नविन शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षणव्यवस्थेत अमुलाग्र बदल – प्रा. डॉ. दीपक नगरकर

16

✒️कराड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कराड(दि.16ऑक्टोबर):-“नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये शैक्षणिक नियमामध्ये प्रशासकीय व्यवस्थांमध्ये अनेक सुधारणा आणि अमुलाग्र बदल केले आहेत. या धोरणाचे शाश्वत विकास आणि समर्थ, सशक्त व लवचिक शैक्षणिक व्यवस्था उभारणे हे मुख्य ध्येय आहे महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान शाखांचे काटेकोर पालन होणार नाही, विद्यार्थी आता पाहिजे ते कोर्स घेऊ शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेला प्रोत्साहन देणे प्राथमिकता, प्राध्यापकांसह पालकांनाही जागरूक करण्यावर भर, वैचारिक आकलनावर भर, सर्जनशीलता आणि समालोचनात्मक विचारसरणीला, कला आणि विज्ञान यांच्यात वेगळेपणा, नीतिमत्ता, घटनात्मक मूल्ये अभ्यासक्रमाचा प्रमुख भाग अशी नवीन शिक्षण धोरणाचे महत्वाचे घटक आहेत.” असे प्रतिपादन इंग्रजी विषयाचे प्रा. दिपक नगरकर यांनी केले. ते वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड अंतर्गत प्राध्यापक प्रबोधिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘नवीन शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. जी. जाधव हे होते.

प्रा. दिपक नगरकर पुढे म्हणाले कि, “२०३५ पर्यंत सर्व उच्च शिक्षण संस्थांना 3000 हून अधिक विद्यार्थी असलेली बहु-विषय संस्था तयार करावी लागेल. प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख बहु-विषय उच्च संस्था असेल. ओपन डिस्टन्स लर्निंग आणि ऑनलाईन प्रोग्राम्स चालवण्याचा पर्याय संस्थांना असेल. उच्च शिक्षणासाठी तयार केलेली सर्व प्रकारच्या डीम्ड आणि संबंधित विद्यापीठे केवळ विद्यापीठे म्हणून ओळखली जातील. एकात्मिक पद्धतीने मानवी, बौद्धिक, सामाजिक, शारीरिक, भावनिक आणि नैतिक क्षमता विकसित करण्याचे लक्ष्य आहे. नवीन शिक्षण धोरणात संगीत, तत्त्वज्ञान, कला, नृत्य, नाट्यगृह, उच्च संस्थांचे शिक्षण अभ्यासक्रम यांचा समावेश असेल. बॅचलर पदवी 3 किंवा 4 वर्षांच्या कालावधीची असेल. अकादमी बँक ऑफ क्रेडिट बनेल, विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे डिजिटल रेकॉर्ड जमा केले जातील. दर्जेदार पात्रता संशोधनासाठी नवीन राष्ट्रीय संशोधन संस्था स्थापन केली जाईल, ती देशातील सर्व विद्यापीठांशी संबंधित असेल.”

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.जी. जाधव आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले कि, “नवीन शैक्षणिक धोरणात व्यापक आधारभूत, बहु-शाखीय, लवचिक अभ्यासक्रमासह सर्वसमावेशक पदवी शिक्षण अभ्यासक्रम, विषयांचे सर्जनशील संयोजन, व्यावसायिक शिक्षणाचे एकात्मीकरण आणि योग्य प्रमाणीकरणासह बहू प्रवेश आणि निर्गम असे टप्पे केले आहेत. आपण सर्वांनी या धोरणाची काटेकोरपणे अमलबजावणी करावयाची आहे.”

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. आर. पी. पवार यांनी केले. तर डॉ. ए.बी. मुळीक यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. प्रा. संतोष बोंगाळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका उपस्थित होते.