स्वयंचलित हवामान केंद्र शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी की विमा कंपनीच्या ?

33

🔹२०२१-२२ च्या मृग बहार संत्रा फळपीक विम्याची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी !

🔸हिवरखेड मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र मंडळाच्या शेवटच्या टोकाला !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.4जानेवारी):-शेतक-यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा व वातावरणातील बदलामुळे होणारे शेतीचे संभाव्य नुकसान टाळता यावे, या उद्देशाने शासनाच्या वतीने स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने मोर्शी तालुक्यातील हिवरखेड महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु हिवरखेड मंडळातील स्वयंचलीत हवामान केंद्र मंडळाच्या मध्यभागी दापोरी येथे न बसविता मोर्शी तालुक्यातील अखेरच्या टोकाला बसविल्यामुळे हिवरखेड मंडळातील फळ पीक विमा काढलेल्या हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विमा मदतीपासून वंचित राहण्याची वेळ येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी केला आहे.

हिवरखेड महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२१-२२ चा संत्रा मृग बहार फळपीक विमा मोठ्या प्रमाणात काढलेला होता महसूल विभाग व कृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे हिवरखेड मंडळातील स्वयंचलीत हवामान केंद्र महसूल मंडळाच्या मध्यभागी दापोरी येथे न बसविता मोर्शी तालुक्याच्या सीमेवरील उमरखेड येथे बसविल्यामुळे हिवरखेड मंडळामध्ये ५ जून ते १५ जुलै २०२१ दरम्यान दापोरी येथे ८५.५ मिली मीटर पासवसाची नोंद झाली असून उमरखेड येथील स्वयंचलित हवामान केंद्रावर १९५ मिली मीटर पावसाची नोंद झाल्यामुळे हिवरखेड महसूल मंडळामध्ये अत्यल्प पाऊस होऊनही मृग बहार फळ पीक विम्याच्या मदतीपासून वंचित राहण्याची वेळ हिवरखेड मंडळातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर आली होती. त्यामुळे विमा कंपनीचा कोट्यावधी रुपयांचा फायदा झाला असून स्वयंचलित हवामान केंद्र विमा कंपनीच्या फायद्यासाठी आहे की शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हे कळायला मार्ग नाही.

हिवरखेड मंडळातील सन २०२१-२२ चा मृग संत्रा बहार फळपीक विमा मोठ्या प्रमाणात काढलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विम्याच्या मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून या सर्व विमा धारक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तत्काळ मदत जमा करून, हिवरखेड मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र दापोरी येथे बसवून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी शासनाकडे केली आहे.

स्वयंचलित हवामान केंद्र कुणाच्या फायद्यासाठी ?
शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा आणि शेतीचे संभाव्य नुकसान टळावे, या उद्देशाने उभारलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थिती गंज चढल्यागत झाली आहे़ ग्रामीण भागातील मंडळ कार्यालयांतर्गत उभारलेल्या या हवामान केंद्रांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत़ हवामानाची नोंद घेणारे काही यंत्रे झुडपामध्ये झाकून गेली असून हवामान केंद्र मंडळाच्या शेवटच्या टोकाला बसविल्यामुळे हवामानाची अचूक नोंद होणार कशी? याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून या गंभीर प्रकारामुळे फळ पीक विमा धारक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असून विमा कंपनीचा कोट्यावधी रुपयांचा फायदा होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

शेतक-यांना नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण मिळावे यासाठी मोर्शी तालुक्यातील महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात आले़. शेतक-यांचे होणारे नुकसान टाळता यावे व हवामानाची अचूक माहिती मिळावी, यादृृष्टीने बसविण्यात आलेले स्वयंचलित हवामान केंद्र शेतक-यांसाठी आधार देणारे ठरत नसल्यामुळे अवेळी पडणारा पाऊस, गारपीट तसेच वादळी वा-यामुळे शेतक-यांच्या तोंडचा घास निसर्ग हिरावून घेतो़ अशावेळी चुकीच्या ठिकाणी बसविलेल्या हवामान केंद्राचा फारसा उपयोग होतांना दिसत नाही — रुपेश वाळके ग्राम पंचायत सदस्य.