झाडीपट्टी रंगभुमीत दिग्दर्शक युवराज गोंगले यांचा अनोखा उपक्रम

36

🔸स्थानिक नाट्यमंडळाचा संविधान व मिठाई देत केला सत्कार-माजी जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी केले उपक्रमाचे कौतुक

✒️नागभिड,तालुका प्रतिनिधी(संजय बागडे)मो:-9689865954

नागभीड(दि.28ऑक्टोबर):-कोरोना काळात बंद असलेल्या झाडीपट्टी रंगभुमीतील नाटकांना दिवाळीपासुन सुरुवात झाली आहे. यामुळे नाट्यरसिकांना आता आवडत्या नाटक व संगीताची मेजवानी पुनःश्च मिळणार आहे. दरवर्षी आपल्या गावात नाटक करण्यासाठी गावातील तरुण व प्रतिष्ठित मंडळी महिन्याभरापासुनच याची पुर्वतयारी करतात. मंडपाची जागा निश्चिती , स्टेज निर्मिती , उद्घाटनासाठी पाहुण्यांची वेळ घेणे , नाट्यमंडळाची निवड करीत बहारदार नाटक ठरविणे व त्याची जाहिरात करणे , तिकिटविक्री , या व अशा अनेक बाबींची तयारी स्थानिक नाट्यमंडळाला स्वत:चा वेळ देत करावी लागते.

नाटक पुर्ण होईपर्यंत या नाटकासाठी धडपड करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रचंड मेहनत करावी लागते . वेळप्रसंगी वेगवेगळ्या अप्रिय घटनांनाही त्यांनाच सामोरे जावे लागते . मात्र नाटक यशस्वी व्हावे यासाठी मेहनत करणाऱ्या या कार्यकर्त्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष असते . या सर्वांची जाणीव ठेवत झाडीपट्टी रंगभुमीवरील नागभीड-वडसा निर्मित प्रसिद्ध शिवम् थिएटर्स चे लेखक-दिग्दर्शक युवराज गोंगले यांनी यावर्षीपासुन ज्या ठिकाणी त्यांच्या नाट्य कंपनीचे नाटक होईल तेथील नाट्य मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांचा नाट्य प्रयोगाच्या सुरुवातीला सत्कार करण्याचा मनोदय जाहीर केला व त्याची सुरुवात नागभीड तालुक्यातील कोर्धा येथुन केली.

भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी कोर्धा येथे मंडईनिमित्य नाट्यप्रयोगाचे आयोजन केल्या जाते. यावर्षी शिवम् थिएटर्स चे गाजत असलेले नाटक “ विरा तु परतून ये रे “ या नाटकाचे आयोजन जय जवान जय किसान नाट्य कला मंडळ , कोर्धा यांनी केले होते. या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी असलेले समारंभाचे अध्यक्ष या क्षेत्राचे माजी जि.प.सदस्य व भाजपा चंद्रपुर जिल्हा महामंत्री संजय गजपुरे तसेच उद्घाटक माजी पं.स. सदस्य व तालुका भाजप अध्यक्ष संतोष रडके यांच्या प्रमुख उपस्थितीत दिग्दर्शक युवराज गोंगले व नाट्य निर्माती सौ.ममता गोंगले यांनी हा सत्काराचा उपक्रम सुरु करण्या पाठीमागची भुमिका विशद केली व नाट्य मंडळाचे अध्यक्ष सचिन वाकुडकर , सचिव गोवर्धन हिवरकर , व्यवस्थापक विजय खोब्रागडे व मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छांसह भारतीय संविधानाची प्रत व मिठाई देत सत्कार केला.

संजय गजपुरे यांनी दिग्दर्शक युवराज गोंगले यांनी सुरु केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करीत दिवसेंदिवस झाडीपट्टी रंगभुमी समृध्द व संवेदनशील होत असल्याचे प्रतिपादन करीत युवकांमध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेवर चिंता व्यक्त केली व यापासून दुर होत आपला वेळ व पैसा सत्कार्यी लावण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मंचावर कोर्धा ग्रा.पं.च्या सरपंच सौ.पुष्पाताई चौधरी , उपसरपंच दिनेश चौधरी , कृऊबास संचालक धनराज ढोक व मनोहर चौधरी , भाजपा जि.प.प्रमुख अरविंद भुते , तंटा मुक्त समिती अध्यक्ष हरिदास नवघडे , भाजपा ज्येष्ठ नेते वासुदेवजी जिवतोडे , प्रा.हरिदास वाकुडकर , स्वप्निल नवघडे , पोलीस पाटील आनंद जिवतोडे तसेच ग्रा.पं.चे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नाट्य मंडळाचे उपाध्यक्ष शंकर मशाखेत्री यांनी केले.