भगरीतून विषबाधेच्या घटनेनंतर अन्न प्रशासन ॲक्शन मोडवर

55

🔸बीडसह गेवराईत धाडसत्र करत, 2 हजार 100 किलो भगर जप्त

✒️बीड जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.28सप्टेंबर):-2 दिवसांपूर्वी भगरीतून 70 ते 80 जणांना विषबाधा झाली होती. त्यानंतर आता अन्न प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. अन्न प्रशासनने बीडसह गेवराईत धाडसत्र करत, तब्बल 2 हजार 100 किलो भगर जप्त केला आहे. अन्न प्रशासनाचे सहाय्यक उपयुक्त इम्रान हाश्मी यांच्यासह टीमने हे धाडसत्र सुरू केले आहे.

दोन दिवसांपूर्वी बीडच्या कोळवाडी, जुजगव्हाण, पाली, रंजेगाव या चार गावांमध्ये, नवरात्रीच्या उपवासात भगर खाल्याने जवळपास 70 ते 80 जणांना विषबाधा झाली होती. याच पार्श्वभूमीवर आता अन्न प्रशासनाचे सहाय्यक उपायुक्त इम्रान हाश्मी यांच्यासह टीमने, बीड शहरातील मोंढा भागात असणाऱ्या ओम एजन्सी आणि गेवराईतील शीतल एजन्सी या दुकानांवर छापा टाकला.

यावेळी तब्बल 2 हजार 100 किलो भगर जप्त केली आहे. तर या जप्त केलेल्या भगरीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. दरम्यान या दोन्ही एजन्सीवर खटला दाखल करण्यात येणार असून दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे. अशी माहिती उपयुक्त इम्रान हाश्मी यांनी दिली आहे.

दरम्यान विषबाधेच्या घटना दिवसेंदिवस समोर येत असल्याने, जिल्ह्यातील सर्व एजन्सी असणाऱ्या दुकानांची, त्याचबरोबर मोंढा भागात असणाऱ्या दुकानांची, सरसकट तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.