‘चित्रातला वाघ भित्रा’

93

आपली मराठी भाषा ही तशी खूप समृद्ध भाषा आहे.त्यातच वाक्य प्रचार आणि म्हणींचा भरपूर भंडार आहे. आणि प्रत्येक म्हणी या अनुभवातून तयार झालेल्या आहेत.अशीच एक म्हण आहे ‘आपला तो बाब्या आणि दुस-याचं कार्ट… खूप प्रसिद्ध आहे.आणि यांची प्रचिती अनेक प्रसंगांतून आलेली आहे आणि नित्यनेमाने येतच आहे.विशेषत: विशिष्ट परिस्थितीत अगतिकतेमुळे म्हणजे संकट ओढवल्यामुळे राष्ट्रवादीची झूल झटकून सत्ताधा-यांची अर्थात भाजपची शाल पांघरल्यापासून वाघांचे विचार, वक्तव्य आणि चित्रच बदलून गेले आहे.

सिंह आणि वाघ हे दोन्ही वन्य प्राणी तसे दुर्मिळ होत चाललेले आहेत. एकेकाळी या दोन्ही प्राण्यांचे नाव उच्चारले तरी भल्या भल्यांची दांडी उडायची. परंतु नीच राजकारण्यांनी जसजसे वन क्षेत्र खाऊन टाकले तसे ह्या प्राण्यांना नवनवे आश्रय स्थान शोधावे लागले. जंगलाचा राजा वाघ की सिंह हे अजूनही कुणाला स्पष्टपणे सांगता येत नाही.तरिही या वन्य प्राण्यांची जी भीती वाटायची.ती आता उरली नाही.मात्र आपले अस्तित्व दाखविण्यासाठी वाघाला मात्र दररोज बरीच धडपड करावी लागते.परंतु आता तर ‘वाघ’ ‘चित्रा’त पाहिला तरी तो भित्राच वाटतो आहे. असो !

‘वाघ’ आडनावाच्या भाजपच्या एक महिला प्रवक्त्या आहेत. चित्रवाणी वर आणि इतर प्रसिद्धी माध्यमांवर अधून मधून त्या पक्षातीृल आपले स्थान बळकट करण्यासाठी सतत कुणाला तरी ठरवून ‘लक्ष्य’ करुन अतिशय तावातावाने कायदा हातात घेण्याची भाषा करताना आढळतात.

चित्रा वाघ तशा एकटया नाहीत.त्यांच्या सोबत खूप मोठी टिम/संघ कार्यरत आहे. त्यांना आपल्या पक्षाला सोयीचा वाटेल असा कुठला तरी विषय घेऊन सतत घर्घेत राहण्यासाठी पुर्ण मदत केली जाते.अन्यथा त्या कुणालाही भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी ठोकण्याची उर्मट भाषा बोलल्याच नसत्या.इतके साहस त्यांनी केलेच नसते. अलिकडे त्या कुणी काय खावे,काय ल्यावे याबद्दलचे आदेश जारी करत आहेत. सरकारचे अपयश झाकण्यासाठी जनतेचे लक्ष विचलित करावेच लागते.तेव्हां एखाद्याची केवळ त्यांची जात-धर्म पाहून काहूर माजवणे हे सर्व प्रायोजित असते.

