तातडीने आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.दूरध्वनीवर “हॅलो” ऐवजी “वंदे मातरम्” म्हणण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे, ते अभियानही सांस्कृतिक खात्याने प्रभावीपणे राबवावे असेही आवाहन त्यांनी यावेळी विभागातील अधिकाऱ्यांना केले.

यावेळी सांस्कृतिक सचिव श्री.सौरभ विजय, उप सचिव श्रीमती विद्या वाघमारे, अवर सचिव श्री. सु.दि. पाष्टे, अवर सचिव श्री.बाळासाहेब सावंत, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. बिभिषण चौरे, दादासाहेब फाळके चित्रनगरीचे संचालक श्री. विवेक भिमनवार, कोल्हापूर चित्र नगरीचे संचालक श्री. संजय पाटील, पुराभिलेख संचालक श्री.सुजित उगले, पु.ल.देशपांडे कला अकादमीचे संचालक श्री. संतोष रोकडे, राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालक डॉ.तेजस गर्गे, दार्शनिका विभागाचे मुख्य संपादक व सचिव श्री दिलीप बलसेकर, हिंदी गुजराती व सिंधी साहित्य अकादमीचे सहसंचालक श्री. सचिन निंबाळकर, रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे सचिव श्री. संतोष खामकर यांच्यासह अनेक वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.