राष्ट्रसंत श्री पाचलेगावकर महाराज ……

35

आश्विन वद्य चतुर्दशी यालाच नरक चतुर्दशी असे म्हणतात. याच दिवशी जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. या दिवसापासून खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते. बऱ्याच भागात नरकचतुर्दशीला दिवाळीचे पहिले पाणी असे संबोधले जाते. या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याची प्रथा रूढ आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुगंधी तेल व उटणे लावले जाते. अंघोळीपूर्वी ओवाळण्याची पद्धत आहे. या दिवशीच्या स्नानाला ‘अभ्यंगस्नान’ असे म्हणतात. अशाप्रकारे नरक चतुर्दशीचे बहु अर्थाने महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीत आहे.

याच नरक चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्राच्या संत भूमीत राष्ट्रसंत श्री संचारेश्वर महाराज यांचा जन्म मराठवाडा विभागात परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथे झाला. श्रीक्षेत्र पाचलेगाव येथील राजाराम पंत व कृष्णाई यांच्या पोटी तेजस्वी दिव्य बालकाचा जन्म झाला. सद्गुरुच्या जन्मापूर्वीच श्री संचारेश्वर महाराजांचे गुरु नयकोटवाडी येथील थोर संत, महंत श्री माधवाश्रम स्वामी महाराज यांनी महाराजांच्या जन्मा बद्दल भविष्यवाणी पाचलेगाव येथे येऊन केली. भविष्यवाणी करताना ते राजाराम पंत व कृष्णाई यांना म्हणाले “ तुमच्या पोटी एका तेजस्वी बालकाची जन्म होईल. हा बालक सर्वसामान्यांप्रमाणे संसारात रमणार नाही. तर तो आपले संपूर्ण जीवन स्व धर्मासाठी व स्व राष्ट्रासाठी अर्पण करेल. संपूर्ण आयुष्य जनसेवा, देशसेवा आणि समाजसेवा करेल.” प्रत्यक्षात तसेच घडले.

श्री संचारेश्वर महाराजांच्या जन्मानंतर घरात आनंदी आनंद झाला. बालवयातच महाराजांनी अनेक लीला केल्या. लहानपणापासूनच सर्वत्र भ्रमण करणे, संचार करणे महाराजांना आवडायचे. अगदी लहानपणापासून सर्व समाजाला त्यांनी भूतदया याची शिकवण दिली. प्राणीमात्रांवर दया करा. ते लहानपणापासूनच ‘सर्पमित्र’ होते. परिसरातील हजारो सापांना त्यांनी जंगलामध्ये, वनामध्ये नेऊन सोडले. ते स्वतः प्रत्यक्ष गळ्यात सर्पहार परिधान करत. साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे. त्याला मारू नका. अशी शिकवण महाराजांनी सर्वसामान्यांना दिली.

महाराज सर्वसामान्यांप्रमाणे शाळेमध्ये शिकण्यासाठी गेले; परंतु तेथेही त्यांचे अद्भुत वर्तन पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले. ते अभ्यासात खूप हुशार होते. एकपाठी असल्याने महाराजांचा अभ्यास लवकर व्हायचा; उरलेल्या वेळात ते देवाचे नामस्मरण करत. आपण सर्व शिवाचे दास आहोत. सर्वांनी देवाचे नामस्मरण केले पाहिजे असे ते सांगायचे. पुढेपुढे शिक्षकांना महाराजांचे हे वर्तन आवडत नव्हते. त्यांनी त्यांना शाळेत येण्यापेक्षा मंदिरात जायला सांगितले. आणि महाराजांची शाळा थांबली पण शिक्षण चालूच राहिले. भविष्यात ते फार मोठे अमोघ वक्ते म्हणून उदयास आले. महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये महाराजांची अनेक प्रवचने, भाषणे झाली. त्यांच्या प्रवचनांना, भाषणांना खूप मोठी गर्दी व्हायची.

प्रवचनांमधून महाराजांनी लोकांना जागृत केले. अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचे फार मोठे काम महाराजांनी केले. सर्व लोक महाराजांना बाबा म्हणत. तरीसुद्धा त्यांनी बुवाबाजी, भोंदूगिरी यावर सतत घणाघात केला. “श्रद्धा ठेवा…..परंतु अंधश्रद्धा ठेवू नका…. अनिष्ट चालीरीती पाळू नका. खरा देव माणसात आहे. माणसातला देव ओळखायला शिका. मानव सेवा, जनसेवा हीच माधव सेवा, ईश्वर सेवा आहे.” हाच संदेश महाराजांनी सदोदित दिला.

