चला दिवाळी साजरी करूया

30

जात, धर्म आणि संप्रदाय तो
भेद सारे संपवून टाकूया
दिवा लावूया एकात्मतेचा
एकमनाने एकत्र होऊया……
*चला दिवाळी साजरी करूया*……

गरीब-श्रीमंत आणि वर्णभेद तो
लिंगभेद सुद्धा नष्ट करूया
दिवा लावूया समानतेचा
हात-हातात घेऊन पुढे जाऊया…..
*चला दिवाळी साजरी करूया*……

राग-लोभ आणि अहंकार तो
दोष सारे संपवून टाकूया
दिवा लावूया ज्ञानज्योतीचा
अज्ञान, अंधकार उजळूनी टाकूया……
*चला दिवाळी साजरी करूया*…..

नको गुलामी कधीच कुणाची
पारतंत्र्य सारे नष्ट करूया
दिवा लावूया स्वातंत्र्याचा
मुक्त मोकळा श्वास घेऊया…..
*चला दिवाळी साजरी करूया*……

भीती नको हो कधीच कशाची
आदर मात्र प्रत्येकाचा करूया
दिवा लावूया निर्भयतेचा
प्रत्येक अस्तित्वाचा सन्मान करूया….
*चला दिवाळी साजरी करूया*…..

शंका-संशय आणि अविश्वास तो
गैरसमज सारे नष्ट करूया
दिवा लावूया विश्वासाचा
अंतर्मन ही उजळूनी टाकूया
*चला दिवाळी साजरी करूया…..*

काय तुझे अन् काय माझे
संकुचितता संपवून टाकूया
दिवा लावूया समर्पणाचा
एक दुसऱ्यांसाठी जगून बघूया….
*चला दिवाळी साजरी करूया…..*

वाद-विवाद आणि भांडणतंटा
द्वेष, तिरस्कार संपवून टाकूया
दिवा लावूया माया-ममतेचा
अखंड आपलेपणा जपूया……
*चला दिवाळी साजरी करूया*…..

 

✒️मयूर मधुकरराव जोशी(विठ्ठल-रुक्मिणी नगर,जिंतुर)मो:7972344128,9767733560