सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!

17

विवाहित असो की अविवाहित कोणत्याही स्त्रीला मूल जन्माला घालण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताचाही प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे असा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असून गर्भावस्थेच्या २४ आठवड्यांपर्यंत एमटीपी कायद्यांतर्गत अविवाहित स्त्रीलाही गर्भपाताची परवानगी असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ऐन नवरात्री उत्सवात सर्वोच्च न्यायालयाने नारी शक्तीला बळ देणारा निकाल दिल्याने त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. हा आणि अशा प्रकारचा अधिकार स्त्रियांना मिळावा यासाठी देशभरातील अनेक महिला संघटना गेली कित्येक वर्ष झटत होत्या आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले असे म्हणावे लागेल अर्थात या निर्णयावर काही जणांनी नाराजी व्यक्त केली असली तरी सर्वसामान्यच नव्हे समाजातील सर्वच घटकातील स्त्रियांनी या निकालाचे स्वागत केले आहे. या निकालाची केवळ भारतातच नाही तर जगभर दखल घेतली जात आहे कारण स्वतःला पुरोगामी आणि प्रगत म्हणवणाऱ्या देशात देखील अजून असा निर्णय झाला नाही. भारतातही हा निर्णय होईल असे कोणाला वाटले नव्हते कारण भारतात पुरोगामी विचारांना आणि महिलांना स्वातंत्र्य आणि त्यांचा अधिकार नाकारणारा मोठा वर्ग आजही आहे तो नेहमी अशा सुधारणावादी विचारांना विरोध करत असतो. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देऊन सर्वांनाच गप्प केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिल्याने बलात्कार, लिव्ह इन रिलेशनशिप आणि प्रेम संबंधातून गर्भधारणा झालेल्या स्त्रियांना नाईलाजाने किंवा अनिच्छेने मातृत्व झेलावे लागणार नाही.

या निकालामुळे भारत कितीही पारंपरिक असला तरी महिलांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यात इथली न्यायव्यवस्था जराही कचरत नाही हे या निर्णयातून जगाला दिसले आहे. हा निकाल ऐतिहासिक असाच आहे कारण जगतिक महासत्ता असलेली आणि कायम सुधारणावादाची टिमकी वाजावणाऱ्या अमेरिकेने गर्भपातला मान्यता देणारा ५० वर्ष जुना कायदा रद्द केला आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर जगभरातून टीका होत असताना भारताने हा निर्णय घेऊन आम्ही सुधारणावादी आणि पुरोगामी आहोत हे जगाला दाखवून दिले आहे त्यामुळेच या निर्णयाचे जगभरातून स्वागत होत आहे. बलात्कारातून मातृत्व स्वीकारावं लागणाऱ्या स्त्रियांना देखील या निकालामुळे गर्भपाताचा अधिकार मिळाला आहे. प्रेम संबंधांतून गर्भधारणा स्वीकारावं लागलेल्या कुमारी मातांनाही गर्भपाताचा अधिकार मिळाला आहे.

त्यामुळेच अशा अप्रिय घटनांमुळे मातृत्व स्वीकारावं लागणाऱ्या स्त्रियांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण अशा अप्रिय घटनांतून गर्भधारणा झालेल्या स्त्रियांना गर्भपात करताना कायदेशीर अडचणी येत होत्या त्यामुळे या स्त्रियांना नको असतानाही नाईलाजाने त्या मुलाला जन्माला घालावं लागत होते. या निकालावर काही जणांनी नाराजीही व्यक्त केली आहे. या निकालामुळे व्यभिचाराला प्रोत्साहन मिळेल असा आरोप होत आहे मात्र व्यभिचार करणाऱ्या स्त्रियांपेक्षा बळजबरी आणि बलात्कार झालेल्या स्त्रियांची संख्या आपल्या देशात जास्त आहे. काही चूक नसताना, इच्छा नसतानाही मातृत्व लादल्या गेलेल्या स्त्रियांची संख्या अधिक आहे या स्त्रियांना या निकालामुळे मोठा दिलासा मिळाला आहे म्हणूनच या ऐतिहासिक निकालाचे केवळ देशातच नव्हे तर जगात स्वागत होत आहे.

✒️श्याम ठाणेदार,(दौंड जिल्हा,पुणे)