महाराज कधीही कोणत्याही प्रकारचा जातिभेद मानत नव्हते. संपूर्ण आयुष्यात त्यांनी कधीच जात-पात-धर्म अशा प्रकारचा भेद मानला नाही. जात-पात-धर्म यापेक्षा देश मोठा असतो. असा त्यांचा विचार होता. हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती त्यांना मान्य नव्हत्या याउलट महाराज स्वतः समष्टी धर्माचे पुरस्कर्ते होते. लहानपणापासून अनेक महान कार्य महाराजांनी केली.

जेथे ज्ञान विज्ञान संजीव होते
जिथे योग विद्येस सामर्थ्य येते
जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा
तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा

1926 सालच्या डिसेंबर महिन्यात कळमनुरी या छोट्या गावात महाराजांनी संहिता स्वाहाकाराचे आयोजन केले. या स्वाहाकाराला श्री संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, संत दासगणू महाराज आणि करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती म्हणजे डॉक्टर कुर्तकोटी या व्यक्तींची उपस्थिती होती. अनेक कीर्तनकार, प्रवचनकार,शास्त्री, पुराणिक, पंडित यांच्यासह समाजाच्या सर्व स्तरातील दीड लाखांचा समुदाय त्याठिकाणी जमला होता. एवढा मोठा विशाल जनसागर एका विशिष्ट ध्येयाने एकत्र आला होता. छोट्या महाराजांची सोपी पण सर्वांना धीर देणारी व आपल्याला काय करायचे ते नीट समजून सांगणारी वाणी आणि त्यांची धर्मनिष्ठा बघून सगळे जण भारावून गेले. याचा शंकराचार्यांना खूप आनंद झाला. हे पाहून त्यांनी स्वतःच्या अंगावरील शाल श्री संचारेश्वर महाराज यांच्या अंगावर घातली. त्यांना ‘धर्मभास्कर’ ही पदवी बहाल केली. अशा प्रकारचे अनेक धार्मिक कार्यक्रम महाराजांनी संपूर्ण देशभर राबवले.

कळमनुरी च्या स्वाहाकार यज्ञापासून श्री संचारेश्वर महाराज सर्वत्र प्रसिद्ध झाले. लोक त्यांना धर्मभास्कर श्री संचारेश्वर महाराज म्हणू लागले. धार्मिक कार्यासोबत त्यांनी अनेक सामाजिक कार्य हाती घेतले. “ ‘श्रमदान हे महादान आहे’. श्रमाची कोणालाही लाज वाटता कामा नये. प्रत्येकाने परमेश्वराची पूजा आणि अनुष्ठान म्हणून श्रमदान करावे. राम आणि काम हे दोन्ही एकच आहेत. त्यामुळे मानव सेवा हीच माधव सेवा आहे. या भावनेतून सर्वांमध्ये श्रमाची आवड निर्माण झाली पाहिजे.” असे महाराज म्हणायचे. श्रमदानाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य महाराजांनी केले. अनेक रस्ते तयार केले. अनेक ठिकाणी बंधारे बांधले. अनेक पुलांची निर्मिती केली. श्रमदानासाठी महाराज स्वतः पुढाकार घेत. श्रमदानाची सुरुवात महाराज स्वतः करायचे. श्रमदान यज्ञाचे व्रत महाराजांनी आयुष्यभर चालू ठेवले. पुढे पंजाबात घेतलेल्या श्रमदान यज्ञ तर इतका मोठा होता की; हे श्रमदानाचे कार्य बघून प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला.

