होय, आम्हीच नालायकांनी या हरामखोरांना निवडूण दिलय !

32

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

काल सकाळी राज्याच्या विधानसभेसमोर सत्ताधारी आणि विरोधी आमदारांच्यात धक्काबुक्की झाली. एकमेकांच्या अंगावर जात परस्परांना शिवीगाळही केली गेली. या लोकांनी स्वत:ची लायकी दाखवून दिलीच पण राज्याची लायकीही काढली. महाराष्ट्राचे राजकारण सध्या काय लायकीचे आहे ? याचा उत्तम नमुना त्यांनी पेश केला. राज्याच्या जनतेला याची लाज नाही वाटली तर हा अंधारयुगाचा प्रारंभ समजायला हरकत नाही. असली टुकार आणि हलकट माणसं जर आपले लोकप्रतिनिधी असतील तर तमाम जनतेने आपला मेंदू तपासून घ्यायला हवा. असल्या टुकारांना निवडूण देणारे आपण समाज म्हणून काय लायकीचे आहोत ? याचेही एकदा आपण चिंतन करायला हवे. आपले प्रतिनिधी काय लायकीचे आहेत ? त्यावरून आपली, आपल्या राज्याची लायकी ठरत असते. काल या नालायकांनी नेमकी तिच लायकी अवघ्या जगाला दाखवून दिली.

एकेकाळी या राज्याचा नावलौकीक मोठा होता. अवघ्या देशात पुढारलेले व प्रगत राज्य अशी प्रतिमा होती. प्रबोधनकार ठाकरे, डॉ बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, भाई उध्दवराव पाटील, वसंत दादा पाटील, प्र के अत्रे, एस एम जोशी, ना ग गोरे, श्रीपाद अमृत डांगे, माधवराव बागल, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, विलासराव देशमुख, गोपिनाथ मुंडे, प्रमोद महाजन आदी नेत्यांनी राज्याच्या राजकारणाला एक उंची मिळवून दिली. राज्याला एक वेगळा लौकीक मिळवून दिला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातले परस्पर संबंध आदर्शवत होते. विधानसभेचे कामकाज, तिथली भाषणं दिशादर्शक होते. सत्ताधारी आणि विरोधक कसे असावेत ? याचा तो उत्तम नमुणा होता.

या सर्वांच्या योगदानामुळे महाराष्ट्र एक प्रगत राज्य म्हणून पुढे येवू शकले. वरील यादीतील काही नामवंत राज्याच्या विधानसभेत नव्हते पण त्यांच्या कामाची, व्यक्तीमत्वाची छाप देश पातळीवर उमटली गेली. गेल्या काही वर्षात राज्याच्या राजकारणाचा दर्जा खुपच घसरला आहे. राज्यातला एक सुजाण नागरिक म्हणून विचार केला, महाराष्ट्राचा वारसा डोळ्यासमोर आला की लाज वाटते या हरामखोरांची. होय ‘हरामखोर’ हाच शब्द यांच्या लायकीचा आहे. ज्यांना आपल्या राज्याचा वारसा कळत नाही, ज्यांना आपला इतिहास कळत नाही त्यांना काय म्हणावे ? हे लोकांचे प्रतिनिधी आहेत की गावगुंड आहेत ? असा प्रश्न पडतो. कायदेमंडळाच्या सदस्यांनी जर अशापध्दतीचे वर्तन केले तर सामान्यांनी काय आदर्श घ्यायचा ? चौकातल्या कुचाळ कट्ट्यावर आणि पान टपरीवर भांडणारे टपोरी आणि लोकप्रतिनिधी एकाच लायकीचे असतील तर राज्याच्या नशिबी अनर्थाशिवाय काय असणार ? काल विधानसभेसमोर जो प्रकार झाला तो भयंकर आहे. गेल्या काही वर्षात असे प्रकार वरचेवर घडत आहेत. या पुर्वीही विधानसभेत अनेकवेळा राडा झालेला आहे. भास्करराव जाधवांची आई-बहिण काढण्यात आली होती.

