जिल्ह्यातील वाढत्या बाधित संख्येने घाबरून जाऊ नका-ना.विजय वडेट्टीवार

28

🔺चाचण्या वाढवल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाधित पुढे येत आहे.

🔸सावलीत कमलाकर बटे यांना 50 हजाराची आपत्ती मदत.

✒️सावली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सावली(दि.13जुलै):- चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 12 जुलै रोजी 186 बाधितांचा आकडा पुढे आला आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी बाधितांची संख्या कदाचित वाढेल. कारण स्वॅब तपासणी चाचण्या वाढल्या आहेत. उपचारांमध्ये असणाऱ्या प्रत्येक बाधितांची वेगळी काळजी घेतली जात असून संपूर्ण सरकारी यंत्रणेचे काम युध्द पातळीवर सुरू असून त्यांच्यावर विश्वास ठेवा. वाढत्या संख्येने घाबरून जाऊ नका, असा संदेश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण,खार जमीन विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज जिल्ह्यातील जनतेला दिला आहे.

सावली तहसील कार्यालयामध्ये आज झालेल्या कोरोना संदर्भात आढावा बैठकीमध्ये ते मार्गदर्शन करत होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्तीत वीज पडून दोन बैल ठार झाल्यामुळे तालुक्यातील कवटी येथील शेतकरी कमलाकर रुमाजी बटे यांना 50 हजार रुपयाचा धनादेश तहसील कार्यालयाच्या वतीने त्यांनी दिला. नैसर्गिक आपत्तीत शासन प्रत्येक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोना संक्रमितांची वाढती संख्या याबाबत त्यांनी जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत पुढे आलेल्या 186 बाधितांपैकी 96 बाधित उपचारा नंतर सुखरूप घरी गेलेले आहेत. त्यांच्या जीविताला कोणताही धोका नाही. उपचार घेत असलेले सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. जिल्हाभरातील नागरिकांनी एक बाब लक्षात घ्यावी. जिल्ह्यांमध्ये दर दिवसाला साडेतीनशेच्या आसपास टेस्ट होत आहेत. जिल्ह्यांमध्ये 2.18 कोटी रुपये खर्च करून कोरोना प्रयोगशाळा चंद्रपूर येथे सुरू करण्यात आली आहे. चंद्रपूर येथील प्रयोगशाळेत सोबतच नागपूर येथील दोन्ही प्रयोगशाळेत काही आवश्यकता असली तर स्वॅब नमुने पाठवण्यात येत आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देश आपण आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. पुढील काही दिवसात आणखी बाधित संख्या वाढलेली पुढे येऊ शकते. मात्र हे समाजासाठी चांगले असून जितक्या चाचण्या अधिक होतील. तितके हॉटस्पॉट तयार करून, प्रतिबंधित क्षेत्र तयार करून, कोरोना आजाराची लढता येईल, ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

कोरोना संदर्भात जिल्हाभरातील नागरिकांना प्रशासनाची कोणताही संपर्क साधायचा असेल, मार्गदर्शन, माहिती मागायची असेल, कोणती माहिती द्यायची असेल,तर त्यासाठी 1077, 07172-261226 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोरोना संदर्भात त्यांनी सावली तालुक्यातील सद्यस्थिती देखील यावेळी जाणून घेतली. सावली तालुक्यामध्ये सध्या अलगीकरणात 65 नागरिक आहेत. जवळपास 173 नमुने सावली तालुक्यातून घेण्यात आले आहे. यातील 23 नमुने सध्या प्रतीक्षेत आहेत. अन्य सर्व निगेटिव्ह आलेले आहेत. यावेळी त्यांनी नजीकच्या मुल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित पुढे येत असल्याचे विशद करताना या ठिकाणची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगितले. सावलीमध्ये देखील प्रत्येक गावात बाहेरून येणाऱ्याची नोंद ठेवा, असे आवाहन केले.

अलगीकरण व विलगीकरण अर्थात कॉरेन्टाईन ज्या ठिकाणी होत आहे. त्या ठिकाणी उत्तम सुविधा राहतील याकडे कटाक्षाने लक्ष द्या, जिल्हाभरातील ग्रामपंचायतींना यासाठी 25 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे. आणखीही निधी लागला तर तो वितरित केल्या जाईल. मात्र गावात येणाऱ्या नागरिकांचे अलगीकरण झालेच पाहिजे. याकडे लक्ष वेधण्याची सूचना त्यांनी या वेळी केली. तसेच बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी देखील केवळ आयुष्यातील काही दिवसांसाठी वेगळे राहण्यासाठी मानसिक तयारी ठेवावी. कोरोना आजार पूर्णता बरा होणारा आहे. त्यासाठी वेळीच त्याची माहिती मिळणे व उपचार सुरू होणे, शरीराची प्रतिकारशक्ती वाढणे, आवश्यक आहे. त्यामुळे मानसिक दृष्ट्या स्वतःला सक्षम ठेवून या आजाराला सामोरे जाण्याची तयारी समाजातील सगळ्यांनी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीमध्ये त्यांनी कोरोना सोबतच अन्य विषयांबद्दलही तालुक्यातील माहिती घेतली. यामध्ये प्रामुख्याने गरिबांसाठी असणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतील यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करा. तालुक्यातील सर्व पांदण रस्ते, पूल ,याबाबत योग्य आराखडे तयार करा, 100 टक्के धान्य वितरण, शाळांची सुरुवात, आरोग्य विषयक सूचना,औषधांची उपलब्धता, साथ रोगनिवारण, शेतकऱ्यांना खतांची उपलब्धता, बियाण्यांची उपलब्धता, पिक कर्ज, तसेच 31 जुलैपर्यंत मुदत असणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी लक्ष देण्याचे आवाहन केले.

या बैठकीला तहसीलदार परिक्षित पाटील, गटविकास अधिकारी अमोल भोसले, नायब तहसीलदार सागर कांबळे, सावली नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनीषा कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी मनोहर मडावी, वैद्यकीय अधीक्षक यमुताई मडावी, उपअभियंता श्री. कटरे आदी उपस्थित होते.