‘बोले तैसा चाले….. त्याची वंदावी पाऊले…” या उक्तीवर महाराजांचा प्रचंड विश्वास होता. ‘आधी केले मग सांगितले’ या तत्त्वानुसार प्रत्येक सामाजिक कार्यात महाराज स्वतः हिरीरीने भाग घेत. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात महाराज रक्तदाना सारखे महत्त्वाचे सामाजिक काम सुद्धा करत. रक्तदान हे फार मोठे दान आहे आणि पुण्याचे काम आहे असे महाराज लोकांना सांगत. त्यामुळे माझ्या कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही रक्तदानाने होते.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या संपूर्ण आयुष्यात महाराजांनी कधीही ही कोणत्याच प्रकारचा भेदभाव केला नाही. ‘जातीभेद हा आपल्या धर्माला लागलेला कलंक आहे.’ तो नष्ट झाला पाहिजे. जातीभेद निर्मूलनाचे अत्यंत पवित्र कार्य महाराजांनी हाती घेतले. विनायक दामोदर सावरकरांनी पतित-पावन मंदिराची स्थापना केली या कार्यातही महाराजांची मोलाची साथ सावरकरांना लाभली. महाराजांचे जातीभेद निर्मूलनाचे हे कार्य बघून कालांतराने महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत श्री पाचलेगावकर महाराज यांना ‘दलित मित्र’ हा पुरस्कार देऊन महाराजांचा यथोचित गौरव केला.

महाराजांच्या समाजसेवेच्या कार्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलनाचे फार मोठे कार्य महाराजांनी केले. ते उत्कृष्ट मानसोपचार तज्ञ होते. लोकांच्या अनेक प्रकारच्या मानसिक बाधा, आजार महाराजांनी दूर केल्या. ते सर्वसामान्य जनतेला नेहमी सांगत “चमत्कार ही चोरी आहे. कोणाच्याही चमत्कारावर विश्वास ठेवू नका.” त्याच बरोबर महाराज ठिक-ठिकाणी ‘लाहाडी’ चे प्रयोग करून दाखवत. 1928 साली पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पटांगणावर महाराजांनी लाहाडीचा प्रयोग आयोजित केला. यासाठी साहित्यसम्राट न चि केळकर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या प्रचंड मोठ्या मैदानावर खोल आणि लांबलचक चर खोदण्यात आला त्यावर लाकडे पेटवून अग्नी प्रदीप्त करण्यात आला. जमलेल्या स्त्रियांनी अग्नीची पूजा केली आणि नंतर महाराज व त्यांच्या पाठोपाठ हजारो लोक त्या पेटलेल्या निखाऱ्यावरून चालत गेले. पण कुणालाही भाजले नाही. हा प्रयोग पाहण्यासाठी असे कसे शक्य आहे….? या भावनेतून आलेले सर्व लोक, बातमीदार हे दृश्य पाहून अवाक झाले.

या सगळ्या कार्यासोबत महाराजांनी केलेले देशसेवेचे कार्य फार मोठे आहे. सांगताना खंत वाटते की; महाराजांचे प्रचंड मोठे देशसेवेचे कार्य असून सुद्धा त्यांच्या कार्याची पाहिजे तशी दखल आजवर घेण्यात आलेली नाही. महाराजांच्या जन्माच्या वेळी…… व कर्तुत्व काळाच्या वेळी….. मराठवाडा हा निजामाच्या आधिपत्याखाली होता. महाराजांनी निजामाविरुद्ध बंड पुकारला. लोकांना जागृत केले. म्हणून निजामाने महाराजांना जहागिरी, दोनशे एकर जमीन, दिमतीला चार अंगरक्षक, घोडागाडी, मोफत रेल्वे प्रवास, दोन कोटी रुपये, संरक्षणाची व्यवस्था, राहायला बंगला इत्यादी गोष्टी देण्याची हमी असणारी कागदपत्रे दिली. निजामाने वेगवेगळे आमिष दाखवून महाराजांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला पण महाराजांनी आपला निर्धार सोडला नाही. निजामाचा हा डाव साधला नाही. महाराज लोकजागृतीचे काम करतच राहिले. यामुळेच चिडून निजामाने महाराजांना आपल्या राज्याबाहेर हद्दपार केले. म्हणून महाराज पुढे खामगाव येथे स्थायिक झाले. तेथेही निजामाने इंग्रजांना सांगून त्या भागातूनही महाराजांना हद्दपार केले. तरी देखील महाराज डगमगले नाहीत. काही काळासाठी ते फ्रेंच राजवटीत पोंडीचेरी येथे जाऊन राहिले; व तेथून आपले देश कार्याचे काम चालू ठेवले. “स्वातंत्र्य हे भिक मागून….. भिक्षा मागून…. मिळत नाही तर ते मनगटाच्या बळावरच मिळवावे लागते.” असा महाराजांचा ठाम विश्वास होता. यासाठी त्यांनी लोकांना जागृत केले. समाजातील तरुणांना बलोपासनेचे धडे दिले. तरुणांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. यासाठी प्रथम महाराजांनी ‘हिंदूराष्ट्र सेनेचे’ स्थापना केली. या ‘हिंदु राष्ट्र सेने’ मध्ये सहभागी झालेल्या तरुणांना बलोपासना चे धडे दिले. बळाला बुद्धीची, ज्ञानाची जोड मिळाली पाहिजे तरच बळ हे चांगल्या कार्यासाठी उपयोगी येऊ शकते. यामुळे महाराजांनी बलोपासना सोबत संस्काराचे धडे सुद्धा तरुणांना दिले. हिंदू राष्ट्र सेनेमध्ये जवळजवळ बारा हजाराहुन अधिक तरुणांचा समावेश होता. परंतु पुढे एका राष्ट्रीय संघटनेच्या आग्रहास्तव महाराजांनी ‘हिंदू राष्ट्र सेना’ ही त्यांच्या सशस्त्र संघटनेमध्ये विलीन केली. भविष्यात ‘हिंदूराष्ट्र सेनेचे’ कार्य प्रभावी राहिले नाही. याची महाराजाला फार खंत वाटली. पण महाराज डगमगले नाहीत. तर त्यांनी पुन्हा ‘मुक्तेश्वर सेनाची’ स्थापन केले. या मुक्तेश्वर सेनेनेही मोठ्या प्रमाणात देशसेवेचे कार्य केले. अशाप्रकारे महाराजांचे देशसेवेचे कार्य फार अफाट होते. त्यांच्या देशसेवेबद्दल किती लिहावे….? हाच प्रश्न आहे…

