जायकवाडीचे १८ दरवाजे उघडले; गावांना सतर्कतेचा इशारा..

14

✒️बीड जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.22सप्टेंबर):-जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा 98 टक्के वर पोहोचला असून धरणाचे सर्वच 18 दरवाजे चार फुट उघडण्यात आले आहेत. धरणातून एक लाख 13 हजार 184 क्युशेसने पाणी गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.त्याचबरोबर गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये अगरनांदूर, संगमजळगाव, हिंगणगाव, गोंदीखुर्द, कट चिंचोली, पांगुळगाव, सुरळेगाव, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, पिंपळगाव, खामगाव, राजापूर, गंगावाडी, राहेरी अशी अनेक गावे असून गोदावरी नदीकाठवर येत असल्याने या गावातील नागरिकांना नदीकाठी किंवा नदीमध्ये जाऊ नये असा सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांनी गोदाकांठच्या ग्रामस्थांना आवाहन केले आहे, की आपली जनावरे, लहान मुले, व आपण सुद्धा नदी क्षेत्रात प्रवेश करू नये असे आव्हान गेवराई तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे. सध्या गोदावरी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेला आहे त्यामुळे गोदावरी काठावरील सर्व गावातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी कोणीही नदी पात्रात जाण्याचा प्रयत्न करू नये असे आव्हान प्रशासनाकडून करण्यात येत आहे.असे गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांनी सांगितले.