विधानसभेत अशा पध्दतीचे हलकट वर्तन अलिकडे वाढले आहे. हा एकूणच प्रकार महाराष्ट्राच्या लौकीकाला काळिमा फासणारा आहे. या लोकांना उद्वेगाने ‘हिजडे’ म्हणावे या ही लायकीचे हे नाहीत. समाजात उथळ प्रवृत्तीच्या लोकांना हिजडा म्हणून संभावना केली जाते. पण हिजडे खुप सभ्य व सुसंस्कृत आहेत. या लोकांना हिजडा म्हणून संबोधने म्हणजे त्या सर्व सभ्य व प्रामाणिक लोकांचा हा अवमान ठरेल. या टपोरांची वेश्या म्हणून संभावना करावी तर वेश्याही खुुप प्रामाणिक, नितीवान असतात. स्वत:चे पोट जाळण्यासाठी त्या स्वत:ला विकतात. पैसे देणा-या गि-हाईकाशी त्या कधीच गद्दारी करत नाहीत. पैसे एकाचे घ्यायचे व दुस-यासोबत जायचे असला प्रकार त्या करत नाहीत. त्या या ही व्यवसायात नितिमत्ता पाळतात. तत्वाचा व इमानदारीचा व्यभिचार त्यांनी आजवर कधीच केला नाही. त्यामुळे हे त्यांच्याहीपेक्षा निसुक आहेत. त्यांची उपमा देणे म्हणजे या तमाम माय-बहिणींची विटंबना ठरेल.

गेल्या काही वर्षात या टपोरींनी राजकारणाची व्याख्याच बदलून टाकली आहे. कुठलीही नैतिकता, सभ्यता नाही. कोणतीही वैचारिक, तात्विक व सामाजिक बांधिलकी राहिलेली नाही. जनता काय म्हणेल ? याचे कसलेच भय राहिले नाही. लोकांना व लोकमताला फाट्यावर मारून कशाही आघाड्या केल्या जातात, कशाही इकडून तिकडून उड्या मारल्या जातात. सत्तेसाठी, स्वार्थासाठी कशाही भूमिका घेतल्या जातात. मतदारांच्या दारात जाताना जे बोलले ते कोलून राजकारण केले जाते. लोकांच्या प्रश्नांना फाट्यावर मारले जाते.

सध्या राज्यात अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत. परवाच एका शेतक-याने विधानसभेसमोर आत्महत्या केली. स्वत:ला पेटवून घेतले. शेतक-यांचे प्रश्न अनेक वर्षे भिजत पडले आहेत. सत्तेतून विरोधात गेले की प्रत्येकाला शेतकरी प्रश्नांची आठवण येतेे. बुडाखाली सत्ता असताना कुणालाच ते प्रश्न प्रामाणिकपणे सोडवायची इच्छा होत नाही. विविध क्षेत्रातल्या कामगारांचे प्रश्न आहेत, मजूरांचे प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत. महागाईचा भडका प्रचंड उडाला आहे. जगणे महाग झालय. जगण्यापेक्षा माणसाला मरण स्वस्त वाटू लागलय.

जनहिताची धोरण कुणीच बोलत नाही, मांडत नाही. केवळ “सत्ता एके सत्ता आणि सत्ता दुणे पैसा !” असा प्रकार सुरू आहे. हरामखोरी करा, लांडी-लबाडी करा, आपल्याच देशाला, आपल्याच राज्याला व आपल्याच लोकांना लुटा. सत्तेच्या जोरावर काहीही करा आणि पुन्हा सत्तेच्या वळचणीला जावून ते दडपून टाका असा पायंडा पडला आहे. आपलं कोण काय वाकड करणार ? अशीच मानसिकता आहे सर्वांची. याला कुठलाच पक्ष अपवाद नाही. याला घालावा आणि त्याला काढावा अशी स्थिती आहे. सगळ्याच पक्षात असल्या टुकारांचाच भरणा अधिक आहे. काही सन्माननीय अपवाद सोडले तर अशा भिक्कार दळभद्र्यांची गर्दी मोठी आहे. सभ्यतेवर, नैतिकतेवर बोलावं असा कुठलाच पक्ष राज्यात उरला नाही. जिथ ‘फुल’ वेचली तिथेच आज ‘गोव-या’ वेचायची वेळ आली आहे. या स्थितीला आम्हीच जबाबदार आहोत. कारण आम्हीच नालायकांनी या हरामखोरांना निवडूण दिलय.