🔸विडियो कॉन्फरन्सच्या द्वारे E पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन

🔹जालना येथे कोरोना चाचणी करणारी प्रयोगशाळा चालू

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)

मो:-9881292081

जालना (दि-13जुलै):- राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ही बाब निश्चितच चिंतेची आहे. आगामी काळात कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी हा लढा सकारात्मकरीत्या लढावा लागेल. मार्च महिन्यात केवळ आपल्या राज्यात कोरोनाची चाचणी करणा-या दोनच लॅब होत्या. आज त्यांची संख्या 110 वर पोहचली आहे. येणा-या काळात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी करणा-या प्रयोगशाळा उभारल्या जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.
आज दि.12 जुलै 2020 रोजी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोव्हीड -19 आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे ई पध्दतीने विडियो कॉन्फरन्सींग द्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब दानवे,
राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राजेश टोपे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, पोलिस अधिक्षक एस. चैतन्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले, डॉ. जगताप, नगर परिषद मुख्याधिकारी नितीन नार्वेकर,डॉ. हयातनगरकर, डॉ. संजय राख, डॉ. रायठठ्ठा, डॉ. मोजेस, डॉ. चव्हाण, उपअभियंता चंद्रशेखर नागरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की,जालना शहरात आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातुन नागरिकांना कोरोना विषाणुची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे परिणामी लवकर व जलदगतीने चाचणीचा अहवाल प्राप्त होणार आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट असून आपला देश व आपले राज्य या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे. आरोग्याच्या सुविधा वाढत आहेत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबीवर भर देण्यात येत आहे. कोरोना बाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात या सुविधा कायम स्वरूपी उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
येणा-या काळात आरोग्य यंत्रणेसह आपणा सर्वांसमोर कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी ठेवण्यासाठी सर्वंकष व सामुहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगत या लढ्यात आरोग्ययंत्रणा, पोलीसखाते, महसुल यंत्रणा मोठ्या प्रमाणावर लढत असून या सर्वांचे कार्य कौस्तुकास्पद व अभिनंदनीय असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.
याप्रसंगी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राजेश टोपे म्हणाले की, जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या बी.एस.एल. -3 या आधुनिक पध्दतीच्या प्रयोगशाळेच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या करुन रुग्णांवर योग्य ते उपचार योग्य त्या वेळेत केले जाणार आहेत. आधुनिक व सुसज्ज अशा या प्रयोगशाळेत बुरशी, विषाणु, जीवंत राहू शकणार नाही अशा पध्दतीची यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.
कोव्हीड बरोबरच या प्रयोगशाळेत अनुवंशिकते संबंधी, एचआयव्ही, साथीचे आजार यासह अन्य तपासण्या केल्या जातील. या प्रयोगशाळेच्या माध्यमातुन आपणांस दररोज लवकरात लवकर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल प्राप्त होणार असल्यामुळे त्यांच्या निकट सहवाशितांची ओळख होईल व त्यांच्या देखील तपासण्या करुन कोरोनाची साखळी तोडण्याबरोबरच कोव्हीड बाधितांवर तातडीने उपचार करणे सोयीचे होणार आहे तसेच प्लाझ्मा थेरपी व ॲन्टीबॉडी टेस्टिंग मशिन लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब‍ दानवे बोलतांना म्हणाले की, केंद्र सरकार व राज्य सरकार कोरोना संबंधी योग्य ती उपाययोजना करत असून नागरिकांनी आता स्वत:हुन पुढे येऊन कोरोना संबंधीची काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरुन नागरिकांना प्रयोगशाळेपर्यंत येण्याची गरज पडणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे म्हणाले की, जालना जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या जरी वाढत असली तरी कोरोनामुक्त होणा-या रुग्णांची संख्या ही देखील अधिक आहे. 1 कोटी 7 लक्ष रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक प्रयोगशाळेच्या माध्यमातुन दररोज 500 तपासण्या केल्या जातील. ही प्रयोगशाळा उभारण्यासाठी पालकमंत्री राजेश टोपे यांच्यासह सर्व पदाधिका-यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रयोगशाळेच्या मुख्यमंत्र्यानी ई उद्घाटनानंतर पालकमंत्री राजेश टोपे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, यांच्यासह आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्रयोगशाळेचे फीत कापुन व कोनशीला अनावरण करुन शुभारंभ करण्यात आला.

कोरोना ब्रेकिंग, महाराष्ट्र, स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED