धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार भूपाल शेटे यांना जाहीर

32

🔸रविवार दि. 29 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे वितरण

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.15जानेवारी):-कोल्हापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे नेते, कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर भूपाल शेटे यांना या वर्षीचा धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टचा मानाचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार निवडीचे पत्र धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व कार्यक्रमाच्या निमंत्रक ॲड. करुणा विमल यांनी भूपाल शेटे यांना दिले आहे.

भूपाल शेटे यांनी गेली 30-35 वर्षे कुष्ठरोगी बांधवांची सेवा केली आहे. स्वखर्चातून दरवर्षी कुष्ठरोगी बांधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ते गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटपाचे काम करत असतात. राजकारण, समाजकारण व कुष्ठरोग्यासह वंचित, बहुजन समूहासाठी भूपाल शेटे यांनी भरीव काम केले आहे. या दखलपात्र कामासाठी त्यांचा पद्मश्री डॉ. बाबा आमटे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला होता. सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढणारा रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आजपर्यंत त्यांना 40 हून अधिक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

रविवार दि. 29 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11:00 वा. कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या पाचव्या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार संजय आवटे, सुप्रसिद्ध कवयित्री दिशा पिंकी शेख, सुप्रसिद्ध कवी व लेखक डॉ. सतीशकुमार पाटील, धम्म अभ्यासक विजया कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. मंचकराव डोणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नंदकुमार गोंधळी, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, संविधानाचे अभ्यासक डॉ. श्रीपाद देसाई, ॲड. अकबर मकानदार, निती उराडे, प्रा. प्रकाश नाईक या मान्यवरांच्या हस्ते धम्मदीप जीवन गौरव पुरस्कार देऊन भूपाल शेटे यांना गौरवण्यात येणार आहे. अशी माहिती संयोजक अनिल म्हमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सदर पुरस्कार वितरण समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. दयानंद ठाणेकर, सुरेश केसरकर यांनी केले आहे.पत्रकार परिषदेला प्रा. डॉ. शोभा चाळके, तात्यासाहेब कांबळे, विमल पोखर्णीकर, सनी गोंधळी, अनुष्का माने, सिद्धार्थ कांबळे, अरहंत मिणचेकर उपस्थित होते.