(कोजागिरी, नवान्न पौर्णिमा व ईद ए मिलाद विशेष)
यंदा फार मोठा योगायोग जुळून आला आहे. हिंदू बांधवांचा कोजागिरी, शेतकरी बांधवांचा नवान्न पोर्णिमा तर मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद या सणांच्या त्रिवेणी संगम घडून आला आहे. आज एकाच दिवशी हिंदू बांधवांच्या मान्यतेप्रमाणे खरोखरच देवी महालक्ष्मी आणि इस्लाम बांधवांच्या श्रद्धेप्रमाणे अल्ला तआला- प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब अमृतकुंभ घेऊन अवतरले की काय? चंद्रप्रकाशात आटवलेले दूध, नव्या धान्याचे अन्न व शिरखुर्मा यांची अवर्णनीय लज्जत एकाच दिवशी चाखावयास मिळत आहे. अगदी कसा दुग्धशर्करा योगच! सविस्तर माहितीची लज्जत अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजींच्या अविट शब्दांत वाचुया… संपादक.
कोजागिरी म्हणजेच हूजरे गिरी म्हणत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करून मस्त बेत आखला जातो. इतकीच या दिवसाची ओळख आपल्याला आहे. मस्त मसाला दूध, सोबत रास गरबा असा आनंद तुम्ही देखील नक्कीच घेतला असेल. पण कोजागिरी पौर्णिमेचे हिंदू धर्मात फार मोठे महत्व आहे. अश्विन पौर्णिमेला येणारा सण असून हा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये येतो. दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो. हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मातही या दिवसाला महत्व आहे. इतकेच नाही तर शेतकऱ्यांसाठीही हा दिवस महत्वाचा आहे. कोजागिरी पौर्णिमा ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. याला शरद पौर्णिमा, मणिकेथारी, नवान्न पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा, माडी पौर्णिमा असे देखील म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन हा दिवस साजरा करू शकतो.
कोजागिरी पौर्णिमा साजरी का केली जाते? हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडते. हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हटले जाते.खगोल शास्त्रीयदृष्ट्या या दिवसाला फारच महत्व दिले जाते. प्राचीन आणि पौराणिक काळाचा विचार करता या दिवसाला खुपच महत्व आहे. कोजागिरी पौर्णिमेेच्या आधी नऊ दिवसाची नवरात्र आलेली असते. या नऊ दिवसात शक्ति आणि बुद्धीची देवता पार्वती व तिच्या वेगवगेळ्या रुपांची आपण मनोभावे पूजा करतो. विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी विजय संपादनासाठी विजयादशमी साजरी केली जाते. याला सीमोल्लंघन देखील म्हणतात. त्यानंतर येणाऱ्या या पौर्णिमेपर्यंत शेतीची कामे देखील अर्ध्यावर आलेली असतात. पावसाळा संपून नवी पिके हाताशी आलेली असतात. त्यामुळे शेतकरी बांधव नवे खाण्याचाही आनंद- नवान्न पौर्णिमा या दिवशी साजरा करत असतो. कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वगवेगळ्या धारणा आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळे महत्व आहे. दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फारच महत्वाचा आहे. दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे. मग दूध प्यावे. या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते. ज्याचा फायदा तुम्हाला होतो. थंडीला या काळात सुरुवात होऊ लागते.त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो. असे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते.
कोजागिरी पौर्णिमा ही दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. पूर्ण चंद्र वर आल्यानंतर चंद्रासमोर मसाला दूध ठेवून त्याचे सेवन केले जाते. लक्ष्मी पृथ्वीतलावर येणार याचे स्वागत करण्यासाठी जागे राहण्याची फार पूर्वीपासूनची परंपरा आहे. कोजागिरी पौर्णिमेसंदर्भात अनेक कथा सांगितल्या जातात. यापैकी काही कथा जाणू घेऊया. त्यामुळे कोजाागिरी पौर्णिमेचे महत्व कळेल. एका राजाची कथा यामध्ये सांगितली जाते. एक राजा काही कारणामुळे आपले सगळे वैभव आणि संपत्ती गमावून बसतो. आपली संपत्ती पुन्हा मिळवण्यासाठी राणीने महालक्ष्मीचे व्रत केले. तिच्या व्रतामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आणि तिला आशीर्वाद मागण्यास सांगितले. तिने आपले राजवैभव परत माागितले. तिला ते वैभव परत मिळाले. कोजागिरी पौर्णिमेच्या या दिवशी मध्यरात्री चंद्रमंडलातून उतरून साक्षात महालक्ष्मी खाली पृथ्वीतलावर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात अमृतकलश घेऊन येते आणि सगळ्यांना विचारते, “को जागर्ति, को जागर्ति?” तिने आणलेल्या अमृत कलशामध्ये असलेले ज्ञान, वैभव देण्यासाठीच ती आलेली असते. जे लक्ष्मीला साद देतात, त्यांना ही सुखसमृद्धी मिळते, अशी समजूत आहे. या दिवशी देवी महालक्ष्मीची पूजा करण्याची खुप ठिकाणी पद्धत आहे. यासाठी स्वच्छ स्नान करतात, उपवास ठेवतात. तांब्याच्या, चांदीच्या किंवा मातीच्या कलशावर वस्त्राने झाकलेली लक्ष्मीची मूर्ती स्थापित करून मनोभावे पूजा करतात. चंद्रोदय झाल्यावर तूपाचे दिवे लावतात. दूध, तूप आणि ड्रायफ्रुट्स घालून खीर बनवली जाते. ती चंद्रप्रकाशात ठेवतात.