संपूर्ण भारत देशामध्ये जनजागृतीसाठी महाराजांनी प्रवास केला. 1946 सालच्या अखेरपर्यंत महाराजांनी समष्टी धर्माचा प्रचार आणि राष्ट्रप्रेम निर्माण करण्यासाठी रात्रीचा दिवस करून भोपाळ, ग्वाल्हेर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, वऱ्हाड, दिल्ली, राजपुताना, सांगली, कुरुंदवाड आणि मिरज ही संस्थाने….. कोकण, पुणे, मुंबई असा संपूर्ण भाग पिंजून काढला. ठिक-ठिकाणी लोकजागृतीचे कार्य केले. दिल्ली, ग्वाल्हेर भागातल्या जनजागरण कार्यानंतर महाराज बेळगाव जिल्ह्यात आले. येथेही त्यांनी लोक जागृती केली.

राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्या मंदिरातील चित्ररथ पाहून त्या काळात संपूर्ण देशामध्ये महाराजांना मानणारे किती थोर लोक होते याची जाणीव होते. स्वतः राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि श्री संचारेश्वर महाराज यांची देशाविषयी अनेक वेळा चर्चा झाली. महात्मा गांधी यांना सुद्धा श्री संचारेश्वर महाराज यांच्या कार्याविषयी आदर होता. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, यासारखी दिग्गज मंडळी सुद्धा महाराजा समोर हात जोडून उभी असलेली चित्र रथामध्ये पाहायला मिळतात. यावरून महाराजांचे कार्य…. त्यांचे व्यक्तिमत्व… किती उत्तुंग होते याची प्रचिती येते. असा महान पुण्यात्मा…. अवतारी पुरुष…. ज्या भागात जन्माला आला अशा या मराठवाड्याचे खऱ्या अर्थाने सद्भाग्य आहे. तरीसुद्धा आजही महाराजांच्या कार्याची खरी प्रचिती बऱ्याच लोकांना नाही. महाराजांचे देशभरात 92 आश्रम आहेत. देशभरात विशेषतः मुंबई, पुणे या ठिकाणी मोठी शिष्य मंडळी महाराजांची आहे. आजही विविध आश्रमा मधून महाराजांच्या समाजजागृतीचे कार्य अविरतपणे चालू आहे. आमचे श्रद्धास्थान असणाऱ्या राष्ट्रसंत श्री संचारेश्वर पाचलेगावकर महाराज यांच्या चरणी स्वलिखित कविता समर्पित करून कोटी कोटी दंडवत करतो आणि तूर्त थांबतो….

✒️शब्दांकन:-मयूर मधुकरराव जोशी(श्रीक्षेत्र पाचलेगाव,विठ्ठल रुक्मिणी नगर जिंतूर जिल्हा,परभणी(मो:-9767733560,7972344128)