ह्रदयाची ह्रदयाशी रेंज ना मिळाली…

15

माझ्या प्रियाला माझी
प्रीत ना कळाली
ह्रदयाची ह्रदयाशी
रेंज ना मिळाली

पियू उर्फ…कशी आहेस गं तू? मी म्हणणार नाही तू आनंदात असेल म्हणून…कारण मला माहीत आहे तू माझ्याच आठवणीत असते आणि विशेष म्हणजे तुझ्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलुंची जाणीव आहे ना मला…हे मी म्हणत नाही, तर तुच म्हणाली होतीस…आणि तुझं म्हणणं अगदी खरं होतं. मी प्रेमच दिलं आहे ना तसं…अगदी अंत:करणातून…यामुळे एवढी तर जाणीव ठेवावीच लागते. मध्यंतरी तुझा एक आर्टिकल आला होता. वाचून खूप आनंद मिळाला की, माझी पियू तर माझ्यापेक्षाही सरस आहे आणि तिचे विचार पण खूप श्रेष्ठ…आणि तेवढंच दु:ख पण…तुला काय वाटलं गं! मला कळणार नाही. म्हणजेच तू दिलेल्या…बद्दल. तू घेतलेला निर्णय तुझ्या परीने कसा होता? हे तर मला माहीत नाही. पण माझ्या परीने…यासंदर्भात मला सांगता येणं खूप म्हणजे खूपच अवघड आहे. तू हा निर्णय का घेतला होता? याचं स्पष्टीकरण तुला द्यावसं वाटलं नाही. पण…का? या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी दररोज तो…परत परत बघत असतो; पण विचारांचा गुंता काही केल्या सुटता सुटत नाही. तुझ्या नजरेत कदाचित माझे पाऊल योग्य दिशेने पडलेच नाही. ठीक आहे…

मी इथे चुकलो असेल…पण माझे चुकते पाऊल वळवून मला योग्य दिशा दाखवण्याचं कार्य तुझंच नव्हतं का? हे बघ! तू वाईट वाटून घेऊ नकोस. माझ्या चुकीचं खापर मी तुझ्यावर फोडणार नाही नि तुझ्या भावना दुखविणार नाही. केवळ माझं एक मत मी व्यक्त करत आहे. मी तुला आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. कशा विसरू त्या जागविलेल्या लांब रात्री? कशा विसरू त्या ह्रदयातून उठणा-या कळा?

तुझी आठवण आली नाही
असं कधीच झालं नाही
आठवायला विसरावं लागतं
पण तुला विसरताच आलं नाही

तुला एक विचारायचं आहे. तुला खरंच वाटते का? मी नियती समजून सर्वमान्य केलं आणि परिस्थिती आहे तशी सहज स्वीकारलं. खरंच हे एवढं सुलभ होतं का? नाही म्हणजे तुला वाटलं असेल तर काही हरकत नाही. कारण प्रत्येकाची मानसिकता ही वेगळी असते ना म्हणून…तू असंही म्हणाली होती की, मी एक कारण नाही पटवून देऊ शकलो. परंतु त्याविषयी मी तुला सांगितलं होतं की, मी सर्व सांभाळून घेईन. तरी पण तुला वाटत असेल तर…

तुला समजावून सांगावं
अशी ही गोष्टच नव्हती
न सांगितल्यामुळे तुला समजलं नाही
एवढीही तू नासमज नव्हतीस…

तू मला एकदा प्रश्न केला होता की, माझ्या मनात या भावना निर्माण होण्यासाठी मी एकटीच जबाबदार आहे. पण मी कधीही तुलाच जबाबदार ठरविले का? ज्या काही भावना निर्माण झाल्या होत्या, त्याला सर्वस्वी आपण दोघेही सारखेच जबाबदार आहोत ना गं..! अगं रडूबाई, असं एकाएकी अबोला धरून काय साध्य झालं गं…तुच विचार करून बघ ना…तुला जर तुझे स्वप्न पूर्ण करायचं होतं, तर तसं मला सांगायला हवं होतं. मी तुझ्या स्वप्नांच्या आड आलोच नसतो. कारण आपण बोलत असतो, तर तुझं अभ्यासात मन लागलं नसतं. अभ्यासात मन लागलं नसतं, तर साहजिकच तुझ्या स्वप्नांच्या आड अडचणी निर्माण झाल्या असत्या…या गोष्टी मला कळत नाही का गं? आताही दु:ख वाटत असलं, तरी ते दु:ख थोडं बाजूला सारलं, तर तू तुझं स्वप्न साकार करते आहे. या आनंदाची एक हलकीशी झुळूक मनाला स्पर्शून जातं. कधी-कधी असाही विचार मनात येतो की, जे झालं ते चांगलंच झालं. कारण आपली परिस्थिती हलाखीची, त्यामुळे कशाला..?

कधी काळी असं वाटत होतं की, एका वडील नसलेल्या मुलीचा आपण आयुष्यभरासाठी आधारकर्ता बनलं…तिला वडिलांची उणीव कधी भासू दिली नाही, तर कधीतरी, कुठेतरी देवाची मर्जी आपल्याला लाभेल…म्हणजे यात कसलाही स्वार्थ नाही, तर एक चांगले व्यक्तिमत्त्व म्हणून निदान कृपाप्रसाद तरी लाभेल बस्स एवढंच…आपली परिस्थिती जरी हलाखीची असली, तरी आपण खूप प्रेम तर देऊ शकतो…शिवाय आपल्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं सुख…पण, म्हणतात ना स्वप्न ही कितीही आपुलकीने रंगविली, तरी ती कधीच आपली होत नसतात. ते खरं आहे…अगं ए! तू परत रडते आहेस. हे बघ मला प्रत्यय आला म्हणून मी सांगत आहे. मला तुला रडवायचं नव्हतं गं! आधी तू तुझ्या डोळ्यांत आलेले अश्रू थांबव बरं…तरच मी पुढे बोलेन…नाहीतर मी इथेच थांबणार…गुड! तू एकदा असंही म्हटलं होतं की, आपल्या दोघांचेही मार्ग वेगळे आहेत…मागील काही वर्षांचा आढावा घेता खरंच तसंच आहे; पण त्यानंतर तू असं पण म्हटलं…

काही बंधने तर
काहीसं अंतर आहे
ध्येयाची कास नि
वळणावर साथ हवी आहे

हे बघ! आपल्या दोघांचेही मार्ग वेगवेगळे जरी असले, तरी तुझ्या प्रत्येक वळणावर माझी साथ असेल…फरक एवढाच राहील की, नातं बदललेलं असेल. म्हणजे यदाकदाचित तू तुझा संसार थाटला असेल किंवा थाटणार असेल, तेव्हा मला तुझा प्रियकर म्हणून साथ देता येणार नाही…तर एक मित्र म्हणून नक्कीच साथ देईन…त्यानंतर लगेच तू असंही म्हटलं होतं…

माझ्या पापणीतील ओढ
कळली असेल तर
माझ्याजवळ येण्याची
वाटही खुली आहे

अगं येडू! एकदा तुझ्या मनालाच विचारून बघ ना! तुझ्या पापणीतील ओढ मला कळली नसेल का? कळणार नाही असं कधी झालंय का? राहिला प्रश्न तुझ्याजवळ येण्याचा…तर मला माहीत आहे, तुझ्याजवळ येण्याची वाट माझ्यासाठी मोकळी आहे; पण मी चौफुलीवर उभा आहे…त्यामुळे मला नेमकी वाट गवसत नाही. कारण तू कोणत्या वाटेवर आहे? हा एक संभ्रम आहे ना! म्हणून इच्छा असूनसुद्धा येऊ शकत नाही. नाही तर मी कधीचाच आलो असतो…
मला तुझी आठवण येते की नाही? येत असल्यास किती व कधी? हे तुला सांगायची आवश्यकता नाही. कारण हे सर्व तुला माहीतच आहे. पण माझ्याही व्यतिरिक्त तुला आठवणारं कुणी तरी होतं गं! हे पण तुला चांगल्या त-हेने माहीत होतं. ठीक आहे…तुला माझ्याशी बोलायचं नव्हतं तर बोलली नसतीस. पण कमीतकमी तिच्याशी तर बोलायला हवी होतीस. ती नेहमी तुझी आठवण काढत असते नि मला विचारत असते. मी सरळ सांगत असतो की, तू रुसली आहेस म्हणून…हे बघ! हा काही बहाणा नाही, तर वस्तुस्थिती आहे. हेसुद्धा तुला माहित होतं. तू पुढे काय निर्णय घेतला याचा मला तसूभरही अंदाज नाही. पण वेळ निघून गेल्यावर घेतलेल्या निर्णयात काहीच तथ्य नसते, असं मला तरी वाटते. कारण जीवनाच्या प्रवासात कधी कोणता व कसा टर्निंग पाईंट येईल हे तुलाही सांगता येत नाही नि मलाही…

यामुळे जो काही निर्णय घेतला तो योग्यच असेल. तू घेतलेल्या निर्णयाचं माझ्याकडून स्वागतच आहे. पण एक लक्षात घे! माझं जीवन तुझ्याविना…

मी आजही स्वप्नांच्या जगात वावरत आहे. तू परत येशील या आशेवर…असो! माझा जास्त विचार करू नको? माझी काळजी करू नकोस? मी मजेत आहे…तू फक्त स्वत:कडे लक्ष दे..! खूप मेहनत कर नि यशाचं उंच शिखर गाठ…जेणेकरून सर्वजण तुला प्रणाम करतील. मी त्याच क्षणाची वाट बघत आहे. कारण त्यावेळी सर्वात जास्त आनंद मला होईल…जर असं झालं, तर निश्चितच तुला माझ्यापेक्षाही चांगली व्यक्ती जीवनसाथी म्हणून मिळेल. तुला तुझ्या स्वप्नपूर्तीसाठी नि भावी वाटचालीसाठी मन:पूर्वक अगणित हार्दिक शुभेच्छा!
खूप यश संपादन कर आणि खूप गुणवंत हो..!

फक्त नि 
तुझाच

✒️सुनील(यवतमाळ)