लोकशाहीचा चौथा स्तंभ-सोशल मीडिया!

36

आजकाल पेपर मधे सुद्धा गोलगोल लेख असतात. त्यामुळे कोणी वाचत नाही. राजकारणातील चोरांची कारनामे देत नाहीत. फोटो मात्र पान भरून देतात. म्हणून बातमी गुळगुळीत बनते. फक्त रकाने भरले जातात. पण वाटसअप वर व्यक्ती चा उल्लेख होतो. म्हणून लोक वाचतात. लिहिणाराचे नांव, नंबर असतो. वाचणाऱ्याचे नाव सुद्धा येते. काही तर त्यावर टिप्पणी करतात. आपले मत मांडतात. वाद, संवाद होतो. म्हणून सोशल मेडिया जास्त प्रभावी ठरतो.

शहरातील रस्ते, खड्डे बाबत पेपर ला बातमी येते. कोणी मनावर घेत नाही. कारण पेपर ला त्याच आमदार खासदार कडून बिदागी मिळते. त्यामुळे खरपूस, खडसावून कोणी लिहीत नाहीत. म्हणून परिणाम होत नाही. आमदार खासदार विरोधात पेपर स्पष्ट व ठोस भुमिका घेत नाही. उलट स्तुती ची संधी मिळाली कि पुर्ण पेपर भरून आमदारांचे फोटो असतात. ते पाहून आमदारांच्या पत्नीला ही चीड येते. या नालायक माणसाची इतकी स्तुती का करतात? त्या बाईला माहिती नसते कि, आपला धनी पेपरला धन देऊन हे छापून आणतो. बाईला माहिती असते, हा धनी कुठे कुठे किडे पाडतो. याची अतिरिक्त मुले कोण कोणत्या शाळेत जातात. म्हणून तिला धनीचा धनंजय केलेला आवडत नाही. धनीचे पेपरला असे विराट स्वरूप पाहून अनुष्का हिंमत हारते. धनीला तेच तर पाहिजे असते. हिने जास्त आवाज करायला नको. बाहेर बोलायला नको.बोलली तरीही पेपरला छापायला नको.
जळगाव शहरातील रस्ते बनले नाहीत. याला नगरपालिका आणि आमदार भोळे जबाबदार आहेत. महाजन यांचे आश्वासन लालीपाप होते. पेपरमधे रस्ते व खड्ड्यांची बातमी येते पण नगरसेवक व आमदार विरोधात चकार शब्द लिहीत नाहीत. कि हा नगरसेवक बदमाष आहे. हा आमदार नालायक आहे. हा मंत्री लबाड आहे. यामुळे छुपपुट बातमीला नगरसेवक व आमदार व मंत्री घाबरत नाही. पण लोकांना वाटते, मुर्खांना वाटते, ही पहा पेपरला बातमी छापून आली. फक्त बातमी छापून आली. पण परिणाम शुन्य. नंतर त्याच नगरसेवक किंवा आमदारांचे कुठे भाषण, उद्घाटन किंवा वाढदिवस असला कि, त्या नगरसेवक किंवा आमदाराचे इतके कौतुक असते कि, जसा तो हरामी नसून धर्मात्मा आहे. ते वाचून लोक रस्ता विसरतात.खड्डा विसरतात. उलट फोन करून नगरसेवक व आमदाराला शुभेच्छा देतात. खड्डे वाढवण्यासाठी तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

पेपर, पैसा, प्रसिद्धी याचे समीकरण खूप बिघडले आहे. पैसा मिळाला कि प्रसिद्धी करतात. त्याला पेपर म्हणतात. पैसा मिळाला कि गुन्हेगारांची प्रसिद्धी करतात. याच्या उलट गरीबांची बदनामी जास्त छापतात. हाणामारी, विनयभंग, बलात्कार , नराधमाने असे असे केले. मुलगी पळवून नेली.मागील चार पाच वर्षे लैंगिक शोषण केले. हे तिखटमीठ लावून छापतात. त्यामुळे समाजावर वाईट परिणाम होतो. श्रीमंतांची स्तुती आणि गरीबांची अब्रू,हेच एकमेव धोरण असते.
जळगाव नगरपालिकेच्या लोकशाही दिनी आम्ही तक्रार केली. विषय वैयक्तिक नव्हता.सार्वजनिक होता.सर्वांच्या हिताचा होता. नगरपालिका कामकाजबाबतच होता. तो सुद्धा लोकशाही दिनाबाबतच होता. पण तो नगरपालिका अधिकाऱ्यांना खटकणारा होता. त्यांची चुक सांगणारा होता. त्यांना कामाला लावणारा होता.त्यांना आवडला नाही.म्हणून आम्हाला आत सभेत प्रवेश दिला नाही.तेंव्हा आम्ही जबाब विचारला.

