यवतमाळ जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते कै. ओचावार यांच्या मारेकऱ्यांना अटक करणेबाबत व ओचावार कुटुंबियांना आर्थिक मदत मिळणेबाबत अमोल कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश

35

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

जळगाव(दि.19ऑगस्ट):- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात पारवा या गावात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल देवराव ओचावार यांची १५ मे २०२२ रोजी मध्यरात्री अतिशय क्रूर पद्धतीने निर्घृणपणे हत्या करण्यात आली. माहिती अधिकार अधिनियमानुसार माहिती मागीतली म्हणून सूड भावनेने सदर क्रूर हत्या झाल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासातून आणि प्रसार माध्यमातून समोर आलेले होते. सदर घटना धक्कादायक असुन महाराष्ट्रांच्या प्रागतिक परंपरेला काळीमा फासणारी तसेच शासन व प्रशासन भ्रष्टाचार मुक्त, लोकाभिमुख व पारदर्शक चालावे म्हणून काम करणाऱ्या हजारो माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे , जागरूक व संवदेनशील नागरिकांचे मनोधर्य खच्चीकरण करणारी आहे.

त्यामुळेच मृत अनिल देवराव ओचावार यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषी आरोपीना सहा महिन्याच्या आत अत्यंत कठोर शिक्षा मिळावी. या प्रकरणात व कटात सामील असू शकणारे व अपराध्याला चिथावणी देणारे सरकारी अधिकारी व सूत्रधार यांच्याही मुसक्या अवळाव्यात आणि त्यांना आरोपी करून कसून चौकशी करावी. तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून जीव घोक्यात घालून काम करून प्रशासन व शासन पारदर्शक चालावे म्हणून आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या मृत कार्यकर्ता अनिल देवराव ओचावार यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळावा म्हणून किमान दहा लाख रूपयांची अर्थिक मदत सरकारने जाहिर करावी. माहिती अधिकार कार्यकर्त्यांना धमक्या देणे, हल्ले करणे, मारहाण होणे व त्यांच्या हत्या होणे अशा घटनांमध्ये वरचेवर वाढ होत आहे , ही गंभीर बाब आहे तरी माहिती अधिकार कार्यकत्यांची सुरक्षा व सरंक्षण या सबंधी शासनाने धोरणात्मक उपाययोजना कराव्यात.

माहिती अधिकार कार्यकर्त्यांना आवश्यक तेथे तातडीने पोलीस संरक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. याप्रमाणे मागण्यांचे निवेदन अमोल कोल्हे यांनी मा. जिल्हाधिकारी , जळगाव यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब , महाराष्ट्र राज्य यांना दिलेले होते आणि सदर निवेदनावर उचित कार्यवाही करून सबंधितांना योग्य न्याय द्यावा अशी विनंती केलेली होती . तसेच याविषयी अमोल कोल्हे यांनि सातत्याने सर्वतोपरी पाठपुरावा केला .

सदर निवेदनाची व पाठपुराव्याची दखल घेण्यात आलेली असुन , त्याअनुषंगाने आज दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी अमोल कोल्हे यांना पारवा पोलीस ठाणे जिल्हा यवतमाळ यांचे पत्र प्राप्त झाले आहे . सदर पत्रात पारवा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी नमुद केल्यानुसार , पोलीस स्टेशन पारवा अप क्रमांक 249 / 2022 भादवी 302 , 34 या गुन्ह्यातील सूत्रधार व आरोपी यांना अटक करण्यात आलेली असुन त्यांचे विरोधात माननीय न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेले आहे . तसेच मृत अनिल ओचावर यांच्या पाठीमागे पत्नी , 2 मुली , वडील असा परिवार असुन मृत अनिल ओचावार हेच कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते.

मृत ओचावार यांचे वडील वृद्ध असुन त्यांच्या कुटुंबाकडे उदरनिर्वाहासाठी शेती अथवा दुसरे साधन नाही , अचानकपणे कुटुंबावर मोठा आघात झाल्याने कुटुंबियांना प्रचंड मानसिक ईजा झालेली आहे व त्यांची परिस्थिती नाजुक व हलाखीची झालेली आहे . मुलींना शिक्षण मिळावे व कुटुंबियांना आरोग्य , खर्च व चांगले जिवन जगता यावे यासाठी महाराष्ट्रातील बळी पडलेल्या व्यक्तिकरिता नुकसान भरपाई सुधारणा योजना 2022 मधील कमाल मर्यादा रुपये 10 लाखांपर्यंत नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या कुटुंबियांना मिळणेसाठी विनंती केलेली असुन सदर मंजुरी अंतिम टप्यात आहे असे कळवले आहे .