उर्फी जावेद या एका अभिनेत्रींच्या वेशभूषेवरुन ‘वाघां’च्या ‘चित्रां’नी जो धुराळा उडवला आहे तो ती धर्माने मुस्लिम युवती आहे म्हणूनच हे त्याचे ताजे उदाहरण आहे.जर उर्फी जावेद तोकडे आणि भगव्या रंगाचे कपडे परिधान करुन नंगानाच करते असा त्या आक्षेप घेत असतील तर कमी कपड्यातील अमृताबाई आणि भगव्या रंगाचे तोकडे कपडे घालून भन्नाट नाचणा-या नवनीत बाईंकडे त्या सोयीस्करपणे का दुर्लक्ष करतात.त्यांना माधुरी आणि ममता यांचे अंगप्रदर्शन भूमिकेसाठी आवश्यक या सबबीखाली खुशाल चालते.. संस्कृतीचा ठेका त्यांच्या एकट्याकडे असल्याच्या आविर्भावात त्या संस्कृतीचा मुद्दा पुढे दामटतात मात्र सरकारच्या छत्र छायेत आपले साम्राज्य वाढविलेल्या रामदेव सारखा साधू कम उद्योजक अमृताबाई समोर त्यांच्या तोंडावर त्या कपडे घातले तरी सुंदर दिसतात नाही घातले तरी सुंदर दिसतात असे म्हणतो, किड्या सारखा भिडे आमच्या पत्रकार भगिनींना मोकळे कपाळ घेऊन माझ्यासमोर येऊ नकोस असे दरडावून महिला सन्मानाची खिल्ली उडवतो आणि निर्लज्जपणाचा कळस म्हणजे स्वतःला विज्ञान शाखेचा पदवीधर म्हणवून घेणारा हा दरिद्री आमच्या बागेतील आंबे खाल्ल्यावर मुलेच होतात असे लाजिरवाणे वक्तव्य करतो,ब्रिजभूषण शरणसिंग हा सरकार नियुक्त प्रशिक्षक आपल्या चमूतील विनेश फगोट या मल्ल महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे सांगत दिल्लीच्या जंतर मंतर वर जोरदार आंदोलन करण्यात येत असताना त्याविरुद्ध ब्र देखील न काढता याच संस्कृती रक्षक ‘वाघ’ मौन राखतात यांचा काय अर्ध लावायचा ? अशाने सरकार पक्षात राहून त्यांना आपण महिलांचे आणि संस्कृतीचे रक्षण करतो असे वाटत असेल तर ते स्वतः भ्रमात राहून इतरांनाही मुर्खात काढत आहेत.

उर्फी जावेद ही ज्या क्षेत्रात काम करते त्याचा विचार करता तिचे अनेक चाहते असू शकतात. करारानुसार एकावेळी ती इतर वेगवेगळ्या कार्यक्रम आणि जाहिरातीसाठी कार्यरत असताना ब-याच वेळा एका दृश्या नंतर दुस-या दृश्यासाठी तयार होण्याच्या मधल्या अवधीत तिला भेटणारे तिचे चाहत्यांपैकी त्यावेळी जर एखादे कुणी फोटो घेत असतील आणि ते त्यांच्या आवडीने समाज माध्यमांवर टाकत असतील तर त्या वेश भूषेवरुन त्या अभिनेत्रीला अश्लील आणि संस्कृती विरोधी कसे ठरवता येईल ?केवळ मुस्लिम समाजाची महिला म्हणून तिला दोष देणे चुकीचे ठरेल.

‘वाघ’ ज्या पक्षात वावरतात तो पक्ष आणि संघटना एकीकडे अभिनयाच्या व्यवसायाला अनुसरून आणि ते देखील काही अल्पावधिसाठी परिधान केलेल्या वेशभूषा वरुन धार्मिक पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून उर्फी,राखी सारख्या तत्सम महिलांचा खांदा वापरून मुस्लिम आणि बहुजन समाजाला बदनाम करतात, तर दुसरीकडे अंग प्रदर्शन न होईल अशा अंग झाकून घेणा-या बुरखा आणि ‘हिजाब’ या पेहरावाला देखील विरोध करतात हा त्यांचा शूद्ध दुटप्पीपणा नाही तर काय म्हणायचे ?

इथल्या विषमतावादी समाज रचनेतील तथाकथित उच्च समजले जाणा-या माधुरी किंवा ममता सारख्या तत्सम महिला
काहीही आणि कसेही वर्तन वेशभूषा आणि ‘धकधक करने लगा’ म्हणून उत्तेजक हावभाव करीत असतील तर तो त्यांचा अभिनय म्हणून कौतुकास्पद समजायचा आणि उर्फी,राखी अभिनय करतात ती अनैतिकता आणि संस्कृती वर हल्ला समजायचे हे कोणत्या मोज मापात बसते ?