तक्रार घेत नाही म्हटल्यावर प्रश्न तर करणारच.पोस्टमन थोडीच आहोत, पत्र घेत नाही तर चला गुपचूप परत.जबाबदार माणसे जबाबदार नोकरांना जबाब तर विचारणारच.याची पेपरमधे चांगली बातमी छापली पाहिजे होती.जर पेपर हा जनहिताचे ध्येय बाळगून चालत असेल तर.पण नाही.आम्हाला आत सभागृहात शिरू दिले नाही.तरीही पेपर मधे मोठी बातमी छापली.एक दोन नव्हे,सर्वच पेपरला. ” यांनी धक्काबुक्की केली, शिवीगाळ केली,फाईली पाडल्या.” म्हणजे विपरीत बातमी.खोटी बातमी.पैसे घेऊन बातमी.एकाही पेपरने छापले नाही कि, “आमचे कैमेरामन तेथे हजर होते. हे तक्रारदार आत सभागृहात शिरलेच नाहीत.तर फाईली फाडल्याच नाहीत.आधिकाऱ्यांचे आरोप खोटे आहेत. लोकशाही दिन म्हणजे फक्त कागदी देखावा केला.” असे लिहीण्याचे नैतिक बळ कोणाही पत्रकार मधे उरलेच नाही.म्हणून पेपरचे महत्त्व कमी झाले.पेपर बंद पडायला लागले.सोशल मेडिया जोरात सुरू झाला.
कालच शिवाजीनगर ला नागरी समस्यांवर रूबरू कार्यक्रम झाला.जे नगरसेवक विरोधात बोलत होते त्यांना अडवले.जे नगरसेवकांची स्तुती करीत होते, त्यांना भरभरून बोलू दिले . इतकेच नव्हे ,ज्याला बोलता येत नव्हते त्याला कागदावर लिहीलेले वाचायला लावले.अगदी तोंडांत माईक खुपसून.ज्यात स्तुती हातभर आणि समस्या बोटभर.समोर नगरसेवक.इकडे स्तुतीपाठक.असा हा स्क्रिप्ट लिहीलेला पुर्व नियोजित कार्यक्रम होता.नगरसेवकांचे पाप झाकण्याचा कार्यक्रम होता.

अशा चुकीच्या घटनांवर कोणी लिहीत नाहीत.चुकीच्या कृतीवर कोणी प्रकाश टाकत नाही.म्हणून चुकांची मालिका चालूच असते.वाढत जाते.जसे जळगाव मधील खड्डे.खड्ड्यात पडून अपघात.अपघातात ठोकलेली माणसे.ठोकून मेलेली माणसे.यात वाढ होतच आहे.
यावर पर्याय समाज शोधत आहे.सोशल मेडिया.जेथे मॅन टू मॅन संवाद होतो.मिनट टू मिनिट प्रतिक्रिया उमटते.मेरीट टू मेरीट प्रसार होतो.येथे प्रसिद्धी नाही,प्रसार , प्रचार महत्वाचा आहे.ज्योत से ज्योत जलाओ म्हणतात,तसाच उपक्रम सोशल मेडिया करीत आहे.मॅन टू मॅन जगाओ,करीत असतो.

प्रसार माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात.साफ खोटे आहे. तो आर्थिक व्यवसाय बनला आहे.हेतूच तो आहे.जसा व्यापार, उद्योग, नोकरी,शेती.ज्यात पैसा कमावणे हाच एकमेव हेतू असतो.या व्यवसायात भरभराट व्हावी म्हणून भावनेला हात घालून लोकशाहीचा स्तंभ मुद्दाम म्हटले जाते.कधीकाळी खरे असेलही.पण ते आता खरे राहिलेले नाही.माझ्या जळगाव मधे तरी नाही.पेपर आणि चैनेल्स सरकार ची व श्रीमंतांची बटीक बनलेली आहेत.पेपर सरकार कडून मिळवायचा असतो.जाहिरात श्रीमंताकडून घ्यायची असते.पेपर गरीब माणसाने वाचायचा असतो.निवडणूकीत तर श्रीमंत उमेदवारांची बातमी, फोटो छापण्याचा वेगळा सौदा आणि विरोधात बातमी न देण्याचा वेगळा सौदा असतो. जो सौदा करीत नाही,त्याची बातमी दहा दिवस बॅन असते. तेंव्हा चौथा स्तंभ श्रीमंतांकडे गहाण असतो.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव