जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांना भ्रष्टाचाराचा शाप !

32

जळगाव जिल्हा बँक राजकीय चोर आपसात ठरवून घेत असत.खातेदारांना , ठेवीदारांना, कर्जदारांना कळू न देता सर्वच पक्षाचे चोर च्याऊं म्यांऊ करून थो थो थापडी करून घेत असत.ती कोंडी जळगाव जिल्हा जागृत जनमंच ने फोडली.नवीन होतकरू उमेदवारांना उभे केले.अंधारात होणाऱ्या वाटाघाटी मैदानात आणल्या.जे लोक आमदार झाले, मंत्री झाले ते सुद्धा जिल्हा बँकचे संचालक का होऊ पाहातात? मोठे रहस्यमय प्रकरण आहे.

आता जळगाव जिल्हा दूध फेडरेशन ची निवडणूक लागली.येथेही आमदार खासदारांनी त्यांचे कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याऐवजी स्वताच्या अंगाला हळद लावून घेतली.म्हणे चेल्यांनो,म्हणा दामींडा.ही थेरडी माणसे मुलाचे, नातूचे सोयरीक पाहायला जातात आणि स्वताच नवरदेव बनून घरी येतात तेंव्हा मुलाला,नातूला राग तर आलाच पाहिजे.तसे आता हे आमदार खासदार,आजी माजी दाजी दूध फेडरेशन मधे संचालक पदासाठी हात थरथरत उमेदवारी करीत आहेत.यांना जनाची ही नाही आणि मनाची वाटत नाही.म्हणून यांना धडा शिकवला पाहिजे.आपला आमदार ,आपला खासदार जर येथेही गर्दी करीत असेल तर त्याच्या विरोधात स्वतः उमेदवारी केली पाहिजे.चेल्यांना हिंमत नसेल तर अन्य कोणी दमदार माणूस उभा केला पाहिजे.कारण आहे ‌‌.मला राग या आमदार खासदार पदांचा नाही, यांनी दूध दही लोणी तूप चोरले याचा आहे.

जळगाव दूध फेडरेशन खडसेंनी खिशात घातले.पांच वर्षात काय काय गौडबंगाल केले ते कोणालाही सांगितले नाही.कळू दिले नाही.पण दुर्दैवाने त्यांचे संचालक मंडळ बरखास्त करून नवीन दमाचे संचालक नेमले.यांनी एकाच महिन्यात हे गौडबंगाल उघडकीस आणले.मग सारे जमले शहर पोलिस स्टेशनला.म्हणे, हवालदार साहेब आमची फरियाद नोंदवून घ्या.हिच फरियाद आधी का नोंदवली नाही?आत्ताच का अवदसा आठवली? तोपर्यंत खडसेंनी कोणालाही सांगितले नाही कि कळू दिले नाही.कुठेही तक्रार केली नाही कि बातमी येऊ दिली नाही.कि येथले लोणी वाईला कसे जात होते?

शेतकरी बांधवानो,हे गौडबंगाल का व कसे उघडकीस आले?त्याचे रहस्य पोलिसांना काय न्यायाधिशांना ही कळणार नाही.पण आपल्यासाठी साधे सरळ गणित आहे,कि, संचालक मंडळ बदलले म्हणून गौडबंगाल बाहेर आले.नाहीतर तुम्हाला मला तीन पिढ्या कळाले नसते.यासाठीच संचालक मंडळ बदल करणे आवश्यक असते.यासाठीच दर पांच वर्षांनी निवडणूक असते.दोन्ही वेळेस चोरांचे संचालक मंडळ निवडून आले तरी ते चोर एकमेकांचे वाभाडे काढतात.तेंव्हा ते गौडबंगाल बाहेर येते.त्यासाठी सोपा उपाय आहे.जे लोक आधी संचालक होते, चेअरमन होते त्यांना हाणून पाडा.त्याने कितीही पैसे किंवा प्रलोभन दिले तरी सुद्धा.