सतत हिंदू आणि हिंदुत्वाचा गजर करणा-या संघ आणि त्यांच्या पोट पक्षात केवळ गडकरींना काउंटर करण्यासाठी वापर होतो हे कळत नसल्यामुळे आपण कुणीतरी खास आहोत असा समज करुन घेतलेले फडणवीस हे इतर पक्षात अनावश्यक ढवळाढवळ करण्यात दंग असताना त्यांच्या सुविद्य पत्नी मात्र चित्राबाईंच्या कल्पनेतील हिंदुत्व आणि संस्कृतीला न शोभणारे कपडे लेवून सार्वजनिक ठिकाणी वावरतात .अर्थात हा त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा विषय असला तरी आज घडीला अमृताबाईंच्या अशा वेशभूषा वर कसलाही आक्षेप न घेता ‘वाघ’ शांत का ?

हिंदू धर्माच्या असूनही जर अमृताबाईंना काही बोललं जातं नसेल तर मग इतरांच्या घोंगड्या झटकण्याचा उद्योग ‘वाघ’ कशासाठी करतात ?

इतकंच काय ‘पठाण’ मध्ये दीपिका पदुकोन भगवा रंगाच्या कपड्यात नाचते आणि तेही शाहरुख खान सोबत नाचते म्हणून लगेच धार्मिकतेचा बागुलबुवा उभा केला जातो .मात्र. अगदी तसाच,त्याच रंगाच्या कपड्यात नवनीतबाई भन्नाट नाचतात तेव्हाही ‘वाघ’ शांत का ?

हिंदू या शब्दाचा अर्थही माहीत नसताना आणि हिंदू हा धर्म नसून ज्याच्या त्याच्या जगण्याची एक पद्धती आहे असे न्यायालयाने स्पष्ट करुनही हिंदू हा धर्म आहे असा धर्माचा टेंबा मिरवणारे मुस्लिमांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची भाषा करणारे महाभाग सलमान खान गणपती बसवतो म्हणून त्याला विरोध करत नाहीत. अमृता फडणवीस रियाज अली सोबत कुठल्याही नृत्य क्लास मध्ये नाही तर चक्क सरकारी बंगल्यात नाचलेलं चालतं.मात्र सद्य सत्य परिस्थितीवर भाष्य करणा-या अमीर खानचा ‘लालसिंग चड्डा’ चित्रपटाचा मात्र बहिष्कार केला जातो. पठाणचे खेळ बंद पाडले जातात. यातून केवळ आणि केवळ भागवतांनी इथल्या मुस्लिम समाजाविषयी व्यक्त केलेल्या विचारानुसार सोयीस्कररीत्या पाळला जाणारा मुस्लीम द्वेषच दिसून येतो.

म्हणून ‘चित्रां’ना सांगावेसे वाटते की,काही तरी पदरात पाडून घेण्यासाठी पक्षप्रमुखांचं लक्ष वेधून घेताना हिंदुत्वाचे आणि संस्कृतीचे डोस इतरांना पाहण्यापेक्षा आपल्या अवतीभवती असणा-यांना चार समजुतीचे शब्द सांगावेत. परंतु त्या असे सांगायचे धाडस करणार नाहीत हे देखील आम्हाला पक्कं ठाऊक आहे.कारण असे केल्यास कदाचित पक्षश्रेष्ठी नाराज होतील आणि आपल्याला हवे ते मिळणार नाही याची त्यांना ‘भीती’ वाटते.इतकेच !✍🏻

✒️विठ्ठलराव वठारे(सदस्य पत्रकार सुरक्षा समिती,महाराष्ट्र)
joshaba1001@gmail.com