त्यानंतर अशी खीर प्रसाद म्हणून वाटतात आणि स्वतःही ग्रहण करतात. कोजागिरीच्या दिवशी घरातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून अश्विनी साजरी केली जाते. घरी मस्त मसाला दूध बनवले जाते. सुका मेव्यात आटवलेले गोड दूध चंद्रप्रकाशात न्हाऊन काढले जाते. मग ते प्राशन केले जाते. मंगलमय गाणी, रास गरबा, भजन, कीर्तन करून ही रात्र जागून काढली जाते.
ईद-ए-मिलादला धार्मिक महत्त्व खुप आहे. ईद-ए-मिलाद हा सण इस्लाम धर्मीयांमध्ये साजरा केला जातो. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून या सणाला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसऱ्या दिवशी बासी ईद साजरी केली जाते. या दिवशी आपल्या इतर धर्मांमध्ये ज्या पद्धतीने विविध सण साजरे केले जातात, त्याप्रमाणेच इस्लाम धर्मामध्ये ईद, बकरी-ईद, मोहरम हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. ईद ए मिलाद या दिवशी मुस्लीम लोक नवीन कपडे घालतात व मशिदीमध्ये जाऊन नमाज अदा करतात. नंतर मित्रमंडळी व नातेवाईकांना भेटून शुभेच्छा देतात. मुस्लीम धर्मगुरू मशिदीत प्रवचन देतात. या दिवशी मुस्लिम बांधव घरी वेगवेगळे गोड पदार्थ तयार करतात. त्या पदार्थांत शिरखुर्मा हा महत्त्वाचा पदार्थ असतो. दुधात साखर, शेवया, बदाम आदी पदार्थ घालून शिजवून स्वादिष्ट केले जाते. इतर धर्मातील लोकांना घरी बोलावून त्यांना गोड पदार्थ खाण्यास देतात. इतर धर्मीय लोक ईद मुबारक असे म्हणून त्यांना या सणाच्या शुभेच्छा देतात. ईदच्या दुसऱ्या दिवशी मुस्लिम बांधव नातेवाईकांना व घरातील सर्वांना घेऊन बागबगीचामध्ये जातात व तेथे एकत्र जेवण करतात. या सणानिमित्त समाजातील इतर लोकही सहभागी होतात; त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता दृढ होण्यास मदत होते. ईद-ए-मिलाद अर्थात ईद उल फितर म्हणजे अल्लाहचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस होय. हा जगभर ईद-ए-मिलादुन्नबी सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुस्लिम धर्माचे दोन मोठे सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह आहेत. ईद उल फितर ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे. याउलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते. ईद उल फितर हा अरबी भाषेतील शब्द आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. तर फितर म्हणजे दान करणे. अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. फितर हा मुस्लिम शरीयत कायद्यातील मापदंड आहे.
इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म इ.स. ५७१मध्ये सौदी अरेबियाच्या मक्का या गावी झाला. जन्माअगोदरच मोहम्मद पैगंबर यांचे पितृछत्र हरपले होते. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या मातोश्रींना पण देवाज्ञा झाली. लहानपणीच माता-पित्याचे छत्र हरपलेल्या अशा या एकाकी पडलेल्या बालकाचे त्याच्या चुलत्याने संगोपन केले. लहानपणापासूनच शिक्षणापासून वंचित राहिलेला हा बालक धर्माचा संस्थापक बनला. आपल्या जीवनकाळात हजरत मोहमद यांनी समस्त मानवजातीला उदारता, समता, विश्वबंधुत्व, सामाजिक न्याय आणि समरसतेची शिकवण दिली. त्यांची शिकवण केवळ काही विशिष्ट जातीधर्मापुरती मर्यादित नव्हती, तर संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी होती. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांचा मृत्यूही याच दिवशी झाला; हा एक योगायोगच म्हणावा लागेल! इस्लाम धर्मीय लोक ईद-ए-मिलाद हा सण मोठ्या आनंदाने व श्रद्धा-भक्तिभावाने साजरा करतात.
!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे त्रिवेणी संगम सणांच्या अमृततुल्य हार्दिक शुभेच्छा !!
✒️अलककार:- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.रामनगर, गडचिरोली,फक्त व्हॉटसॅप-९४२३७१४८८३.