आजच्या महिलांनी कर्मकांडामध्ये न अडकता महामातांचा आदर्श घेऊन मार्गक्रमण करावे – व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

89

✒️जामनेर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

जामनेर(दि.12जानेवारी):– तालुक्यातील पळासखेडे बु. येथे खंडेराव महाराज मंदिरासमोर ३ जानेवारी सावित्रीमाई फुले, ९ जानेवारी फातिमाबी शेख व १२ जानेवारी राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पॅनल प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य, शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर विचारधारेचे सच्चे वारसदार राजुभाऊ खरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पळासखेडे गावाचे नवनिर्वाचित सरपंच भिका राजाराम तायडे होते. प्रमुख व्याख्याते नाशिक विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अशासकीय सदस्य तथा शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून जामनेर चे प्रसिध्द डॉ. प्रशांत पाटील, सत्यशोधक समाज संघाचे प्रचारक तसेच महात्मा फुले हायस्कूल शाळेचे आदर्श शिक्षक एच.डी. माळी, पी.डी. पाटील, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध चित्रकार योगेश सुतार, पळासखेडे बु. उपसरपंच ज्योती देविदास पांगुळ, ग्रा.पं.सदस्य राजुभाऊ सुभाष खरे, रॉकी बाळु काळे, गायत्री ईश्वर शेळके, सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ वराडे, रेल्वे डिपार्टमेंटचे भारत तायडे, पोलीस डिपार्टमेंटचे संजय खंडारे, योगेश वराडे, संदीप वानखेडे, उन्नती नगरचे मुख्या. प्रजापती सर, रामदास पांगुळ, जि.प. शाळा पळासखेडे बु. चे मुख्या.चौरे सर, धरणगावचे सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ सोनवणे, विक्रम पाटील, प्रफुल पवार उपस्थित होते.

सर्वप्रथम ग्रामपंचायत मधील नवनिर्वाचित महिला सदस्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सवित्रीमाईंच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. आलेल्या सर्व प्रमुख अतिथींचे पळासखेडे बु. ग्रामपंचायत मार्फत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. गावातील आशा आणि अंगणवाडी सेविका रेखा नेरकर, संगीता महाजन, सारिका पाखरे, जिजाबाई शिंदे यांचा देखील सत्कार करण्यात आला. पळासखेडे बु. गावात ४५ वर्षानंतर सत्तांतर झाले. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य यांचे सत्यशोधक विचार मंच धरणगाव यांच्या वतीने महापुरुषांचे अनमोल ग्रंथ भेट देऊन क्रांतिकारी अभिनंदन करण्यात आले. संघमित्रा राजु खरे या विद्यार्थिनीने अतिशय आवेशपूर्ण तसेच मार्मिक शब्दांत जिजाऊ व सवित्रीमाईंच्या बद्दल मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी सर्वच बहुजन महामातांचा जीवन संघर्ष उलगडला. खऱ्या अर्थाने महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज आहे. तसेच आपल्या महापुरुषांना जाती-जातीत विभागून त्यांच्या विचारांची माती करू नका. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले हेच खरे मर्यादा पुरुषोत्तम आहेत, असे ठणकावून सांगितले. मी आज येथे बरं नाही तर खरं बोलायला आलेलो आहे. आजच्या युवक मित्र-मैत्रिणींनी अभ्यास करा व आपल्या आई वडिलांचे नाव मोठे करा तसेच माझ्या सर्व माता-भगिनींनी कर्मकांडापासून दूर राहून या सर्व बहुजन महामातांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन व्याख्याते पाटील यांनी केले.

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध चित्रकार योगेश सुतार यांनी गावचे नवनिर्वाचित सरपंच तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष भिका राजाराम तायडे यांचे हुबेहूब चित्र साकारले आणि मान्यवरांच्या हस्ते ते भेट स्वरूपात देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संजय खंडारे यांनी तर आभार प्रदर्शन योगेश वराडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पळासखेडे बु. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सर्व ग्रा.पं. सदस्य तसेच गावातील नवयुवक विजय तायडे, निलेश गायकवाड, ईश्वर शेळके आदी मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.