खडसे महाशय आता या वयात जळगाव शहरातील रस्त्यांवर फिरत आहेत.चांगली गोष्ट आहे. रस्ते कामात भ्रष्टाचार विरोधात खडसे बोलले म्हणजे पूर्वेकडे उगवणारा सुर्य पश्चिमेला उगवला.हे महाशय जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री होते.भयंकर भ्रष्टाचार चालू होता.लोकांना फक्त रेतीमातीचा भ्रष्टाचार माहिती आहे.पण जिल्हा परिषदेत तर भ्रष्टाचाराचे कुरण मातले होते.आम्ही जळगाव जिल्हा जागृत जनमंच आधिकाऱ्यांकडे तक्रार करून थकले.आंदोलन करून थकले.पण चोर सीईओ,चोर बीडीओ दाद देईनात.म्हणून आम्ही पालकमंत्री कडे तीन वेळा निवेदन दिले.मदत मागितली.म्हणून आम्ही यांची वाट पाहात निंबाच्या झाडाखाली ठाण मांडून बसलो.केंव्हातरी येतील पालकमंत्री.आमचे ऐकून घेतील.काहीतरी कारवाई करतील‌.तेंव्हा हे पालकमंत्री जमीनीवर चालत नव्हते.यांनी आम्हाला पोलिसांचे हवाली केले.भ्रष्टाचार करणे आमचा,झेडपी आधिकाऱ्यांचा घटनादत्त अधिकार आहे.आम्ही करणारच.

पोलिसांनो, यांना आंत घ्या,आणि आमचे अधिकार शिकवा.खूप मोठा जुलूम केला.आम्ही चार वर्षे कोर्टात चकरा मारल्या.सुटलो कसेतरी.पण मध्यंतरीच्या कालखंडात हेच पालकमंत्री भोसरी प्रकरणात अडकले.मंत्रीपद गमावून बसले.चार वर्षे जखमेवर तेल मागत होते.अश्वस्थामा सारखे.सांगा,मी काय अपराध केला?मी काय गुन्हा केला?

आता ग्रामविकासमंत्री मा.गिरीश महाजन जळगाव जिल्ह्यातील आहेत.मला बरे वाटले.आपला आमदार,आपला ग्रामविकासमंत्री.असा मोतीफळाचा पाऊस कधी कधी पडतो.म्हणून महाजन यांना समक्ष भेटून सांगितले कि, जळगाव झेडपीत अतोनात भ्रष्टाचार चालू आहे.लांचखोरी,हप्तेखोरी ने कहर केला आहे.तुम्ही मंत्री आहात.डाकीण सुद्धा एक घर सोडते.तुम्ही सुद्धा जळगाव जिल्हा सोडा. फक्त सहा तास वेळ द्या. जिल्हातील भ्रष्टाचाराच्या तक्रारी सीईओ,बीडीओ आणि तक्रारदार नागरिक असे आमनेसामने बसून सोडवू.मंत्र्यांना उत्पन्नाची साधने भरपूर असतात.आमची विनंती येथे प्रामाणिकपणा दाखवा.मंत्री आहात तर मंत्री सारखे काम करा.
माझ्या विनंतीला महाजन यांनी हो तर म्हटले.पण अजून तयारी दाखवली नाही.खडसेंसारखी साडेसाती महाजन यांना लागू नये, तोपर्यंत तरी त्यांनी आमची विनंती मान्य करावी.जळगांव जिल्ह्यातील मंत्र्यांना शाप आहे.ते चुकीची कामे करतात.कुठेतरी अडकतात.नंतर अस्वस्थामा सारखे जखमेवर तेल मागत फिरतात.मंत्रीपद मिळाले तर त्याचा मोठेपणा न घेता,त्याचे लाभ जिल्ह्यातील जनतेला न देता , भ्रष्टाचारात अडकतात.खडसेंइतकाच अतिरेक गुलाबराव पाटील यांनी सुद्धा केला आहे,अशी तक्रार मी आमदार चंद्रकांत पाटील , डॉ राधेश्याम चौधरी यांचे समोरच महाजन यांचेकडे केली आहे.भ्रष्टाचाराचा शाप त्यांना ही सोडणार नाही.हे नक्कीच.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,जळगाव